आचरे कोट
कोकणातील अनेक भुईकोट काळाच्या ओघात नष्ट झाले असुन आज या कोटांची नावे केवळ इतिहासाच्या पुस्तकात आढळुन येतात. इतकेच नव्हे तर स्थानीक लोकदेखील या कोटाबाबत वा त्याच्या माहितीबद्दल अनभिज्ञ आहे. आचरा खाडीच्या काठावरील एकेकाळी बंदर म्हणुन प्रसिद्ध असलेले आचरे गाव आज प्रसिद्ध आहे ते येथील रामेश्वर मंदिरामुळे. पण येथे असलेला आचरे कोट काळाच्या ओघात पुर्णपणे नष्ट झाला असुन लोकांच्या पुर्णपणे विस्मरणात गेला आहे. आचरा गाव मालवण शहरापासुन २० कि.मी.अंतरावर असुन कोटाचे कोणतेही अवशेष गावात अथवा परिसरात दिसत नसल्याने त्याची नेमकी स्थान निश्चिती करता येत नाही. आचरा गावातील रामेश्वर मंदिरात चार तोफा आजही पहायला मिळतात. यातील एक मोठी तोफ मंदिराच्या आवाराबाहेर असलेल्या विहिरीजवळ असुन उर्वरीत तीन तोफा मंदिराच्या आवारातील जेवण बनविण्याच्या ओसरीत आहेत.
आचरा कोट कोणी व केव्हा बांधला याची माहिती मिळत नसली तरी इ.स.१५५५ ते इ.स.१८२४ असा तब्बल २७० वर्षाच्या कालखंडात त्याचा उल्लेख येतो. आदिलशाही कालखंडात आचरे येथील देसाई सावंताप्रमाणे स्वतंत्र राजे म्हणुनच राहत होते. इ.स.१५५५ मध्ये पोर्तुगीज व्हाईसरॉय आल्बुकर्क याने बांदयावर स्वारी केली असता आदिलशाहीच्या सैन्याबरोबर त्याची आचरे येथे गाठ पडली. यावेळी काही काळापुरते आचरे शहर पोर्तुगीजांच्या ताब्यात गेले. इ.स.१६६४ मधील शिवाजी महाराजांच्या कोकण स्वारीनंतर येथील नाईक साटम पळून पोर्तुगीजांच्या आश्रयाला गेले. मराठा गादी वारसा हक्काच्या भांडणानंतर आचरे करवीरकरांच्या ताब्यात आले व त्यांनी इ.स. १७०७ मध्ये हा प्रांत रामचंद्रपंत अमात्य यांना दिला. इ.स.१७३४ मध्ये संभाजी आंग्रे यांनी आचरे कोट ताब्यात घेतल्याची तक्रार भगवंतराव अमात्य यांनी सातारा दरबारात केली असता संभाजी आंग्रे यांनी दिलेल्या सफाईत अमात्य यांनी भांडण करून राजापुरवर हल्ला केल्याचा प्रत्यारोप केला आहे.
इ.स.१७४४ मध्ये राणोजी नाईक साटम यांनी पोर्तुगीजांना आचरे ते विजयदुर्ग हा भाग ताब्यात घेण्यासाठी २६०० लोक मदतीस देण्याची कबुली दिल्याचे आढळते. इ.स.१८१२ मध्ये इंग्रज व करवीरकर यांच्यातील तहानुसार सिंधुदुर्ग इंग्रजांच्या ताब्यात गेला असला तरी आचरे कोट मात्र करवीरकरांच्या ताब्यात होता. इ.स.१८१४ मधील एका पत्रात आचरे येथुन करवीरला जाणारा महसुल सिंधुदुर्ग येथील मामलेदाराने थांबवल्याने तो करवीरला महाराजांना पाठविण्याबाबतचा उल्लेख येतो. इंग्रज अधिकारी कर्नल इम्लाक याने देवगड नंतर ७ एप्रिल १८१८ रोजी आचरे कोटाचा ताबा घेतला पण १८१२ च्या तहानुसार आचरे पुन्हा करवीरकरांच्या ताब्यात दिले. १३ जानेवारी १८२४ मधील एका पत्रानुसार आचरे येथे सिंधुदुर्ग किल्ल्यातुन १८ मोठया व ११ लहान तोफा आणल्या गेल्या. यातील ६ मोठया व २ लहान अशा ८ तोफा आचरे येथे ठेवुन उर्वरित तोफा नंतर हलविण्यात आल्या. यातील केवळ ४ तोफा आज रामेश्वर मंदिराच्या आवारात पहायला मिळतात.
माहिती साभार
सुरेश किसन निंबाळकर
सदर संकेतस्थळाचे सर्व हक्क राखिव असून येथे प्रकाशित झालेला कोणताही लेख अथवा छायाचित्र हे लेखकाच्या किंवा प्रकाशकाच्या परवानगीशिवाय वापरता येणार नाही याची नोंद घ्यावी. असे केलेले आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.