महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,24,719

छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकनंतर…

By Discover Maharashtra Views: 3796 6 Min Read

छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकनंतर…

छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकनंतर लगेच  म्हणजे ८ जून १६७४ रोजी आपल्या एका पूर्वपत्नीशी सामंत्रीक विवाह केला होता, ८ जून १६७४ रोजी केलेला हा सामंत्रीक वैदिक विवाह ऐतिहासिक मोडतोड करून सप्टेंबर महिन्यात दुसऱ्या राज्याभिषेकसमयी तथाकथित शैवविवाह म्हणून चर्चिला जातो. आपण या तथाकथित शैवविवाहाच्या पाया असलेल्या इंग्रज आणि डच नोंदीची चिकित्सा केली पाहिजे..

आदरणीय प्राच्यविद्यापंडीत शरद पाटील यांनी आपल्या ” शिवाजीच्या हिंदवी स्वराज्याचे खरे शत्रू कोण – महमदी की ब्राह्मणी ? ” या पुस्तकात तथाकथित शैवविवाह संदर्भातील त्या प्रकरणात पान क्रमांक ८० वर तळटिपेत गुरुवर्य केळुसकर गुरुजी यांच्या तळटीपेचा संदर्भ दिलेला आहे.

प्रथम आपण आदरणीय प्राच्यविद्यापंडीत शरद पाटील यांनी तळटिपेतील दिलेला संदर्भ पाहू –

” केळुसकर त्यांच्या उपरोक्त ग्रंथात पा.४१०-४११ वरील तळटीप २ मध्ये सांगतात … अभिषेकसमारंभ झाल्यावर त्यांनी ( शिवाजीने ) आपला आणखी एक विवाह करविला. असेही ह्या व्यापाऱ्यांच्या ( इंग्रज व डच ) लेखांवरून कळते’ तो अस्पृश्येशी होता काय ?

अस्पृश्येशी होता काय ? हे वाक्य आदरणीय प्राच्यविद्यापंडीत शरद पाटील यांचे आहे, गुरुवर्य केळुसकर गुरुजी यांचे नाही. याचा अर्थ आदरणीय प्राच्यविद्यापंडीत शरद पाटील यांचा देखील हा परिपूर्ण इतिहास नसून त्यांचा निव्वळ प्रश्नार्थक तार्किक सिद्धांत होता हे स्पष्ट होते.

आता आपण गुरुवर्य केळुसकर गुरुजी यांनी आपल्या शिवचरित्रात दिलेली तळटीप विस्तृतपणे पाहू ” इंग्रज व डच व्यापाऱ्यांच्या ह्या वेळच्या लेखांवरून असे कळते की, महाराजांनी व्रतबंधविधी आटोपल्यावर आपला आणखी एक विवाह करविला, हा अर्थात त्यांचा तिसरा विवाह होय. हा विवाह त्यांनी वेदमंत्र म्हणावयास लावून करविला असा जेध्यांच्या शकावलीत उल्लेख आहे. अभिषेकसमारंभ झाल्यावर त्यांनी आपला आणखी एक विवाह करविला, असेही ह्या व्यापाऱ्यांच्या लेखावरून कळते ”

गुरुवर्य केळुसकर गुरुजी यांनी आपल्या तळटिपेत व्रतबंध विधीचा उल्लेख केला असून त्यासंदर्भात माहिती अशी, जेधे शकावलीमधील नोंदी, जेष्ठ शुद्ध ४ ( २९ मे १६७४ ) घटी ५ अवल साली राजश्रींची मुंज ( व्रतबंध विधी ) झाली. जेष्ठ शुद्ध ६ शनिवारी ( ३० मे १६७४ ) समंत्रीक विवाह केला. जेधे शकावलीच्या या नोंदीनुसार इतके स्पष्ट होते की छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्रतबंध संस्कारानंतर शिवछत्रपतींनी आपल्या पूर्वपत्नींशी समंत्रीक विवाह केला, यास दुजोरा म्हणून English Factory Records मधील नोंद देखील सुसंगत आहे..

आता आपण गुरुवर्य केळुसकर गुरुजी यांच्या तळटिपेतील इंग्रज आणि डच व्यापाऱ्यांच्या नोंदीची समकालीन साधनांच्या आधारे चिकित्सा करू..

