महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 87,25,332

महादजींची ब्रिदवाक्ये

By Discover Maharashtra Views: 1514 8 Min Read

महादजी ‘ उवाच’ अर्थात महादजींची ब्रिदवाक्ये –

मित्रानो आज आपण एका वेगळ्या विषयाकडे वळणार आहोत. महादजींच्या काळातील ऐतिहासिक पत्रव्यवहार नजरेखालून घालताना त्यामध्ये महादजींची अशी काही वाक्ये दिसून येतात जी आपल्या हृदयाला हात घालतात, थेट मनाला भिडतात. महादजींनी त्या काळात असे उद्गार खरेच काढले असतील का असा विचार आल्याशिवाय रहात नाही. अशाच काही शब्दांचा, वाक्यांचा आज आपण अभ्यास करणार आहोत. रियासतकारानी आपल्या मराठी रियासतीत या वाक्यांना महादजींची ‘ब्रिदवाक्ये’ संबोधित करून गौरवोद्गार काढलेले आहेत.(महादजींची ब्रिदवाक्ये)

महादजींचे काही ऐतिहासिक उद्गार त्या काळातील अनेक पत्रावरून “जसेच्या तसे” येथे घेतलेले आहेत. यातील  उद्गार हे त्यांच्या दरबारातील वकिलांना उद्देशून म्हंटलेले आहेत. या वाक्यांतून महादजीचा बाणेदारपणा व आत्मविश्वास दिसून येतो व काही ठिकाणी त्याच्या निष्कपट स्वभावाची झलक डोकावते. उदाहरणार्थ एके ठिकाणी ते म्हणतात की राजकारणातील यश ही काही इंग्रजांची मक्तेदारी नाही, तेव्हा तुम्ही बाजारगप्पावर भरोसा ठेवू नका. ही ब्रिदवाक्ये वाचताना एक वैधानिक सूचना करावीशी वाटते,ती म्हणजे ही वाक्ये संदर्भासहितच घ्यावीत. या वाक्यांचा खरा अर्थ व महादजींची आंतरिक भावना त्या प्रसंगाशी निगडित आहे हे वेगळे सांगायला नको.

सदाशिव दिनकर याच्या एका पत्रात महादजीचे पुढे दिलेले उद्गार त्याची होणारी चिडचिड दाखवणारी आहेत. यात म्हंटले आहे,”आम्ही तीन चार वर्षे (इंग्रजांच्या )मोहिमेत श्रम मेहनत करतोय.त्यात आम्ही कर्जबाजारी झालो. हे वारंवार पुणे दरबारास कळवून कोण काळजी घेतोय? होळकरांच्यापेक्षा आम्ही मातब्बर आहोत, आमच्या तुलनेत ते किती फौज ठेवतात व हिंदुस्थानात चाकरी कशी करतात? त्यांना कोणी सरंजामाचा हिशोब विचारीत नाही.(आम्हालाच का विचारतात?)“चालल्यावर दोन गोण्या (आणखी) लादतात असा प्रकार आहे”……असो. शेवटी ते ग्वाही देतात की आमची क्रिया (कृती)धन्याचे पायी शुद्ध आहे.ईश्वर याही राजकारणाचा (योग्य)निपटारा करेल. (संदर्भ: फेब्रुवारी १७९४ सदाशिव दिनकर यांची पत्रे लेख १७, ग्वाल्हेर दरबाराची पत्रे खंड ५)

आपल्या राजकीय हालचालीबद्दल ते म्हणतात,“आम्ही कृत्रिम बुद्धीने (लबाड वृत्तीने)चाललो असल्यास शब्द लागेल. निष्कपट एकनिष्ठतेने वर्तले असल्यास ईश्वर आम्हास पार पडेल. आमचे निष्ठेत गडबड असेल तर त्याचे ही फळ आम्हास मिळेल.” (संदर्भ: फेब्रुवारी १७९४ सदाशिव दिनकर यांची पत्रे, ग्वाल्हेर दरबाराची पत्रे खंड ५)

