अग्निवृष | आमची ओळख आम्हाला द्या –
पाटेश्वर हे सातारा जिल्ह्यातील महादेवाच्या डोंगराच्या कुशीत असलेले ठिकाण असून शिवलिंगाचे विविध प्रकार एकाच जागी आढळणारे ठिकाण म्हणून याचा उल्लेख केला तरी अतिशयोक्ती होणार नाही. पाटेश्वर डोंगर माथ्यावर एकूण तीन लेणी समूह व एक मंदिर समूह आहे. याठिकाणी आपणाला विविध प्रकारच्या मूर्ती व शिवलिंगाचे विविध प्रकार पहावयास मिळतील. याच लेणी समूहात एक वैशिष्टपूर्ण मूर्ती आहे अग्निवृष.
वैदिक देवतांमध्ये इंद्रानंतर अग्नीला स्थान दिले गेले आहे. देवांना आहार पोहोचवण्याचे काम अग्नीचे आहे. अग्नीच्या तीन रूपांची गार्हपत्य आहवनीय आणि दाक्षिणात्य कल्पना जुनी आहे. त्याचप्रमाणे त्याला तीन आवास असलेला, तीन प्रकाश असलेला किंवा तिन तर्हेचा मानला आहे. कर्मकांडात आजकाल आपण अग्नीचे ज्या मंत्राने ध्यान करतो त्याला सात हात ,चार शिंग, सात जिव्हा, दोन डोकी ,तीन पाय असलेला व उजवी आणि डावी कडे क्रमाने स्वाहा आणि स्वतः अशा दोन बायका असलेला सांगितला आहे. या मंत्रा प्रमाणे त्याच्या हातात शक्ती ,अन्न, स्रुक, स्रुवा. तोमर, पंखा आणि तुपाचे भांडे अशा वस्तू आहेत. दक्षिण भारतात सात हात, दोन डोकी व तीन पायांच्या प्रतिमा मिळतात.
चत्वारी शृंड्गा त्रयो अस्य पादा
व्दे शीर्षे सप्तहस्ता सोअस्य
त्रिधा वध्दो वृषभो शेखीति
महो देवा मर्त्या अविशेश ||४/५८/३ रूग्वेद
र्पाटेश्वर येथील दुसऱ्या लेणी समूहाच्या समोरील मंदिरात वृषभ स्वरूपातील अग्नीची मूर्ती आहे. मूर्ती समोरून पहिल्याच अग्नीची दिसते, तर बाजूने पाहिल्यास नंदीची वाटते. नंदीला समोरून पाहिल्यास तीन पाय दिसतात. मूर्तीला चार कान आहेत. दोन नंदीचे असून दोन मानवी आहेत. मूर्तीला सात हात आहेत. प्रदक्षणा क्रमाने त्या हातात वरदहस्त, पुष्प ,बाण, गदा, धनुष्य व अभय मुद्रेत अंगठ्यात अडकवलेली अक्षमाला ही आयुधे आहेत .
कानात कुंडले दिसतात. समोरून पाहिल्यास अग्नीला दाढी दिसते पण बाजूने पाहिल्यावर ते नंदीचे मुखा आहे. या मुखावर शिंग आहेत. मूर्तीच्या हातात व पायात जाडसर तोडे दिसतात. मूर्ती समोरून पाहिल्यास उजव्या बाजूचा दुसरा हात छातीशी धरलेला आहे. बाजूने पाहिले असता नंदीची मूर्ती दिसते .अंगावरील अभूषण इतर नंदी प्रमानेचा आहेत. वरील प्रकारची अग्निवृष मूर्ती अशी म्हणून तिची ओळख आहे. ही मूर्ती दुर्मिळ स्वरूपाच्या मूर्तीमध्ये समाविष्ट आहे. महाराष्ट्रात क्वचितच अशा मुर्ती आहेत. त्यापैकी पाटेश्वर मंदिर समूहातील ही मूर्ती होय.
ह्या मूर्तीस कोणी एका ऋषीचे मूर्ती किंवा नंदीची मूर्ती असे म्हणून संबोधतात. परंतु ही मूर्ती मूर्ती शास्त्रातील वर्णनानुसार व ऋग्वेदातील वर्णनानुसार अग्निवृषाची मूर्ती आहे. त्यामुळे ह्या मूर्तीस अग्निवृषमूर्ती असे म्हणावे.कारण अग्नि आणि वृष यांची दोघांचीहि लक्षणे या मूर्तीत एकत्रित पाहावयास मिळतात.
डाॅ.धम्मपाल माशाळकर, सोलापूर