गुरुवर्य केळुसकर गुरुजी यांनी दिलेली तळटीपेची भाषारचना पाहता त्यांनी ही तळटीप पहिल्या राज्याभिषेक संदर्भात दिलेली आहे हे स्पष्ट आहे शिवाय या नोंदीत कोणत्याही नवीन विवाहाची नोंद तसेच तथाकथित शैवविवाहाचा कसलाही उल्लेख नाही. आदरणीय प्राच्यविद्यापंडित शरद पाटील यांनी ही तळटीप आपल्या लेखनाचे निष्कर्ष आधीच काढून प्राथमिक चिकित्सा देखील न करता नंतर वापरलेली आहे असे दिसते. आदरणीय प्राच्यविद्यापंडीत शरद पाटील यांनी ही तळटीप संदर्भ म्हणून वापरलेली आहे, त्यामुळे सुस्पष्ट निष्कर्ष असताना देखील चिकित्सा करायची गरज नसताना त्या नोंदीची चिकित्सा करणे अनिवार्य होऊन जाते.

हेन्री ऑक्झेंडन हा इंग्रज वकील, व्यापारी शिवराज्याभिषेक समयी रायगडावर उपस्थित होता, त्याने शिवछत्रपतींना आणि युवराज संभाजीराजेंना नजराणा देखील दिलेली नोंद आहे. हेन्री ऑक्झेंडन याने राज्याभिषेक समयी घडलेल्या घटनांचा वृत्तांत आपल्या डायरीत नमूद केला असून त्याची नोंद Engish Factory Records मध्ये Henry Oxindon’s Narrative या मथळ्याखाली आलेली आहे. हेन्री ऑक्झेंडन याने राज्याभिषेकानंतर शिवछत्रपतींनी जो विवाह केला त्याबद्दल नोंद करून ठेवली आहे, तीच नोंद गुरुवर्य केळुसकर गुरुजी आणि आदरणीय प्राच्यविद्यापंडित शरद पाटील यांनी वापरली आहे.

हेन्री ऑक्झेंडन आपल्या ८ जूनच्या नोंदीत लिहतो ” The Rajah was married to a fourth wife without any state or ceremony, and doth every day distrubates his alms to the braminy”

या नोंदीचा अर्थ असा की ” राजाने समारंभाशिवाय चौथ्या बायकोशी विवाह केला. ब्राह्मणांना दान दक्षिणा देण्याचा क्रम चालू आहे ”

हेन्री ऑक्झेंडनच्या नोंदीवरून स्पष्ट होते की ” शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकानंतर ८ जून रोजी आपल्या ( चौथ्या ) पूर्वपत्नीशी पुन्हा समंत्रक विवाह केला, हा विवाह काही अनपेक्षित व्यक्तिगत अडचणीमुळे लांबणीवर टाकावा लागला होता ”

डच व्यापाऱ्यांची नोंद देखील हीच माहिती नोंदवते.

उपरोक्त चिकित्सेवरून एक गोष्ट स्पष्ट होते की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकनंतर ८ जून रोजी आपल्या पूर्वपत्नीशीच विवाह केला असून, कोणताही नवीन किंवा तथाकथित शैवविवाह केलेला नाही. त्याआधीही शिवछत्रपतींनी राज्याभिषेक समयी आपल्या पूर्वपत्नींशीच विवाह केलेला आहे त्याच्या नोंदी उपलब्ध आहेत. ८ जून १६७४ रोजी शिवछत्रपतींनी आपल्या पूर्वपत्नीशी केलेला समंत्रीक विवाह आदरणीय प्राच्यविद्यापंडित शरद पाटील यांनी हेतूपरस्पर इतिहासाची मोडतोड गुरुवर्य केळुसकर गुरूजी यांच्या तळटिपेचा आधार घेत सप्टेंबर महिन्यात दुसऱ्या राज्याभिषेक संदर्भात तथाकथित शैवविवाह म्हणून चर्चीला आहे..

● संदर्भ –

१) English Factory Records, Henry Oxindon Narrative
२) Dutch Factory Record
३) जेधे शकावली
४) शिवकालीन पत्रसार संग्रह २
५) छत्रपती शिवाजी महाराज ( उत्तरार्थ ) – इतिहासाचार्य वा.सी.बेंद्रे
६) छत्रपती शिवाजी महाराज – गुरुवर्य कृ.अ. केळुसकर
७) शिवाजीच्या हिंदवी स्वराज्याचे खरे शत्रू कोण महमदी की ब्राह्मणी – प्राच्यविद्यापंडीत शरद पाटील

माहिती साभार – राज जाधव

Leave a Comment