महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 89,10,969

वाडा – थोडक्यात इतिहास.

Views: 4308
12 Min Read

वाडा – थोडक्यात इतिहास.

आपल्या प्राचीनतम इतिहासात पाषाण वास्तूंचे संदर्भ मिळत नसले तरीही वाडा या वास्तू प्रकाराचे विधान किमान गुप्त काळापर्यंत तरी मागे जाणारं असावं असं लक्षात येतं. प्राचीन बौद्ध लेण्यांमधील ‘विहार’ हे मोठ्या वाड्यांचे पूर्वज आहेत असं मानता येईल. प्राचीन ग्रीक आणि रोमन संस्कृतीमध्ये उघडा चौक ठेवून सभोवताली घरं बांधण्याची पध्दत होती. यामुळे सर्व दालनांत हवा खेळती राहून सर्वत्र उजेड ही पोहचत असे.

थोडक्यात काय तर आज ‘वाडा’ या शब्दामुळे नजरेसमोर येणारा, उभा राहणारा वास्तू प्रकार  हा सार्वत्रिक परंपरेचा आविष्कार म्हणता येईल.

मग नंतरच्या काळात, तरीही फार पुरातन आणि प्राचीन, भारतीय वास्तू निर्मितीचे प्राथमिक सिध्दांत सापडतात. अगदी पुराणकालीन ‘शुल्ब सुत्र’ मध्ये सांगितले आहे.

साग्र (Gauge), कित्ता ( Herring bone),  विकारक ( Squint) इ. वीटरचना या डच, इंग्लिश वा फ्लेमीश बाॅंड म्हणून आजच्या अभियांत्रिकी महाविद्यालयातून तसेच विद्यापीठांमधून शिकविल्या जातात. जे इथं घडले तेच आपल्या अत्यंत समर्पक नावे असलेल्या कमानींच्या बाबतीत पण घडलंय.

सहारी (Sarasenic),

नाली (Horseshoe),

कोचकी ( Parabolic),

वृत्तखंडी ( Segmental),

घोडेकाठी ( Corbelled). इ. यासुध्दा इटालियन, फ्लोरेंन्टाईन, व्हेनेन्शियन वा मूर इ नावांनी पुढे युरोप खंडात प्रचलित झाल्या. इ.स. पुर्वकालीन ‘सकलाधिकार’ हा ग्रंथ उपलब्ध आहे. ‘मानसार’ हा द्रविडांचा विशाल ग्रंथ ‘ मान’ या वास्तू-शास्रज्ञाने फार प्राचीन काळी लिहीलेला आहे. धारानगरीच्या ‘राजा भोज’ नी ‘समरांगण सुत्रधार’ हा वास्तूशास्त्रावरील प्रामाणिक, महत्त्वपूर्ण व आधुनिक ग्रंथ रचला. त्यात प्रामुख्याने वास्तुकलेचा विचार केला आहे.

यादवकालीन अखेरच्या साम्राज्यात ‘ हेमाद्री पंत’ उर्फ ‘ हेमाडपंत’ हा प्रधान होता. मोडी लिपीचा निर्माता पण हाच..

एका विशिष्ट बांधकाम प्रणालीचा जनक म्हणून हा प्रसिद्ध झाला. त्याच्या विद्वत्ततेची कल्पना त्याने निर्मिलेल्या, लिहीलेल्या  ‘चतुर्वर्ग चिंतामणी’ या ग्रंथावरुन येते. काष्ठशिल्प युगानंतर पाषाण शैली स्थिरावली. पण ती टिकाऊ होणेसाठी एक आगळीवेगळी वास्तू रचना त्याने अवलंबली: यशस्वीपणे राबवली तसेच वापरात, प्रचारात आणली.

उखळी सांधा (Pivot), माठीव (Ashlar), खांडकी (Coursed), कळी (Random), चिरेबंदी (Solid), इष्टिकास्तंभ (Pilaster) हे सगळे त्यांचेच प्रसिद्ध शोध. साधारणपणे आठव्या शतकात ‘समेध’ (Cement) विरहित रचना जी आजही आपण मंदिर स्थापत्य शैलीत अनुभवत आहोत. ती ‘हेमाडपंती’ रचना इतिहासात अमर झाली.

