८ मे १७०७ | शंभूपुत्र छत्रपती थोरले शाहूमहाराज मोगल कैदेतून स्वराज्यात परतले –
छत्रपती संभाजी महाराज यांच्या हत्येनंतर औरंगजेबाने जुल्फिकार खानास रायगड लढवण्यास पाठवून दिले. महाराणी येसूबाई राणीसाहेब यांनी तब्बल दहा महिने रायगड लढवला . रायगड वाचवण्यासाठी व स्वराज्यासाठी येसूबाई राणीसाहेबांनी वैधव्याचे दुःख सहन करत आटोकाट प्रयत्न करत केला. परंतु प्रचंड मोगली सैन्यापुढे येसूबाई राणीसाहेब यांना हार पत्करावी लागली व त्या आपल्या पुत्रासह मोगलांच्या स्वाधीन झाल्या.(८ मे १७०७)
औरंगजेबाच्या मृत्यू पूर्वी त्यांच्या मुलांना आपल्या भवितव्याचे वेध लागले होते.औरंगजेबाच्या महाराष्ट्रातील २७ वर्षाच्या प्रदिर्घ वास्तव्यानंतर अहमदनगर येथे निधन झाले. शहाजादा आजम याला आपल्या पित्याच्या मृत्युची बातमी समजताच तो अहमदनगरला आला व स्वतःस बादशहा घोषित करून तो दिल्लीकडे जाण्यास तयार झाला. जाताना बरोबर येसूबाई राणीसाहेब व शाहुराजांना बरोबर घेण्यास तो विसरला नाही.झुल्फिकारखानाला बरोबर घेऊन त्याला संपूर्ण दक्षिणेचा मुख्य अधिकारी नेमले. येसूबाई व शाहू राजांची काळजी घेणारी झीनतबेगमही बरोबर होती.
पुढे बुर्हाणपुरजवळ मुक्काम पडला असता शाहूराजे व आझम यांची भेट झाली. आजमने पोषाख देऊन त्यांचा गौरव केला.छत्रपती शाहूला सोडण्याचे त्याच्या विचारात नव्हते. कारण मराठ्याचा राजा सोडून तो परत डोईजड होईल याची आजमला भिती होती. परंतु रजपूत सरदार ,काही मनसबदार, या सर्वांच्या मध्यस्थीने शाहुराजांना दोहरा येथून १७ वर्षे ७ महिन्यानंतर कैद मुक्त केले गेले. यावेळी शाहूराजांची सुटका केल्यास मराठी राज्यात वारसासाठी भांडणे सुरू होतील ,हा सुज्ञ विचार करून आजमने छत्रपती शाहूंमहाराजांची सुटका केली होती.
शाहूमहाराजांवर काही अटी घालण्यात आल्या. तुम्ही दिल्लीच्या बादशहाच्या अंकीत म्हणून राज्य करावे.तुमची आई ,भाऊ, व बायका यास आम्हापाशी ठेवावे. तसेच तुम्ही राज्यात बंदोबस्त करावा .बखेडा करणाऱ्या लोकांचे पारिपत्य करावे आणि बादशाही लक्षात ठेवून वागावे. इकडील मुलखास उपद्रव देऊ नये.तुम्ही याप्रमाणे वागता अशी खातरजमा झाली म्हणजे आम्ही दिल्लीस गेल्यावर व तेथे सिंहासनारूढ झाल्यावर तुमची माणसे तुम्हाकडे पाठवून देऊ…नेहमी बादशहाचे हुकूमात वागून प्रसंग पडेल तेव्हा आपण आम्हास मदत करावी. झिनत बेगमने करार चालू असतानाच सांगितले की वतने तुम्ही आताच द्या उद्या आझम शहाची बुद्धी कशी फिरेल सांगता येत नाही. वरील ठरावाने शाहूराजे मोगलांचे मांडलीक होऊन मोगली मनसबदार म्हणून कैदेतून निसटले व महाराष्ट्राकडे वळले.
आता मराठी राज्याचे तीन वारस झालेले दिसून येतात.छत्रपती राजाराम महाराज व महाराणी ताराराणी पासून झालेले शिवाजी( दुसरे ) राजसबाईंचे संभाजी (दुसरे )व छत्रपती संभाजी महाराज व महाराणी येसूबाई यांचे पुत्र छत्रपती शाहूमहाराज.येसूबाई राणीसाहेबा मात्र या वेळी महाराष्ट्रापासून हजारो मैल दूर होत्या.
कैदेत का होईना परंतु आत्तापर्यंत येसूबाईराणी मराठी राज्यात होत्या. आता मात्र दिल्लीसारख्या अत्यंत दूर परकीय राज्यात त्यांना पुढील काळ घालवायचा होता.छत्रपती शिवाजीराजांच्या वेळेपासून ते छत्रपती संभाजीराजांच्या मृत्यूपर्यंतच्या घटना त्यातील येसूबाई राणी यांचा सहभाग, त्यांच्या आयुष्यातील अनेक चढ-उतार यांचे एक महत्त्वाचे पर्व येथे संपले.
इकडे शाहूमहाराज महाराष्ट्रात परत आले .छत्रपती शिवाजीराजांच्या गादीचा वारस, त्यांचा नातू, छत्रपती संभाजीराजे व येसूबाई राणीसाहेब यांचा पुत्र असूनही शाहू महाराजांनी मोगलांच्या छावणीत कैदी म्हणून जीवन व्यतीत केले. औरंगजेबाच्या कैदेत असल्यामुळे मराठ्यांचे वारस म्हणून किंवा छत्रपती शिवाजीराजांच्या गादीचा वारस म्हणून त्यांना कोणत्याही प्रकारचे राजकीय शिक्षण मिळाले नव्हते.जोत्याजी केसरकर व येसूबाईराणीसाहेब यांच्या सहवासामुळे थोडेफार शिक्षण मिळाले तेवढेच काय ते. बाहेरच्या जगाचा कोणताही आणि कसलाही संबंध शाहुराजांना आला नाही. तरीही शाहू महाराजांनी मोठ्या हुशारीने मराठी सरदारांशी, मनसबदारांशी गुप्तपणे नाते जोडून संपर्क ठेवला होता .तब्बल १७ वर्षे ६ महिन्यांनी स्वराज्याचा खरा वारसदार मोगली कैदेतून सुटून महाराष्ट्रात परत आले.
पुढे शंभूपुत्र छत्रपती थोरले शाहू महाराज यांनी तब्बल ४२वर्षे अत्यंत हुशारीने राज्यकार करून आपल्या मातोश्री येसूबाई राणीसाहेब यांची २९ वर्षांनी मोगल कैदेतून सुटका करून घेतली.
संदर्भ – महाराणी येसूबाई राणीसाहेब.
लेखन – डाॅ सुवर्णा नाईक निंबाळकर.