अंजनेरीची प्राचीन १६ मंदिरे, नाशिक –
नाशिक पासून जेमतेम वीस एक किमी अंतरावर अंजनेरी गाव आहे. अंजनेरी पर्वताच्या कुशीत पहुडलेले अंजनेरी गाव हनुमान जन्मस्थान म्हणून ओळखले जाते. ह्याच अंजनेरीत यादवकालीन बांधकामाचा उत्कृष्ट नमुना असलेली तब्बल १६ मंदिरे विखुरलेली आहेत. यातली बहुसंख्य मंदिरे ही जैन असून उर्वरित ४ हिंदू मंदिरे आहेत.अंजनेरीची प्राचीन १६ मंदिरे.
आज ही सर्वच मंदिरे बहुतांशी भग्नावस्थेत आहेत. ही सगळी मंदिरे यादवकालीन असून साधारण ११ व्या, १२ व्या शतकात ही बांधली गेली आहेत. तेव्हा देवगिरीचे यादव हे सार्वभौम नव्हते. ते कधी राष्ट्रकूट तर कधी चालुक्यांचे महाअमात्य होते. तेव्हा यादवांची राजधानी नाशिक जवळचे सिंदिनेर अर्थात सिन्नर ही होती. तर अंजनेरी येथे यादवांचीच एक शाखा अधिष्ठित होती. यादवांची इकडील शाखा जैन धर्माचे पालन करत असावी त्यामुळे इथे जैन मंदिरांची संख्या जास्त आहे. इथे नागर, फांसना आणि भूमिज अशा विभिन्न शैलीची मंदिरे आहेत. त्यामुळे मंदिरशैलीचा अभ्यास करणार्यांना इथे पर्वणीच आहे.
अंजनेरीच्या प्राचीन मंदिर समूहामध्ये डावीकडील जैन संकुलात एक आगळावेगळी शिळा आहे. प्रथमदर्शनी तो वीरगळ वाटत असला तो वीरगळ नाही. ती आहे चौमुखी. जैन धर्मात संम्लेखन व्रताला फार महत्व आहे. स्व ओळखणे. अर्थात स्वतःच्या आत्म्याला शरीरबंंधनातून मुक्त करणे. म्हणजेच उपोषण करुन प्राणत्याग करणे. साधकाच्या ह्या व्रताच्या स्मरणार्थ येथे अशा प्रकारची एक शिळा कोरलेली आहे. ह्यात दोन चौकटी असून वरच्या चौकटीत भगवान महावीर आहेत तर खालचे चौकटीत जैन साधक अन्नपाण्याचा त्याग करुन व्रताचे पालन करताना दाखवला आहे. साधकाचे खालचे बाजूस पूर्णपणे खराब झालेला असा अतिशय अस्पष्टसा शिलालेख आहे.
Rohan Gadekar