लाॅर्ड मेकाॅले याने आपल्या संपूर्ण भारताच्या सर्व्हे रिपोर्ट मध्ये एके ठिकाणी असं नमूद केले आहे की, हिंदुस्थानची प्रगती जर आपल्याला रोखायची असेल तर त्यांचं शास्त्र, विज्ञान आणि धर्मग्रंथ यांच्यापासून हा समाज वेगळा करा. यांची ‘गुरुकुल’ शिक्षण पध्दती जर संपवली तर आपण इथे आपली वसाहत निर्माण करु शकू… कालांतराने हेच घडले आणि तेव्हापासून आपण पाश्र्चात्यांच्या विद्येची व ज्ञानाची पोपटपंची आणि घोकंपट्टीच करत आलो आहे.

निसर्गानं शेकडो, हजारो वर्षे व्यतीत करुन ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे झालेल्या लावारसांपासून दगड निर्माण केला आहे. ज्याचा योग्य तो वापर मध्ययुगीन स्थापत्य कलेमध्ये आपल्याला दिसतो.

खरं सांगायचं तर निवारा निर्माण करणं, त्याची पूर्तता करणे ही निसर्गतः सोपी गोष्ट… पण सायन्स आणि टेक्नाॅलाॅजीच्या अवास्तव अवडंबरापोटी आपण तीच गोष्ट क्लिष्ट आणि अवघड करून टाकली आहे. प्रगत तंत्रज्ञान वापरून आपण दगडाची फरशी बनवतच आहोत ना…?

मग याच तंत्रज्ञानाचा वापर करून घेतला तर आपण दगड पण घडवून घेऊ शकतोच न…?

आणि प्रत्येक बांधकामासाठी दगड घडवलेच पाहीजेत असं पण नाही. निव्वळ कारागिर नाहीत म्हणून दगडाकडे पाठ फिरवून चालणार नाही. दगड घडविणे, बांधकाम करणे हे वेळखाऊ आणि खर्चिक आहे.  म्हणून आपण दगडच नाकारत आहोत. जरा सुज्ञपणाने विचार करून बघा… सुगरण किंवा चिमणी सारखे छोटे छोटे पक्षी आजुबाजुच्या उपलब्धीं  ( Available Natural Resources) मधूनच संपूर्णपणे वातानुकूलित असे उबदार आणि वाॅटर टाईट घरटं बनवतात आणि ते पण निसर्गात अजिबात ढवळाढवळ न करता… आणि आपण …?

आपण  आपल्या वातावरणाची, निसर्गाची, पृथ्वीची विल्हेवाट लावून उन्हाळ्यात तप्तपणे रसरसणारी, पावसाळ्यात पावसाचा आनंद घरच्या घरी देणारी (गळणारी), हिवाळ्यात थंडीने गारठून जाणारी काॅंक्रीटची  घरं बांधण्याची धडपड करतो.

कारणं काय…? तर कारागीर नाहीत, खर्चिक, वेळखाऊ आहे. इ. इ. असो.

वाडा म्हणजे काय…???

सामान्यतः एक गृह वास्तू प्रकार. आपल्या ऐतिहासिक पार्श्वभूमीचा थोडा तर्कसंगत, साफल्याने विचार केला तर आपल्या वास्तूशैलीतील वाडा या निवासी वास्तू प्रकाराचे नियोजन, प्रयोजन आणि महत्त्व आपल्याला समजून घेणं सोपं जाते.

कुटूंब प्रमुख, कर्ते, कर्तबगार पराक्रमी पुरुषाच्या मुलूखगिरीसाठी, एखाद्या मोहीमेसाठी बाहेर पडल्यावर उर्वरित कुटुंबाचं इतर आक्रमक, चोर, दरोडेखोरांच्या पासून बचाव करण्यासाठी, त्यांना सुरक्षित राहता यावं यासाठी निवासी वास्तू सभोवताली एक संरक्षक उंच भिंत  बांधलेली असे.  अशा समाजमान्य प्रतिष्ठित, धनिक, सरदार, इनामदार, सरंजामदार, यांच्या क्षेत्रफळाने तौलाणिकदृष्टीने मोठ्या असणारे  निवासस्थानास ‘वाडा’ हा सन्मान दर्शक शब्द वापरला जातो.

