महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,37,176

आगाशी कोट

By Discover Maharashtra Views: 3716 2 Min Read

आगाशी कोट…

आगाशी येथे आता प्रत्यक्ष कोणताही आगाशी कोट अथवा त्याचे अवशेष अस्तित्वात नाहीत परंतु महिकावती बखरमध्ये बिंब राजाच्या कारकिर्दीत आगाशी येथे आगाशी कोट असल्याचे उल्लेख आढळतात. आता असलेले भवानी शंकर मंदिर आणि त्याच्या शेजारील तलाव याच परिसरात हा कोट अस्तित्वात असावा नाही म्हणायला तलावाच्या बांधकामात काही प्रचंड दगड व प्राचीन मूर्ती आढळून येतात ज्या तेथील प्राचीन कोटाचे अस्तित्व काही प्रमाणात सिद्ध करतात.

ऐतिहासिक नोंदीप्रमाणे वसई किल्ल्यावरील चिमाजी आप्पांच्या १६ मे १७३९ च्या विजयानंतर सन १७३९ ते १७५० या कालखंडात श्री भवानी शंकर मंदिर आगाशीची निर्मिती करण्यात आली. या मंदिराची उभारणी चिमाजी आप्पांचे आगाशी अर्नाळा प्रांताचे सरसुभेदार श्री शंकराजी केशव फडके यांनी केली. श्री भवानी मंदिराला लागून असणारा भवानी तलावही याच कालखंडात बांधण्यात आला. या तलावातील शिल्पे व नक्षीकाम आजही गतवैभवाची साक्ष देत आहे. सध्या जीर्णोद्धाराच्या नावाखाली या मंदिराचे मूळ सौंदर्य पार लयाला गेले आहे. मंदिर विस्तारासाठी आवारातील प्राचीन दीपमाळ उखडली गेली आहे. गेली १०० वर्षाहून अधिक काळ आगाशी शंकर मंदिराच्या आवारातील शी शंकराजी फडकेपंत व इतर मुत्सद्दी शिलेदार व त्यांच्या नातेवाईकांच्या समाध्या व स्मृतिस्थळे प्रचंड दुरावस्था व दुर्गंधीच्या विळख्यात सापडलेल्या होत्या. किल्ले वसई मोहिमेचे प्रतिनिधी डॉ. श्रीदत्त राउत व त्यांचे सहकारी यांनी अखंड प्रयत्न आणि श्रमदानाने या समाध्या घाणीतून व झाडीतून मोकळ्या करत गतवैभवाचे सरंक्षण करण्याची भक्कम कामगिरी केली आहे.

वसई प्रांतातील परकीय आक्रमणांना व जुलमाना धडा शिकवून स्वराज्यासाठी प्राण वेचणाऱ्या या ऐतिहासिक महापुरुषांची याद व पराक्रम येणाऱ्या पिढीना कळlवा यासाठी धडपडणारी किल्ले वसई मोहीम कौतुकास पात्र आहे. कोट अथवा किल्ला म्हणुन पाहण्यासारखे येथे काहीच नसले तरी भवानी शंकर मंदिरावरील शिल्पे केवळ पाहण्याजोगीच नाहीत तर दुर्मिळ आहेत. खासकरून तेथील मंदिरावर असणारे कामधेनु आणि कल्पवृक्ष हे शिल्प सहजासहजी कुठे आढळत नाही. किल्ला पाह्ण्यासाठी अस्तित्वात नसला तरी एका सुंदर ऐतिहासिक स्थानाला भेट देण्याचा आनंद घेण्यासाठी एकदा तरी येथे यायला हवे.

@सुरेश निंबाळकर

Leave a Comment