अग्नि | आमची ओळख आम्हाला द्या –
मूर्ती ची खरी ओळख पटवण्यासाठीची जिज्ञासा आणि विषयाच्या मुळाशी जाऊन विचार करण्याच्या वृत्तीने व्हाट्सअप ग्रुप आणि फेसबुक पेज सुरु केले. मंदिर व मूर्ती शास्त्राचा अभ्यास सुरू केला. बरेच लोक जोडले गेले. या जोडलेल्या अभ्यासा मित्रांनी खजुराहो येथील विष्णुमूर्ती म्हणून ओळखली जाणारी मूर्ती ग्रुप वर पोस्ट केली आणि नेहमीप्रमाणे तिची चिकित्सा होऊन तावून-सुलाखून ती अग्नि मूर्ती असल्याचे सिद्ध झाले.
विष्णू म्हणून ओळखला जाणारा हा अग्नी श्रीकृष्णासारखा देहुडा उभा आहे. उजवा पाय तिरपा ठेवून डावा पाय काटकोन आकृती वाकवून डाव्या पायाचा भार त्याने अंगठ्यावर पललेला आहे. मूर्ती चतुर्भुज असून उजवा खालचा हातात अभयमुद्रेत आहे.उजवा वरचा हात भंगला असून डाव्या वरचा हातात कमळ आहे. डावा खालचा हात बोटापासून भंगला आहे. त्यामुळे त्यातील आयुध लक्षात येत नाही. अग्नीच्या डोक्यावर जटा मुकुटात असून तो अतिशय रेखीव आहे. चेहऱ्यावर हास्य असून नेत्र, नासिका, ओठ, हनुवटी इत्यादी अवयव उठावदार व ठसठशीत कोरलेली आहेत. अग्निने आपली मान डावीकडे किंचितशी झुकवलेली आहे.
उजवा कान भंगला असून डाव्या कानातील चक्राकार कुंडल खांद्यावर स्थिरावलेले आहे. गळ्यात ग्रीवी, हार सूत्र ,केयुर, कटकवलय ,कटीसूत्र,उरूद्दाम, मुक्तद्दान इत्यादी अलंकार इतक्या खुबीने कोरलेले आहेत की, पहात असताना ती आभूषणे मूर्तीच्या अंगावर खरोखरीचे आहेत की काय? असा भास निर्माण झाल्यावाचून राहत नाही. नेसूच्या वस्त्राच्या दोन्ही बाजूने रुळणाऱ्या मोत्यांच्या माळा गुडघ्यापर्यंत लोंबकळत सोडलेल्या आहेत.उजव्या पायाच्या घोट्याच्या थोडे वर एक विशिष्ट प्रकारचा रेखीव अलंकार आहे.
गळ्यात यज्ञोपवीत आहे. श्रृंगावर पुष्पांच्या आकृती प्रभावलयासम दिसतात. एकंदरीत पाहता मूर्तीचे सर्वच अवयव प्रमाणबद्ध व रेखीव आहेत. दोन्ही पायाच्या जवळ अग्नीच्या शक्ती स्वधा आणि स्वाहा सालंकृत उभ्या आहेत. उजव्या पायाजवळील शिल्प भंग ल्यामुळे ते नेमके काय आहे? याचा अर्थबोध होत नाही. पादपिठावर दोन्हीकडे दोन सेवक अंकित केलेले आहेत. मधोमध अग्निज्वाला दर्शविल्या आहेत. त्यामुळे वरील सर्व लक्षणे पाहता, हि मूर्ती विष्णूची नसून अग्निची असल्याने त्यास अग्नीचे संबोधने उचित ठरेल.
उपरोक्त मूर्ती समूहावर आल्यानंतर नेहमीप्रमाणेच सोनवटकर सरांनी त्याची चिकित्सा केली. सुरवातीस प्रदीप म्हैसेकर दादा यांनी ती अग्नि असल्याचा दुजोरा दिला आणि चर्चेअंती ही मूर्ती विष्णूची नसून अग्नीचा आहे यावर एकमत झालेले आहे.
समुहावरिल यांनी हि मूर्ती उपलब्ध करून दिली त्याबद्दल त्यांचे आभार
डाॅ.धम्मपाल माशाळकर.
मूर्ती अभ्यासक,मोडीलिपी व धम्मलिपी तज्ञ सोलापूर