सभोवतालच्या जाडजूड भिंतीमध्ये क्षेत्रफळ, विस्तारावर अवलंबून संरक्षणात्मक प्रयोजनासाठी दोन, चार, सहा अशा टेहळणी बुरुजांचा समावेश केला जायचा आणि त्यामुळे या निवासस्थानांना गढिसदृश रुप   प्राप्त होत असे. क्वचित प्रसंगी परकियांच्या आक्रमणाचे वेळी सभोवताली असलेली रयत देखील अशा वाड्यांत आश्रयाला जायची.

वास्तूचे मुख्य प्रवेशद्वार मुख्यत्वे जाड लाकडी फळ्यांपासून बनवले जायचे. हे वास्तूचे मुख्यद्वार सभोवताली असलेल्या संरक्षक भिंतीमध्ये असायचे.

कुटूंब प्रमुखांच्या इतमामाला साजेशी अशी सौंदर्यपूर्ण रचना आणि माठीव बांधकामात असे. अशा दरवाजांची चौकट मात्र बहूतेक ठिकाणी सभोवताली उपलब्ध असलेल्या कठिणतम दगडामध्ये घडवून, कोरीव कामामध्ये केली जायची. चौकटीच्या दोन्ही बाजूला आकर्षक असे माठीव, महिरपी  कोनाड्यांची योजना असे. चौकटीच्यावर मध्यभागी किर्तीमुख, गजलक्ष्मी, अथवा श्री गणेश यांचं शिल्प कोरले जात असे. वाड्याचे दरवाजांवरही सुशोभीकरणासाठी कलाकुसर केलेली असे. हे दार आतून बंद करणेसाठी आतून साखळकोंड्याची व मोठ्या लाकडी अडसराची योजना केलेली दिसत असे. दैनंदिन सुलभ वापरासाठी यामध्ये एक छोट्या दिंडी दरवाजाची पण योजना असे. जर यजमानांना नौबतीचा मान असेल तर या दरवाजाच्या वरील मजल्यावर नौबतखाना अथवा नगारखाना असे. कर्तृत्ववान पराक्रमी लोकांच्या गौरवाचा तो एक भाग असे.

मुख्य दरवाजा मधून आत प्रवेश केल्यावर साधारणपणे वाड्यातील दालनांची विभागणी पारंपरिक पद्धतीने करण्यात आलेली आपणास आढळते, प्रवेशद्वारानंतर समोर मोठा चौक असे. चौकाच्या समोरच्या ओसरीवर वाडा मालकांची बैठक असे. डाव्या-उजव्या बाजूला  कचेरी, म्हणजे दिवाणजी व कारकुनांचा फड असे. येणाऱ्या नवागतांची प्राथमिक चौकशी व आगतस्वागत येथेच होत असे. याच चौकात, दर्शनी संरक्षक भिंतीचे आतील बाजूस घोड्यांचा पागा व जनावरांच्या गोठ्याची व्यवस्था करण्यात आलेली असे.

मालकांच्या बैठकीच्या उजवीकडील ओवरीमध्ये प्रामुख्याने देवघर अथवा देवखोली असे. बहूतेकवेळा देवखोली, देवघराभोवती लाकडी जाळी असे. या ओवरीतून पुढे गेल्यावर दोन्ही बाजूला वरील मजल्यावर जाण्यासाठी जीने असत. बैठकीच्या पुढे, आत गेल्यावर मध्यघर अथवा माजघर असे. प्रामुख्याने यांचा उपयोग घरातील स्रियांचे विश्रांती स्थान म्हणून होत असे.