करवीरच्या मोहिमेत असताना महादजी एके ठिकाणी म्हणतात “आम्हांसी जो नीट चालतो, त्यासी जीवानिसी हजर आहो; आणि आम्हांसी काटकण्या करेल (आम्हास त्रास देईल) तर नवे पातशहा उभे करू; जे चाहु ते करू. सबब (कारण) की आमची निष्ठा श्रीमंतांचे पायापाशी आहे, म्हणून ईश्वर आम्हास यश देतो.” महादजींचा स्वतःच्या कर्तृत्वावर एव्हढा विश्वास आहे की आपल्या मनात येईल तसे वागून आपण कार्य सिद्धीस नेऊ शकतो असे ते म्हणतात व श्रीमंतांच्या पायी निष्ठा असल्याने आपण चुकीचे वागणार नाही याची त्यांना खात्री आहे. ( संदर्भ:सातारा इतिहास संशोधक मंडळातील पत्रे भाग १)

दिल्लीच्या पातशहाने वकील मुतलकीची खिलत महादजींना लिहून दिली. त्यावर पेशवाईमध्ये गोंधळ सुरु झाला. त्यातूनच अनेक प्रश्न, उपप्रश्नांचे काहूर उठले. त्यासंबंधात सदाशिव दिनकर यांच्या पत्रात पुढील मजकूर आलेला दिसतो. “आम्ही जे करतो, ते श्रीमंतानिमित्त करतो. आमच्या वडिलांची तरी काय बिशाद होती! प्रथम राणोजीबावास खिजमदगारी सांगितली. नंतर कृपा करून पागा दिली. तेथून वाढवीत या पदवीस आणले की, आम्ही बादशहाची स्थापना केली. आता आम्ही बादशाच्या पदांची इच्छा (तरी) का करावी? द्रव्यसंचय व लौकिकाचा अभिलाष धरावा तर श्रीमंतांचे कृपेकरून आम्हात काय उणे आहे?लौकिक तो आहेच, पैका म्हणावा तर मुलुख उजाड यात काय मिळणार? खर्च चालवायचे संकट,आणि संचय तरी किमर्थ करणे? आमचे जन्माचे सार्थक श्रीमंत कृपेंकरुन झाले. द्रव्य संचयाचा  हव्यास कोना निमित्त (कोणासाठी)करावा! पोटिपाठी कोणी नाही. श्रीमंतांचे भोक्तृत्व तेच आमचे उर्वरित!” ( (संदर्भ:एप्रिल १७८५. सदाशिव दिनकर यांची पत्रे ५९ , ग्वाल्हेर दरबाराची पत्रे खंड ५)

सदाशिव दिनकर याने दिल्लीच्या बंदोबस्ताविषयी महादजीस एकदा छेडले तेव्हा महादजींनी उत्तर दिले होते, ’’आणभाष (आणाभाका) ,इमान प्रमाण वगैरे बळकटीची जात जितकी असते तितकी झाली. परभारे सलूख होणार नाही असे आम्हांजवळ (इंग्रज) म्हणतो. आमचा जाबसाल न करता परभारे दिल्लीचा मनसुबा करतील तेव्हा शब्द त्याला लावावा. लोंकाच्या गप्पा तुम्ही ऐकता तेव्हा प्रमाण काय? दिल्लीचा मनसब त्यास हस्तगत झाला, खरे कशावरून? दैव श्रीमंतांचे आहे. इंग्रजांनीच सर्व जय पदरी बांधून ठेवला आहे की काय? बाहेरच्या खबरावर न जावे.’ मसलतीस जाणे होईना तेव्हा नाना फडणीस यांचा वकील आपाजीराम यांस महादजी म्हणाले होते की राग आल्यावाचून कोणतेही काम होत नाही. आम्ही इच्छा करतो की आपणास राग यावा आणि धन्याची चाकरी पूर्ण व्हावी. शत्रूचे पारिपत्य व्हावे. या ठिकाणी महादजींच्या म्हणण्याचा आशय असा आहे की राग आल्याशिवाय कोणतेही काम पूर्णत्वाला जात नाही.

