गोव्यातील तांबडीसुर्ला येथिल ८०० वर्षे जुने महादेव मंदिर !
कोकण आणि गोव्याचे एक खास असे वैशिष्ठय आहे. साधारणतः ऑगष्ट ते जानेवारी या काळात, कॅमेऱ्याने तुम्ही नुसत्या आकाशाची जरी छायाचित्रे काढलीत तरी ती चांगली येतात. मग आजूबाजूचे डोंगर, झाडी, नदी, समुद्र, रस्ते असे अलंकारही त्या सोबत असतील तर त्या ठिकाणाला आणि छायाचित्रांना काही वेगळीच खुमारी येते.
गोव्याची राजधानी पणजीपासून ६० / ६५ किलोमीटर अंतरावरील तांबडीसुर्ला येथिल ८०० वर्षे जुने महादेव मंदिर पाहताना मला हे अनुभवायला मिळाले. पश्चिम घाटातील अनमोड घाटाच्या पायथ्याशी, पर्वतराजींनी वेढलेले हे छोटे पण दगडातून कोरलेले सुंदर मंदिर आहे. भव्यता आणि जागृत देवदेवता हे गोव्यातील बहुतेक सर्व मंदिरांचे वैशिष्ठ्य आहे. पण हे मंदिर त्या तुलनेत मात्र छोटे आहे. गोव्यातील यादव राजवटीतील राजे रामचंद्र यांच्या प्रधानाने म्हणजे हेमाद्री याने हे मंदिर बांधले. दख्खन पठारावरून आणलेल्या बेसॉल्ट दगडात कोरलेल्या या मंदिरात ४ खांबांवर हत्ती आणि छतावर आतून कमळे कोरलेली आहेत.
अत्यंत वैशिष्ठयपूर्ण गोष्ट अशी की हे हेमाडपंथी मंदिर, कदंब – यादव शैलीतील बांधकामाचा गोव्यातील एकमेव नमुना असून हे गोव्यातील सर्वात जुने मंदिर मानले जाते. पर्वतराजीत अत्यंत आड आणि दुर्गम ठिकाणी असल्याने, हे मंदिर, पोर्तुगीज आक्रमकांनी केलेल्या बाटवाबाटवीत आणि मंदिरे फोडण्याच्या मोहिमेतून सहीसलामत बचावले.
गोव्यातील अन्य मंदिरांच्या गाभाऱ्यांच्या तुलनेत या मंदिराचा गाभारा अतिशय साधा आहे. पण अत्यंत निरव शांतता, शुद्ध निसर्ग, सुंदर पर्वतराजी यांच्या सान्निध्यातील या मंदिरात आपण थोडावेळ बसलो तरी आपल्याला एक वेगळाच अध्यात्मिक अनुभव लाभतो.
माहिती साभार – Makarand Karandikar