माजघर ओलांडून पुढे गेल्यावर आणखी एक चौक असे त्या सभोवताली असलेल्या दालनांमध्ये स्वयंपाकघर (Kitchen), जेवणघर (Dining), बाळंतीणीची खोली, कोठी खोली (Store Room) अशी रचना केलेली असे. याच चौकांमध्ये ‘तुळशी वृंदावन’ असायचे. या व्यतिरिक्त मुख्य इमारतीच्या पासून लांब अशी स्वछतागृहे असतं. कधीकधी या बाजूला घरकाम करणाऱ्या लोकांच्या येणे जाणे साठी एखाद्या परस-दाराची योजना असे. काही वाड्यांमध्ये परसदारी म्हणजे मुख्य इमारतीच्या पिछाडीवर जनावरांच्या गोठ्याची व्यवस्था केलेली पण आढळून येते.

जिना चढून वरती गेल्यावर ‘सदर’ किंवा सभेचा दिवाणखाना असे. यामध्ये गायन, किर्तन, भजन, नृत्य इ. कार्यक्रम होत असत. यामध्ये स्त्रियांच्या बैठकीची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आलेली असे.स्रियांना मनमोकळेपणाने कार्यक्रमाचा आस्वाद, आनंद घेता यावा यासाठी जाळीदार पडदे अथवा नक्षीदार जाळ्यांची योजना असे.अधिक संपन्न व रसिक गृहस्थांच्या वाड्यांमध्ये चित्रशाळा, रंगशाळा, आरसे  महाल अशा वेगवेगळ्या दालनांची योजना असुन याच मजल्यावर शयनकक्ष व खजिन्याच्या खोलीचा समावेश असे.

सर्वसाधारणपणे वाड्यांचे बांधकाम किमान दुमजली केले जात असे.एखादा भाग गच्ची (Open Terrace)  म्हणून मोकळा ठेवला जाई. उर्वरीत भाग  कौलारू छप्पराने आच्छादित केला जात असे.सर्वसाधारणपणे जिना असलेल्या खोलीच्या आसपासच्या खोल्या अथवा दालने बहुमजली योजलेली असतं.यावरील जागेचा वापर बिकट परिस्थिती मध्ये परिसर टेहळणीसाठी केला जात असावा.

वाड्याचा तळमजला भक्कम दगडी चिरेबंदी बांधणीचा असे. बरेचदा यामध्ये तळघराची (Basement) योजना केलेली असे. ज्याचा प्रामुख्याने वापर खलबतखाना अथवा गुप्त मसलतींसाठी केला जात असे. बरेचदा एखाद्या राजकीय कैद्याची तात्पुरती तुरुंग व्यवस्था पण करता येत असे.

वाड्याचे मुख्य रचनेमध्ये लाकडी खांब, तुळ्या (तुळई), (Wooden Columns and Beams) चा सांगाडा (Framed Structure) असे. तळमजल्यावरच्या भिंती अदमासे पाच फुटांपर्यंत रुंद असत. दगड, माती, चुना,मातीच्या वीटा  लाकडाचा वापर सढळपणे मुक्त हस्ताने केलेला दिसतो. वरील मजल्यांच्या बांधकामासाठी प्रामुख्याने तत्कालीन परंपरागत मातीच्या वीटेचा वापर केलेला दिसतो. जसजशी मजल्यांची संख्या वाढत जाईल तसतशी भिंतीची रुंदी कमी होत जाऊन सर्वात वरच्या मजल्यावर बरेचदा फक्त लाकडी खिडक्या, झरोके व लाकडी फ्रेम मध्ये लाकडीच फळी भरलेली असे…

बांधकाम साहित्यात चुना व मातीमध्ये भाताचा कोंडा, मेथीदाणा, गुळ व तुरटीचा वापर समेधाचे (Cement) टिकाऊपण, मजबुती वाढवून भिंतीमधील ओलसरपणा टाळण्यासाठी Additives म्हणून विशिष्ट  प्रमाणात केला जात असे. ज्याला आजच्या अभियांत्रिकी परिभाषेत आपण (Damp proof course) म्हणतो. त्याचप्रमाणे ही योजना असे.

#अंतर्गत #सजावट

वाड्याचे अंतर्गत सजावटीत प्रामुख्याने दोन, तीन प्रकारांचा वापर सर्रास पणे केलेला आढळतो.

१ लाकडी काम.

२ दगडी काम.

३ भित्तीशोभन काम.

