महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 89,01,303

आड किल्ला

Views: 4034
3 Min Read

आड किल्ला…

अकोले तालुक्यातील कळसूबाई डोंगररांग तशी सर्वाना परिचित आहे. या डोंगररांगेच्या पूर्वेला औंढा, पट्टा, आड आणि बितंगगड हे किल्ले वसले आहेत. औंढा हा या रांगेतील शेवटचा किल्ला. घोटी- भंडारदरा रस्त्यावरील टाकेद गावातून म्हैसमाळ घाटमार्गे घोटी-ठाणगाव हे अंतर ५२ किमी तर सिन्नर मार्गे ७५ कि.मी आहे. ठाणगाव ते आडच्या पायथ्याशी असलेली वरची आडवाडी हे अंतर सुमारे १० कि.मी. असून पवनचक्क्यांमुळे येथे सर्वत्र रस्त्यांचे जाळे विणले गेले आहे. आड या गावाजवळ असणाऱ्या या किल्ल्याविषयी कुणाला फारशी माहित नाही. वरच्या आडवाडीतून रस्त्याने थोडे पुढे गेल्यावर महानुभव पंथाचा एक आश्रम आहे. येथुन एक रूळलेली पायवाट आपल्याला अर्ध्या तासात गडावर घेऊन जाते व तुटलेल्या तटबंदीतुन आपला गडावर प्रवेश होतो. गडावर जाण्याचा हा सर्वात जवळचा मार्ग आहे. या शिवाय गावातून किल्ल्याकडे जाणारी अजुन एक वाट आहे. आडवाडीच्या बाजुने आड किल्ल्याची एक सोंड खाली उतरते त्यावरून अगदी सोप्पा चढ चढल्यावर एक वाट आडवी उजवीकडे वळते आणि गावातून निघाल्यापासून एक तासात आपण गडमाथ्यावर पाऊल ठेवतो.

गडाची उंची समुद्रसपाटीपासून ३५०० फुट तर पायथ्यापासुन साधारण ९०० फुट आहे. गडाचा माथा एक विस्तीर्ण पठार असुन गडाचे एकुण क्षेत्रफळ ४० एकरपेक्षा जास्त आहे. आडवाडीच्या बाजुने गडावर जाताना या वाटेवर डाव्या बाजुला कड्यात एक नैसर्गिक विस्तीर्ण गुहा असून आत आडूबाई देवीचे मंदिर आहे. या गुहेला लागुन अजुन एक खोदीव गुहा व शेजारी पिण्याच्या पाण्याचे टाके असून मुक्कामासाठी हि जागा अतिशय सुंदर आहे. येथुन उजवीकडे वळल्यावर गड माथ्यावर जाण्यासाठी २०-२५ कातळात कोरलेल्या पाय-या चढाव्या लागतात. यातील काही पाय-या ढासळलेल्या असल्याने थोडे जपुन चढावे लागते. गडाची बरीच पडझड झाली असुन एका ठिकाणी तुरळक तटबंदी दिसते. गडाच्या माथ्यावर फिरताना काही ठिकाणी उद्‌ध्वस्त वास्तूंचे अवशेष दिसुन येतात. यातील एका अवशेषात दगडी शिल्प असुन त्याची मोठया प्रमाणात झिज झाल्याने त्यातील मुर्ती ओळखु येत नाही. या मूर्तीसमोर दिपमाळेसारखा एक मोठा दगडी दिवा ठेवलेला आहे. किल्ल्याच्या मधील उंच भागावर दोन वाड्याच्या जोत्याचे अवशेष असून यातील एका चौथऱ्यावर एक समाधी आहे. याशिवाय गडाच्या पश्चिमेला अजुन एका वास्तुचे भिंतीसह अवशेष दिसुन येतात.

गडावर सहा ठिकाणी पाण्याची एकुण सोळा टाकी असुन गुहेकडील एक टाके वगळता इतर पाच ठिकाणी जोडटाकी आहेत. या सर्व टाक्यात पाणी जमा करण्यासाठी खडकावर खोदलेले चर दिसुन येतात. याशिवाय गडावर एक मोठा पावसाळी तलाव आहे. गडावरील पाण्याची सोय व सर्वत्र विखुरलेले अवशेष पहाता गड नांदता असताना गडावर मोठया प्रमाणात वस्ती असावी. गडावर उत्तरेकडे कोकण दरवाज्याचे अवशेष आहेत. आज या दरवाजाची केवळ चौकट उभी असुन कमानीचे ढासळलेळे दगड आजुबाजुला पहायला मिळतात. किल्ल्याच्या माथ्यावरुन आपल्याला पुर्वेला औंढा पट्टा, बितनगड, म्हसोबा डोंगर या कळसूबाई रांगेचे दर्शन होते तर पश्चिमेला डूबेरगड दिसतो. संपुर्ण गडफेरी करण्यास एक तास पुरेसा होतो. इतिहासाचा मागोवा घेतला असता या गडाबाबत नोंदी आढळत नाहीत.


माहिती साभार
सुरेश किसन निंबाळकर

सदर संकेतस्थळाचे सर्व हक्क राखिव असून येथे प्रकाशित झालेला कोणताही लेख अथवा छायाचित्र हे लेखकाच्या किंवा प्रकाशकाच्या परवानगीशिवाय वापरता येणार नाही याची नोंद घ्यावी. असे केलेले आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

Leave a Comment