द्वारशाखेवरील 3D शिल्प –
होट्टल मंदिरातील गर्भगृहाच्या तोरणावरील 3D शिल्पाचा उल्लेख यापूर्वी या मालिकेत आला आहे. हे आताचे द्वारशाखेवरील 3D शिल्प आहे अन्वा (ता. भोकरदन जि. जालना) येथील महादेव मंदिराच्या द्वारशाखेचे. अतिशय आकर्षक अशी ही द्वारशाखा. एकुण पाच द्वारशाखा या मंदिराला आहेत. शार्दूल शाखा, पुष्प शाखा, स्तंभ शाखा, पुष्प शाखा अशा क्रमाने चार शाखा आहेत आणि पाचवी छायाचित्रात दिसणारी विद्याहार शाखा. गायन वादन नृत्य करणारे स्त्री पुरूष यावर कोरलेले आहेत. यात मध्यभागी पुरूष आहेत आणि आजू बाजूला छोट्या आकारात स्त्रीया आहेत.
कोपर्याचा वापर करून त्यावर अशी नक्षी कोरायची हे आवाहन शिल्पकाराने लिलया पेलले आहे. आश्चर्य म्हणजे यातील प्रत्येक शिल्प वेगळे आहे. एकच आकृती परत परत डिझाईनचा भाग म्हणून काढलेली नाही. प्रत्येक शिल्पाचा वेगळा विचार केला आहे हे विशेष. या द्वारशाखांवर एका बाजूला विष्णु आणि एका बाजूला लक्ष्मी कोरलेली आहे.
आपण ज्याला एकसारखे बारीक डिझाईन समजतो ते एकसारखे नसते. जवळून बारकाईने निरिक्षण केल्यास त्यातील फरक लक्षात येतात आणि थक्क व्हायला होतंं. एका पुष्पशाखेत कळी पासून अर्ध उमलले, पुर्ण उमललेले, कोमेजलेले अशा सर्व अवस्था दाखवलेल्या आहेत. एक एक मंदिर पहायचे तर किमान एक दिवस तरी पूर्ण घालवला पाहिजे. ज्या अनाम शिल्पकारांनी आयुष्य खर्च करून हे निर्माण केलं त्यांच्यासाठी किमान दिवस तर खर्च करून कलेला दाद द्यावी.किमान दिवस तर खर्च करून कलेला दाद द्यावी.
– श्रीकांत उमरीकर, औरंगाबाद