१. लाकडी काम

काष्ठयुग जरी संपले तरी लाकडाची भारवहन शक्ती सर्वज्ञात झालेली होती. त्यामुळेच लाकडी कामाचा वापर पुढे पण सर्रासपणे चालूच राहीला. वाड्याचे मुख्य व अंतर्गत दरवाजे भक्कम लाकडी जाड फळ्यांमधे केले जात असत. धनिक व रसिक  आणि प्रतिष्ठित मुख्य दरवाज्यावर सहसा कोरीवकाम आढळून येते. यामध्ये शुभचिन्हे म्हणजे कमलपुष्प, स्वस्तिक, इत्यादीसह वेलबुट्टी, वेलपत्ती, समावेश हमखास असे.

याव्यतिरिक्त लाकडी खांब, तुळई, हस्त ( Brackets). यामध्ये पण विविध पक्षांच्या आकृत्यांसहीत वेलपत्ती इ. चा समावेश होतो. सुरूचे खांब महीरपीच्या कमानी, कोनाड्यांच्या सुशोभीकरणासाठी महिरपी कमानींचा वापर केलेला असे. याशिवाय खुंटाळी, सुटल्या खुंट्या, व जाळ्यांसाठीपण लाकडी काम वापरून अंतर्गत सजावटीचे मान राखले जायचे.

२ दगडी काम

वाड्यांचे मुख्य दाराची चौकट व दर्शनी भागातील बांधकाम मुख्यतः माठीव (Ashlar Masonry) मध्ये रेखण्यात येत असे. तिथुनच आत बाहेर रस्ता फरसबंदी करणेसाठी छावणीच्या घडीव दगडांची योजना केलेली असते. मुख्य इमारतीच्या जोत्याला एका विशिष्ट उंचीवर विशिष्ट गलते ( Moulding) असे. तसेच लाकडी खांबांच्या आधारशिला म्हणून जो उखळी सांध्याच्या (Pivot Joint) चर्या दगडातही गलते (Moulding) घडवून कमलाकृती पण कोरलेल्या आढळतात. बहूतेक वेळी मुख्य दारावर दगडामध्ये किर्तीमुख, गजेंद्रलक्ष्मी (यादव कालीन) गणेशमूर्ती ( पेशवेकालीन) कोरलेल्या आढळतात.

३ भित्तीशोभन

वाड्याचे अंतर्गत सजावटीत भित्तीशोभनास अनन्यसाधारण महत्त्व आहे. बहूधा भित्तीशोभना मध्ये चित्रकलेच्या आधाराने विविध प्रकारचे शिकारीचे प्रसंग, प्रमुख लढायांमधील पुर्वजांचे पराक्रम, कृष्णलीला, दशावतार यामधील प्रसंग चितारलेले असतं. याशिवाय शिकार केलेल्या वन्य प्राण्यांच्या भुसा भरलेली मुंडकी, विविध प्राण्यांच्या चर्मपटांचा, वेगवेगळ्या हंड्या, झुंबरांचा, रंगबिरंगी बिलोरी काचेच्या तावदानांचा मुक्त समावेश असायचा.

उत्तर पेशवेकालीन म्हणजे साधारणतः अठराव्या शतकात दिल्ली व गुजरात अशा दोन शैली मुख्यत्वे लाकूड कामात ठळकपणे विकसित झालेल्या आढळत असल्या तरीही वाड्यांची विधाने, बांधकाम साहित्य व रचनातंत्र दोन्ही शैली मध्ये समानच असे.

चौदाव्या व पंधराव्या शतकातील प्राचीन वाडे आता फक्त पैठण मध्ये आढळतात.

थोडक्यात काय..?

तर ‘वाडा’ या शब्दोच्चार केल्याने नजरेसमोर उभा रहाणारा निवासी वास्तू प्रकार आपल्या पुर्वजांच्या पराक्रमी कारकीर्दीचा,  प्राचीन व सार्वत्रिक परंपरेचा कलाविष्कार आहे असे नक्की म्हणता येते.

©इंद्रजितसिंह वि घोरपडे हिंदुराव गजेंद्रगडकर.

छायाचित्र सौजन्य Indrajitsingh Ghorpade

Gajendragadkar Ghorpade wada, Gajendraga

Leave a Comment