आंबोळगड…
रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालूक्यात आंबोळगड व यशवंत गड हे दोन सागरी तटरक्षक दूर्ग आहेत. यातील रत्नागिरी जिल्ह्याच्या जवळपास शेवटच्या टोकाला असलेले दुर्गरत्न म्हणजे आंबोळगड. किल्ल्यापासून ५ कि.मी. अंतरावर असलेल्या मुसाकाजी या प्राचिन बंदराच्या संरक्षणार्थ तसेच जैतापूर खाडीमार्गे होणाऱ्या सागरी वाहतुकीवर नजर ठेवण्याकरता समुद्रावर आंबोळगड हा गढीवजा किल्ला तर खाडीवर यशवंतगड किल्ला अशी दुर्गजोडी बांधण्यात आली. रत्नागिरीहून आडीवरे- नाटे-आंबोळगड हे अंतर ६० कि.मी.आहे तर राजापूर-नाटे-आंबोळगड हे अंतर ३६ कि.मी.आहे. यशवंतगडहून पुढे गेल्यावर ५ कि.मी. अंतरावर आंबोळगड गाव आहे. गावात प्रवेश करताना डावीकडे गावाला लाभलेला समुद्रकिनारा दृष्टीस पडतो.
गावातुन गगनगिरी महाराजांच्या आश्रमाकडे जाताना एस.टी. स्टँडजवळ डाव्या बाजुला एका लहानशा उंचवट्यावर किल्ल्याची उध्वस्त तटबंदी दिसते पण किल्ल्याचे नेमके प्रवेशद्वार लक्षात येत नाही. या उंचवट्यावर असलेल्या विजेच्या खांबाच्या दिशेने वर चढले असता दोन बुरुजांमध्ये लपवलेले उध्वस्त प्रवेशव्दार दिसते. या दरवाजासमोर आडवी भिंत बांधुन रणमंडळाची रचना करण्यात आली आहे. आंबोळगड व साटवलीचा किल्ला या दोन्ही किल्ल्यांची बांधणी एकसारखी आहे. चौकोनी आकाराच्या या गडाचे प्रवेशद्वार एका कोपऱ्याला असुन त्या शेजारी दोन बुरुज व उर्वरीत तीन कोपऱ्यात तीन बुरुज अशी या गडाची रचना आहे. किल्ल्याची कधीकाळी १२ ते १५ फुट उंच असणारी तटबंदी पुर्णपणे कोसळलेली असुन तिचे ६-७ फुट उंचीच्या ढिगाऱ्यात रुपांतर झाले आहे. किल्ल्याच्या पुर्व व उत्तर बाजुस अर्धवट बुजलेला खंदक असुन किल्ल्याचे क्षेत्रफळ एक एकरपेक्षा कमी आहे. किल्ल्याच्या मध्यभागी वडाचे एक मोठे झाड असुन या झाडाखाली एक फुटलेली तोफ़ पडलेली आहे. झाडाच्या आजुबाजुला काही उध्वस्त वास्तुंची जोती व एक समाधी वृंदावन पहायला मिळते. झाडामागे एक आयताकृती कोरडी पडलेली विहीर असुन या विहिरीच्या बाजूला दोन दगडी ढोणी आहेत. किल्ला फ़िरायला अर्धा तास पुरेसा होतो.
किल्ल्यापासून पुढे जाणाऱ्या रस्त्याने कडयावर गेल्यावर गगनगिरी महाराजांचा मठ आहे. या कडयावरुन समोर पसरलेला अथांग समुद्र डोळ्याचे पारणे फेडतो. इतिहासात या किल्ल्याच्या आसपास घडलेल्या कोणत्याच महत्त्वपूर्ण घडामोडींची नोंद नाही. हा किल्ला कधी बांधला ते नक्की सांगता येत नाही पण १६००च्या आसपास अर्जुना नदीतून होणा-या जलवाहतुकीच्या देखरेखीसाठी खाडीमुखावर यशवंतगडाच्या जोडीने आंबोळगड किल्ला बांधला असावा. रत्नदुर्गाच्या दक्षिण दिशेला असलेल्या राजापूर बंदराला शिवकाळात खूपच महत्व होते. राजापूर येथील जैतापूर बंदर हे स्वराज्याच्या अखत्यारीत सुसज्ज बंदर होते. शिवरायांनी इ.स. १६६४ साली जैतापुराच्या खाडीत मोठ्या प्रमाणावर जहाजे बांधण्याची सोय केली. ऐतिहासिक नोंदीनुसार इ.स.१६७६ मध्ये शिवाजीमहाराजांच्या सैन्याची सिद्दी आणि मोघल यांच्या विरुद्ध चकमक झाली, सिद्धी आणि मोगलांनी जैतापूर जाळले, त्यावेळेस मराठे यशवंतगडाच्या आश्रयाने लढले. इ.स. १६९० मध्ये किल्ले आंबोळगड कान्होजी आंग्रे यांच्याकडे असल्याचा पुरावा सापडतो. इ.स. १८१८ मध्ये कर्नल इमलॉक याने मराठ्यांकडून हा किल्ला जिंकला. १८६२ नंतर आंबोळगडावर असलेली वस्ती उठली.
@सुरेश निंबाळकर