०६ जानेवारी १६६४ –
०६ जानेवारी १६६४: शिवाजीराजांनी सुरत शहर लुटायला सुरुवात केली इसवी सन १६६४ मधे आजच्याच दिवशी म्हणजे ०६ जानेवरी ला शिवाजीराजे पहिल्या सुरत लुटीच्या मोहिमेवर होते. या पहिल्या सुरतलुटीत मराठ्यांना एक कोटीची मालमत्ता मिळाली.
सुरत शहर हे तापी नदीच्या किनार्यावर वसले आहे. त्याचे मुळचे नाव सूर्यपुर असे होते. सुरतेला त्या काळी खुप महत्व होते, इंग्रज, डच, पोर्तुगीज, युनानी, पर्शियन, आफ्रिकन, अरेबियन, चिनी व युरोपियन असे अनेक व्यापारी, तसेच एतद्देशीय व्यापारी सुरतेहुन व्यापार करत. सुरतेत गडगंज संपत्ती होती, अनेक मौल्यवान वस्तुंची विक्री सुरतेतुन होयची. एवढेच काय तर, स्त्रीया आणि गुलामांचाव्यापारही सुरतेत होयचा. आणखीन एक कारण होते, ते म्हणजे सुरतेतुन मक्केला हजच्या यात्रेला जायचे म्हणुन सुरतेला ‘दार उल हज’ असेही म्हणायचे. सुरत अकबराने १५७३ साली जिंकले आणि कालांतराने सुरत हे मुघलांचे आर्थिकदृष्ट्या महत्वाचे शहर बनले.
“का लुटली सुरत महाराजांनी?” असा प्रश्न आजच्या आधुनिकतेच्या आणि भंपक सेक्युलरवादाच्या युगात एखाद्या नवोदितास पडल्यास नवल नाही.
त्या मिळालेल्या लुटीतुन शिवाजीराजांना कोणते महाल बांधायचे होते?……कि कोणता मिनार किंवा ताजमहल बांधायचा होता??
नाही. त्या मिळालेल्या लुटीचा उपयोग राजांनी ‘शिवलंका’ सिंधुदुर्गचे बांधकाम करण्यासाठी तसेच स्वराज्याची इतर कामे करण्यासाठी करुन घेतला.
१६६० पासुन १६६३ पर्यंत शाहिस्तेखानाने स्वराज्यात राहुन नासधुस केली होती, त्याला हे प्रत्युत्तर होते…………
सुरतेला गडगंज संपत्ती असलेले मस्तवाल व्यापारी होते. अर्थातच त्यातले बहुतांश मुघलांच्याच बाजुने होते. केवळ अशाच व्यापार्यांना मराठ्यांनी लुटले. उदाहरण द्यायचे तर, बहिर्जी बोहरा याची संपत्ती ८० लाखची होती. अशाच काही व्यापार्यांना मराठ्यांनी लुटले. इथे एक पथ्य राजांनी पाळले ते म्हणजे, सुरतेत एक मोहनदास पारेख नावाचा एक सज्जन आणि उदार मनाचा माणुस होता. तो पुर्वीच निवर्तला होता. पण त्याचे घर महाराजांनी सुरक्षित ठेवले.
तसेच रेव्हरंड फादर ऍब्रॉस याच्या विनंतीवरुन राजांनी त्याच्या चर्चला अभय दिले.
शहर लुटायच्या आधी राजांनी इनायतखानाला पुर्वसुचना दिली की, तुम्ही आम्ही मागु ती लुट शांतपणे आम्हाला आणुन दिल्यास आम्ही बाहेरुनच निघुन जाऊ. शत्रुप्रदेशाची लुट करताना एवढे पथ्य त्या काळात मुघल किंवा आदिलशाहकडुन पाळले गेले असते का??
इनायतखानाने घाबरुन सुरतेच्या किल्ल्याचा आश्रय घेतला तसेच, महाराजांच्या छावणीत एक वकील बोलणी करण्याच्या निमित्ताने पाठवला आणि त्याच्याकरवी महाराज्यांवर घातकी हल्ला करायचा प्रयत्न केला पण तो फसला. आणि तिथे तो ठार झाला तसेच, महाराजांना काही अपाय झाला या समजुतीने काही कैदी मराठ्यांनी ठार केले.
आता आणखीन एक महत्वाचा मुद्दा……सुरतलुटीच्या वेळी मुघलांचा वार्षिक महसुल २२ कोटींचा होता, तर स्वराज्याचा एक ते सव्वा कोटीचा होता. मुघलांकडे दोन लाख खडे सैन्य होते. त्या हिशोबाने राजांकडे १० हजारांचे सैन्य असणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात ते ४० हजार होते. या एवढ्या सैन्यासाठी पैसा आवश्यकच असतो. स्वातंत्र्याकरता मोठ्या सत्तेविरुद्ध युद्ध करायचे ठरवले तर लहान सत्तेला लुट करावीच लागते. तिथे नैतिक प्रश्न येत नाही.
थोडक्यात सांगायचे तर, लुट करुन शिवाजी महाराजांनी मुघलांना चोख उत्तर दिले तसेच स्वराज्यासाठी अतिआवश्यक असा पैसा उभा केला.
महाराजांनी सुरत लुटल्या नंतरही सुरतेतल्या मुघल सैन्याने मराठ्यांचा एवढा धसका घेतला होता की, सुरतेतील इंग्रज त्यांच्या पत्रात म्हणतात ‘Surat Trembles at the name of Shivaji’
नंतर असे बरेच वेळा झाले की, ‘शिवाजी आला’ अशी अफवा उठायची आणि लोक बचावासाठी सैरावैरा धावत सुटायचे पण, ती अफवाच ठरायची. शेवटी १६७० साली ही अफवा खरी ठरली आणि शिवाजीराजांनी दुसर्यांदा सुरत लुटली.
१६६४ साली सुरत लुटीच्या वेळी तिथला नियुक्त केलेल्या मुघल सुभेदार इनायतखानाचा भेकडपणा दिसून आला. आधी तर ‘शिवाजी सुरतेत येईल’ असे त्याला वाटतच नव्हते आणि जेव्हा मराठे सैन्य आल्याची त्याची खात्री पटली तोपर्यंत उशीर झाला होता. औरंगजेबाने नंतर इनायतखानाची तिथुन हकालपट्टी केली आणि तिथल्या इंग्रजांचा सत्कार केला. सुरतेतुन मुघलांना १२ कोटी महसुल मिळायचा जो औरंगजेबाची बहीण जहानआरा हिच्या खाजगी खर्चासाठी नेमुन दिला होता.
शिवाजी महाराज सुरत लुटण्यासाठी उतिशय गुप्तपणे गेले आणि सुरत सहज लुटुन, मुघल सैन्य तिथे पोहोचण्याच्या आत तिथुन निघुन आले.
शाहिस्तेखानावर हल्ला करुन आणि सुरत लुटुन शिवाजीराजांनी मुघलांना जशास तसे उत्तर दिले.
संदर्भ: शककर्ते शिवराय, लेखक: श्री विजयराव देशमुख
:- सारंग | मऱ्हाष्ट धर्म