महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,98,004

रायगडावर आडबाजूला एक स्मारक

Views: 1876
7 Min Read

रायगडावर आडबाजूला एक स्मारक –

रायगडावर आडबाजूला एक वृंदावन – स्मारक आहे. फार कमी जणांना ते माहीत आहे. ते इतक्या आडबाजूला आहे, की माहिती असल्याशिवाय किंवा शोधल्याशिवाय ते बघताच येणार नाही. म्हणजे सहजासहजी ते नजरेस पडत नाही. मला ते बघायचे होते. यावेळी रायगडावर गेल्यावर जमलं तर त्या ठिकाणी जाऊन यायचे असं ठरवलं होतं. ते ठिकाण खूप आडबाजूला आहे, रिस्क घेऊन शोधावं लागेल ह्याची कल्पना होती मात्र तिथे जाण्याचा, ते शोधण्याचा अनुभव अतिशय विलक्षण होता की सांगावासाच वाटतो.

दुर्गमहर्षी गो.नी.दाण्डेकरांनी रायगडावरची एक अज्ञात समाधी प्रकाशात आणली होती. तेच हे वृंदावन. ‘दहा दिवस दहा दुर्ग’ ही मोहीम करून २६ फेब्रुवारी १९६४ रोजी गोनीदा जेव्हा रायगडावर आले होते, तेव्हा रायगडावरच्या धर्मशाळेचा राखणदार तुकाराम शेडगे याच्या सांगण्यावरून ते त्याच्याबरोबर ही समाधी पाहायला गेले. त्यावेळी बाबासाहेब पुरंदरेही गडावर होते. त्यांना गोनीदांनी जाऊन बोलावून आणले. दोघांनी अनेक तर्कवितर्क करून ही समाधी छत्रपति शिवाजी महाराजांच्या पत्नी सौभाग्यवती काशीबाईसाहेबांची असावी असे मांडले. गोनीदांनी या प्रसंगाचे वर्णन ‘दुर्गभ्रमणगाथा’, ‘दुर्गदर्शन’ या पुस्तकांत केलेले आहे तसेच या समाधीबाबतचे विवेचनही आपल्या ‘शिवतीर्थ रायगड’ या पुस्तकात केले आहे.

गोनीदांच्या पुस्तकांत वाचल्यामुळे अनेक वर्षांपासून ही समाधी बघण्याची इच्छा होती. ही समाधी कोंडेखळीच्या खळग्यात, वाघदरवाजाच्या उत्तरेस, बाराटाकीजवळच्या दारुकोठारांच्या पश्चिमेस आहे असे काही रायगडविषयक पुस्तकांत वाचलेले होते. त्यामुळे ही समाधी कुठल्या भागात असावी ह्याचा अंदाज होता. वाघदरवाजापाशी जायचं मग तिथून ही समाधी शोधायची असे ठरवले. हिरकणी टोकावरून आल्यावर बालेकिल्ला – राजनिवास संकुल मनसोक्त फिरलो आणि कुशावर्त तलावाच्या भागात येऊन वाघदरवाजाकडे जाण्यासाठी उतरू लागलो.

वाघदरवाजा यापूर्वी एकदाच पाहिला होता. तेव्हा सोबत माहितगार लोकं होती. त्याही पूर्वी एकदा सहकुटुंब रायगडावर आलो असताना एकटाच वाघदरवाजाकडे जाण्याचा प्रयत्न केला होता मात्र माहितीच्या अभावी जाता आले नव्हते. त्यावेळी मी पंधरा वर्षांचा होतो. यावेळी वाघदरवाजाकडे जाण्याची वाट माहिती होती मात्र अनेक दिवसात तिकडे फारसे कोणी फिरकले नसल्यामुळे वाटा जराशा बुजलेल्या होत्या आणि ढोरवाटांमुळे एकदोनदा जरासे गोंधळायला झाले. पण काही मिनिटातच वाघदरवाजाची तटबंदी दिसायला लागली. वाघदरवाजापाशी पोहोचल्यावर तिथे बराच वेळ थांबलो. तिथे नेटवर्क होते. तिथेच कॉलेजमधल्या एकाचा फोन आला त्याला म्हटलं, मी कुठे आणि कुठल्या परिस्थितीत आहे याची तुला कल्पनाही येणार नाही. वाघदरवाजात थोडी विश्रांती घेतल्यावर मग म्हटलं समोरच्या खळग्यात जितकं जाता येईल तितकं जाऊ आणि समाधी बघू कुठे आहे. तसा झाडीत शिरून जाऊ लागलो.