महादजींच्या पदरी अँडरसन (ज्याला मराठे इंद्रसेन म्हणत) हा इंग्रज वकील होता. त्याच्या संदर्भातील एका प्रसंगी महादजी म्हणतात की आम्ही इंद्रसेनाच्या भरवशावर इष्टिनाच्या (गव्हर्नर जनरल वॉरेन हेस्टिंग्जच्या) प्रामाणिकपणाबद्दल लिहीत गेलो. त्यांनी मात्रागमन केले (धोका दिला).आम्हांस कलंक लाविला. ही(घटना) झाली ती कुबुद्धीने झाली नाही. मनसुबा चुकत असल्यास सर्व एकोप्याने सांभाळून नेत असतात.राज्याचा मनसुबा एकट्याने होत नसतो.(Principle of collective responsibility) आम्ही हिंमत सोडली नाही. यावतप्राण (प्राण असेपर्यंत) स्वामीसेवेस अंतर करावयाचे नाही. वलयांकित पृथ्वीचे राज्य साऱ्यांचे एकमत असल्यास साधेल, सर्वानी स्वामीसेवेचे पोटी आपले कल्याण समजून श्रम करावे. आपापले दोष उघड झाले ते झाकून तमाशबीन होऊ लागतील (चव्हाट्यावर येऊ लागतील), तर फल ही पुढे पावतील आम्ही निष्कपट व निष्ठा राखीत असलो तर धन्याचा प्रतापच यश देईल.( संदर्भ:सदाशिव दिनकर यांची पत्रे क्रमांक २७, मे१७८४)

१०ऑगस्ट१७७४च्या नारो शिवदेव यांच्या पत्रात महादजी आपले मनोगत सांगताना म्हणतात की करवीरची मसलत पेशवे दरबारने सांगितली आहे. (ती अर्ध्यावर सोडून जाऊ शकत नाही) ती शेवटास गेल्याखेरीज बाकीचे मजकूर होत नाही. मसलत अखेर झाल्यावाचून पाऊल मागे पडणार नाही. (संदर्भ:सातारा इतिहास संशोधक मंडळातील पत्रे भाग १).

सदाशिव दिनकर याला उद्देशून महादजी एके ठिकाणी म्हणतात की “जो जे कर्म करतो, त्यासच त्यातील सुखदुःखाचा अनुभव असतो. श्रीमंतांची आज्ञा वंदून बादशाही मनसब्यास आरंभ केला. आमची निष्ठा श्रीमंतांचे पायी सुदृढ असेल तर यश देईल. मसलत श्रीमंतांचे प्रतापे करूनच सिद्धीस गेली.” (संदर्भ:जुलै १७८५ सदाशिव दिनकर यांची पत्रे लेख ८८, ग्वाल्हेर दरबाराची पत्रे खंड ५)

पुढे एका प्रसंगी महादजी म्हणतात की द्रव्य,पैसा यांची साथ मिळाली तरच  मसलत पूर्ण होते. केवळ लढणारे सैन्य व उपदेशामुळे होत नाही. त्यांच्या रोखठोक भाषेत ते म्हणतात “ वैद्य व स्वंयपाकी जरी कुशल असले तरी त्यांच्या हातून रस सिद्ध होत नाही. जसे द्रव्य मिळेल तसे रस सिद्ध होऊन गुण येतील.”

या अशा अनेक वाक्यातून महादजींची कर्तव्यनिष्ठा दिसून येते. पेशव्यांच्या प्रति त्यांचा आदरभाव, स्वतः केलेल्या राजकारणाबद्दलचा कार्यकारणभाव या वाक्यातून व्यक्त होतो. बऱ्याच ठिकाणी महादजी आपले मनोगत तर सांगत नाहीत ना असा आभास निर्माण होतो. कित्येकदा महादजी बोलायला सडेतोड तसेच निर्भीड व कोणाचाही मुलाहिजा न ठेवणारे होते असे या उद्गारावरून वाटते. ही वाक्ये चोखंदळ वाचकांना त्या काळातील मराठी भाषेचा साज,नाज व आब यांचे दर्शन घडवतील यात शंका नाही.

संदर्भ: मराठी रियासत खंड ७, सातारा इतिहास संशोधक मंडळातील पत्रे भाग १ , ग्वाल्हेर दरबाराची पत्रे खंड ५.

संकलन व लेखन : प्रमोद करजगी

Leave a Comment