महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,13,236

१८५७ व तात्या टोपे

By Discover Maharashtra Views: 1398 3 Min Read

१८५७ व तात्या टोपे –

तात्या टोपे यांचा जन्म १८१४ मध्ये नाशिक जिल्ह्यातील येवल्यात झाला. पांडुरंग टोपे यांच्या आठ अपत्यांपैकी तात्या हे दुसरे अपत्य. त्यांचे मूळ नाव रघुनाथ. त्यांचे नाव रामचंद्र असेही ठेवण्यात आले होते. रघुनाथचे वडील पेशव्यांकडे दानाध्यक्षाचे काम पाहण्यासाठी ब्रह्मावर्तास येऊन राहिले. पर्यायाने रघुनाथचे अर्थात तात्यांचे बालपण नानासाहेब पेशवे आणि राणी लक्ष्मीबाई यांच्याबरोबर गेले. पुढे बरीच वर्षे नानांच्या दरबारात तात्या कारकुनी कामांत गुंतलेले होते. १८५७ च्या स्वातंत्र्यसमरात ग्वाल्हेरहून तात्यांनी आणलेल्या सैन्यावर मुख्य सेनापती म्हणून नानासाहेबांनी त्यांचीच निवड केली. त्या वेळी तात्यांच्या कर्तृत्वाचा कस लागला. कानपूरवर चढाई करण्यासाठी तात्या सज्ज झाले.(१८५७ व तात्या टोपे)

१८५७ मधील दिल्ली, लखनौ, जगदीशपूर व कानपूर या ठिकाणच्या उठावांचे सूत्रधार तात्या टोपेच होते. त्यांचा धाडसी स्वभाव, गनिमी काव्याचे अवगत तंत्र, स्वदेशावरची श्रद्धा आणि स्वामिनिष्ठा यांच्या बळावर त्यांच्या तलवारीला धार आली होती. कानपूर, लखनौ, झाशी असे कूच करताना तात्यांचा पराक्रम पणाला लागला. कमकुवत सैन्य, नियोजनाची कमतरता, पैसा-रसद-तोफा या साधनांची कमतरता असताना त्यांना यशापयशाची चव चाखायला लागत होती, पण तात्यांची ध्येयासक्ती प्रचंड होती.

नानासाहेब पेशवे यांचा अज्ञातवास, ग्वाल्हेरच्या लढाईत राणी लक्ष्मीबाईचा पराभव या पार्श्वभूमीवर एकच मराठी वाघ शत्रूला तोंड देत होता. शत्रूवर जरब बसवत, वेळोवेळी इंग्रजांच्या तावडीतून सुटून पुढचे ध्येय गाठण्याचा त्यांचा यत्न इंग्रजांना मेटाकुटीला आणत होता. तात्यांच्या या पराक्रमाची गाथा जगभर पसरली. काही युरोपियन इतिहासकारांनी तात्यांच्या शौर्याचा गौरव त्या काळी केला होता.

तात्यांची एकाकी झुंज थकली, जिंकण्याची आशा लोपली. इंग्रजांपुढे वाकायचे नाही हा निश्चय मात्र कायम होता. तात्या शत्रूपासून बचाव करताना मानसिंग या मित्राच्या आश्रयाला गेले. तात्यांच्या पराक्रमाला थिटी पाडणारी घटना घडली, तात्यांचा मागमूस काढणारी इंग्रजी फौज मानसिंगापर्यंत पोहोचली. मानसिंगाची फितुरी नडली आणि तात्या इंग्रजांचे कैदी झाले.

७ एप्रिल, १८५९ रोजी आरोपांना उत्तर देताना तात्यांच्या चेहेऱ्यावर भीती नव्हती, अपराधीपणा नव्हता, दु:ख तर नव्हतेच, देशाभिमान अन्‌ हौतात्म्याचे समाधान मात्र होते. १८५७च्या स्वातंत्र्ययुद्धातल्या होमकुंडात तात्यांची शेवटची आहुती पडली. १८ एप्रिल, १८५९ रोजी त्यांना मध्य प्रदेशातील शिवपुरी येथे फाशी देण्यात आले. या ठिकाणीच त्यांचा पुतळा उभारण्यात आलेला आहे. तसे तात्या टोपेंचे पुतळे मध्य प्रदेशात अनेक ठिकाणी आहेत. भोपाळला तात्या टोपे नगर (टी.टी. नगर) नावाची पेठ आहे, तात्या टोपे स्टेडियम आहे, शेजारी टोपेंचा भव्य पुतळाही आहे.

माहिती संकलन  –

Leave a Comment