रामचंद्र अमात्यकृत – आज्ञापत्र !!
पुस्तक लेखमाला क्रमांक -१४
आज्ञापत्र!
आताच्या काळात जसे आपणस आता देशाच्या सरकार ने दिलेले काही नियम आणि अटी पाळतो. तसेच शिवकाळात छत्रपतींनी रयतेसाठी दिलेली लिखित आज्ञा अथवा राजज्ञापत्र म्हणजेच आज्ञापत्र!! हा ग्रंथ म्हणजे शिवकाळातील स्वराज्याची मराठेशाहीतील राजनीतीच!
शिवप्रभूंनी निर्माण केलेल्या स्वराज्याचा अर्थ लावण्यासाठीच आज्ञापत्र ची निर्मिती केली गेलेली आहे.शिवछत्रपतींच्या राजनीती,अर्थनीती, समाजकारण, वनसंपदा,आरमार, दुर्गबांधणी, त्यांची जपवणूक, अश्या अनेक गोष्टींची या जाणता राजाने केलेल्या जनकल्याणासाठी केलेल्या कलमांचा उहापोहच जणु!
कौटिल्याचे जसे अर्थशास्त्र प्रसिद्ध आहे तैसेचि शिवरायांच्या चरित्रांचा अभ्यास करताना आज्ञापत्र या ग्रंथास मराठीत महत्व आहे!!
“आज्ञापत्र” हा छोटेखानी ग्रंथ हुकूमतपन्हा रामचंद्र अमात्य यांनी सातारा छत्रपतींच्या आज्ञेनुसार केला.या आज्ञापत्र चा लेखनकाळ इ.स. १७१५ हा आहे.
यात त्यांनी राजा,राजधर्म,राज्यव्यवस्था,प्रधान, प्रशासन, साहूकार,वतन आणि वतनदार, वृत्ती आणि इनामे, दुर्ग, आरमार आणि शिवछत्रपतींच्या राजकीय धोरणांचा समावेश केलेला आहे.
अमात्यांनी तब्बल ५० वर्षे आणि स्वराज्याच्या पाच छत्रपतींच्या सोबत असलेला राजकीय अनुभव या ग्रंथात ओतून ,त्यांच्या तेजस्वी लेखणीने हा ग्रंथ समृद्ध केलेला आहे.आज्ञापत्र या ग्रंथातून रयतेने, शासकीय वा लष्करी अधिकारी,अर्थतज्ञ यांनी काय शिकावे याची तत्वे दिलेली आहेत.शिवछत्रपतींच्या कार्याचे संपूर्ण प्रतिबिंब या ग्रंथातून आपणास अभ्यासायला मिळते.
आज्ञापत्र मध्ये एकूण ९ प्रकरणे आहेत. त्याचे दोन भाग पडतात. पहिल्या भागात दोन प्रकरणात “इतिहास” आणि दुसऱ्या भागात असलेली सात प्रकरणे ही “राजनीती” वर लिहिलेली आहेत.
आताच्या काळात याची मूळ प्रत उपलब्ध नाही आहे. तरीही या ग्रंथाची एकूण ३ हस्तलिखिते उपलब्ध आहेत. १ प्रत श्री समर्थ वाग्देवता मंदिर, धुळे आणि २ प्रती राजवाडे संशोधन मंडळ, धुळे इथे आहेत. या प्रती सर्वात जुन्या आहेत. या सर्व प्रती देवनागरी भाषेतील असून, त्यांची आताही योग्य जपवणूक केली गेलेली आहे.
“आज्ञापत्र” चा मूळ गाभा हा खालील वाक्यातून आपल्या लक्षात येतो.
हें राज्य म्हणजे केवळ ईश्वरदत्त।
उन्मत्त द्रव्य सर्वथैव भक्षूं नये।
नित्य नूतन संपादावे।
खजिना म्हणजे राज्याचे जीवन।
साहूकार म्हणजे राज्याची व राजश्रीची शोभा।
संपूर्ण राज्याचे सार ते दुर्ग।
ज्याजवळ आरमार त्याचा समुद्र।
“शिवछत्रपतींचे विचार किती थोर आणि काळाच्या पुढे जाऊन करण्याचे होते. हेच या ग्रंथातून दिसून येते!”
सध्या उपलब्ध असलेले, अभ्यासकांनी अभ्यासावे असे श्री विकास खोले(१९८८) आणि रा. चिं. ढेरे (१९६०) यांनी संपादित केलेल्या ग्रंथाना विशेष स्थान आहेच.
ढेरे यांनी संपादित केलेल्या ग्रंथातून तर त्यांनी अनेक गोष्टींचा उहापोह केलेला आहे.यात त्यांनी “शिवराजनीतीची गंगोत्री” या प्रकरणात तर अधिष्ठान , महालिंगदास, मालोजीराजे,श्रीगिरी याविषयी इतकी अफाट माहिती दिलेली आहे की आपण वाचून स्तब्ध होऊन जातो!
त्यानंतर आताच्या एक दोन वर्षात यावर श्री केदार फाळके सर यांनी दोन महत्वाचे ग्रंथ लिहिलेत.
पहिला ग्रंथ ८ फेब्रुवारी २०१७ या वर्षी रामचंद्र अमात्य यांच्या पुण्यतिथी च्या दिवशी प्रकाशित केलेला “आज्ञापत्र- श्रीशिवछत्रपतींची राजनीती” हा जवळपास ४०० पानांचा महदग्रंथ!! आज्ञापत्र या स्वतंत्र अभ्यासाच्या विषयवार मी पाहिलेला आजवरचा हा एकमेव ग्रंथ !! त्यांनतर लगेचच १४ मे २०१८ या वर्षी संभाजी महाराज जयंतीला फाळके सरांनी “आज्ञापत्र” या विषयावरच अजून एका ग्रंथाची निर्मिती केलीय. त्यांनी या ग्रंथाचे नाव “शिवराजनीती” ऐसे ठेवलेले आहे.या ग्रंथात तर त्यांनी चक्क श्रीसमर्थवाग्देवता मंदिर येथील देवनागरी हस्तलिखिताची प्रतच आपल्यासाठी दिलेली आहे.ही प्रत त्यांनी पान क्रमांक ५० ते १३२ अश्या एकूण ८२ पानांमध्ये दिलेली आहे.त्याचे संपूर्ण संपादन त्यांनी या अमूल्य ग्रंथात केलेले आहे. श्री केदार फाळके सरांचे याविषयी मानावे तितके आभार कमीच आहे. त्यांनी या विषयावर अभ्यास करणाऱ्यांसाठी खूपच मोठे काम करून ठेवले आहे.
या एका महत्वाच्या विषयावर असलेल्या अभ्यासपूर्ण संदर्भ ग्रंथाची माहिती व्हावी हीच या लेखमालेतुन असलेली एकमेव इच्छा!
पुढील लेखमालेत आपण शिवचरित्राच्या अजून काही महत्वाच्या साधनांचा धांडोळा घेणार आहोत.
आपणही योग्य संदर्भ ग्रंथ वाचन करीत राहावे आणि योग्य माहितीचे आकलन करीत राहावे हाच या पोस्ट मधील एकमेव उद्देश.
बहुत काय लिहिणे?अगत्य असू द्यावे.
किरण शेलार