नगारखान्यातून समोर झाडीने भरलेला जो मोठा खोलगट भाग दिसतो त्याला म्हणतात कोंडेखळीचा खळगा. रायगडाच्या प्रचंड माथ्यावर असे अनेक खळगे म्हणजे खोलगट भाग आहेत. त्यांना लवणही म्हणतात. त्यांमधून पाणी वाहून कड्यावरून खाली पडतं. या खळग्यांना विविध नावं आहेत. त्यांपैकी हा कोंडेखळीचा खळगा आकाराने – उताराने सर्वात मोठा आहे आणि रायगडावर सर्वाधिक झाडी याच भागात आहे. या खळग्याच्या तोंडाशी आहे वाघदरवाजा. वाघदरवाजाहून झाडीत शिरून चढू लागलो. गच्च झाडी, पाण्याच्या प्रवाहामुळे झालेले खोलगट भाग, दगडं. समोर झाडीशिवाय काहीच दिसायला मार्ग नाही. वाघ, जनावर वगैरे दिसल्यावर पाखरं जसा सूचक आवाज करतात तसा आवाज करू लागली. लगेच कळलं की पाखरांचा तो आवाज माझी चाहूल लागल्यामुळे झाला. झाडीतून जरा मोकळ्यात आलो तर समोर तिन्ही बाजूला चढ. वरचे कोणतेच अवशेष आता दिसत नव्हते. एक वाट अशी नाहीच. वाकडंतिकडं वर चढू लागलो. दुपारचा एक वाजून गेलेला. डोक्यावर तळपणारं ऊन, पोटात भूक, पाठीवर जड बॅग. मनाशी म्हटलं ती समाधी जाऊदे, आधी इथून वर पोहोचलो म्हणजे झालं. वाघदरवाजापासून परतलो असतो तरीही चढ चढून दमणारच होतो. कशाला इथे आलो. पण आता वर चढण्याशिवाय पर्याय नव्हता. जर सोबत कोणी असतं तर पुढे आलंही नसतं. असे अनुभव अनेकदा आलेले आहेत. एकदोनदा जरा अवघड जागा होत्या. जर धडपडलो आणि काही लागलं तर आसपास कुत्रंपण नाही. खरंच हे वेडं साहस झालं. तेव्हा महाराजांच्या स्मरणाने आणि आपण रायगडावर आहोत या भावनेनं बळ दिलं. माझ्या ह्या छंदाने अनेकदा माझी अशी परीक्षा घेतली आहे.

वर जगदीश्वर मंदिराच्या मार्गावर पोहोचण्यासाठी वाकडंतिकडं चढत होतो. समाधीचा विचार पूर्णपणे सोडला होता. तेव्हा अनपेक्षितपणे समोर झाडीत ती समाधी दिसली. समाधान मिळालं, पण आनंदून जाणाच्या अवस्थेत नव्हतो. उघड्यावर असलेल्या या समाधीपाशी उन्हात थोडा वेळ थांबलो. सगळीकडून फोटो काढले. या समाधीवर एक झाड उगवलेले होते. गोनीदांनी काढलेल्या फोटोंत ते दिसते. वर माझ्या पोस्टची जी लिंक दिली आहे त्यात ते फोटो आहेत. ते झाड उखडल्यामुळे समाधीचे दगडं निखळले आहेत. जवळ सावली नसलेल्या एका झुडपापाशी जरा दम खाल्ला. मग वर चढत निघालो. थोड्या वेळानंतर दमून मुख्य मार्गावर आलो. नंतर जगदीश्वराच्या मंदिरात आणि महाराजांच्या समाधीजवळ खूप वेळ बसलो.

रायगडावर एकटा हिंडत असताना पर्यटक, स्थानिक, विक्रेते, कर्मचारी, पोलीस वगैरे विविध प्रकारचे अनेक लोक भेटलेत. त्यांच्याशी गप्पा झाल्या. चांगला अनुभव आला. नाशिकहून आलो, एकटा फिरतोय, त्यात हिरकणी टोकावर जाऊन आल्याचं आणि हे कोंडेखळीचा खळगा आख्खा चढून आल्याचं लोकांना माहीत व्हायचं तेव्हा त्यांना आश्चर्य वाटायचं. मग माझी कॉलर टाईट व्हायची. पण मगाशी म्हटल्याप्रमाणे हे वेडं साहस झालं. अशा अवघड जागी, तेही पहिल्यांदाच आल्यावर एकटं फिरू नये. काही लोकं काळजीपोटी तर काही नुसतं टोमणे मारण्यासाठी काहीबाही बोलतील. काळजीपोटी बोलणाऱ्यांविषयी आपुलकी आहे. मात्र पूर्ण तयारीनिशी, जागेचा तसेच दिशांचा अंदाज आणि इतर माहिती घेऊन जाऊन आलो. स्वतःच्या क्षमतेवर योग्य विश्वास ठेवून स्वतःच्या जबाबदारीवर हे करायचं.

पुस्तकांमध्ये या समाधीच्या जागेविषयी फारच ढोबळमानाने सांगितलेले आहे. ज्या काही पुस्तकांत या समाधीचा उल्लेख आहे त्यात कोंडेखळीचा खळग्यात, वाघदरवाजाच्या उत्तरेस एवढंच दिलेलं आहे. गोनीदांनीही समाधी कुठे आहे हे नीट, नेमकं सांगितलेलं नाही. ही समाधी पाहण्यासाठी वाघदरवाजापाशी उतरून मी आलो तसं पूर्ण खळगा चढून जाण्यापेक्षा जगदीश्वर मंदिराच्या मार्गावर उजवीकडे उतरून जाणं तुलनेत सोपं आहे. तिथूनही एक टेपाड उतरून जावं लागतं, फारसं जवळ आणि लगेच लक्षात येण्यासारखं नाही. पण समाधीपाशी असं उतरून जाणच सोयीचं आहे. वाघदरवाजा इथून खूप लांब आहे. ही समाधी कोणाची असावी, कोणाची नसावी, गोनीदांनी काय लिहून ठेवलंय हा स्वतंत्र विषय आहे.

– प्रणव कुलकर्णी.

Leave a Comment