महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,22,149

शिंदे घराण्याचं वैभवशाली प्रतिक नाग आणि नाण्यांवर असणारं नागशिल्प

By Discover Maharashtra Views: 1694 2 Min Read

शिंदे घराण्याचं वैभवशाली प्रतिक नाग आणि नाण्यांवर असणारं नागशिल्प –

९६ कुळातील शिंदे हे क्षत्रिय मराठा घराणे आहे, सेंद्रक या नावापासून शिंदे हे नाव प्राप्त झाले. सेंद्रक हे अगदी पूरातन काळापासून व सर्वश्रुत असे घराणे आहे. शिंद्यांच्या देवकात समुद्रवेल आहे, त्यावरुन सिंधूमधून समुद्रमार्गे ते कोंकणात आले असावेत.शिंदे घराण्याचं वैभवशाली प्रतिक.

शिंदे हे सूर्यवंशी शेष शाखेतील, तसेच हे शिंदे हे नागवंशी आहेत, नाग या शब्दा बद्दल इतिहासकारांची अनेक मते आहेत. नागवंशी आहेत म्हणजे त्यांचा जन्म नागयोनीतून झाला असे नाही. शिंदेंच्या राजचिन्हात देखील नागशिल्प आहे, त्याचबरोबर ग्वाल्हेरच्या जयविलास पॅलेसच्या मुख्य द्वारावर देखील द्वारशिल्प म्हणून नाग विराजित आहे. तसंच एक पोस्टकार्ड देखील आहे ज्याच्या वरील बाजूस उजव्या कोपऱ्यात Gwalior हे नाव छापलेलं असून त्याखाली शिंदे हे सुर्यवंशी क्षत्रिय कुळातील असल्याने सूर्याचं चित्र आणि बाजूला दोन नाग विराजित आहे. तसेच शिंद्यांची जी नाणी आहेत त्यात सुद्धा त्यांनी नागाला पुज्यस्थानी मानून त्या नागदेवतेला नाण्यांवर स्थान दिलं आहे.

यातील हे पहिलं नाणे असून हे अलिजाबहाद्दर श्रीमंत जयाजीराव शिंदे यांच्या काळातील असून १८४३ – १८८६ याकाळातील आहे. याच्या उजव्या बाजूला भाला असून डाव्या बाजूस त्रिशूळ आहे व त्या दोन्हींच्या मध्यात नाग असून त्यावर *जी* हे अक्षर आहे. नाण्याचं वजन ५.९४ ग्रॅम आहे.

यातील हे दुसरं तांब्याचं नाण आहे ते माधवराव शिंदेंच्या कार्यकाळातील असून इ. स. १८८६ – १९२५ या काळातील आहे. त्याचं मूल्य अर्धा पैसा आहे आणि बिंदूमय गोलाकार वर्तुळात मध्यभागी नागराज विराजित असून त्याच्या विळख्यात एक बाजूला भाला व दुसऱ्या बाजूस त्रिशूळ आहे. बाह्य भागी कडांना बिंदूमय गोलाकार वर्तुळ असून त्यात श्री. माधवराव मा. शिंदे * अ. बहाद्दर म्हणजेच अलिजाबहाद्दर. अशी अक्षरं आहेत. या नाण्याचं वजन ३.९० ग्रॅम असून त्याची जाडी २०.३० मिमी आहे.

आज ही शिंद्यांच्या देव्हार्यात नागाची पूजा अर्चना मोठ्या मनोभावे केली जाते.!

संदर्भ- क्षत्रिय घराण्याचा इतिहास, के बी देशमुख
नाण्यांचे फोटो:- Nagesh Sawant

रोहित पेरे पाटील
©इतिहास_अभ्यासक_मंडळ

Leave a Comment