महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,98,814

छत्रपतींची आग्र्यातुन सुटका पेटाऱ्यातून कि वेशांतराने?

Views: 3747
5 Min Read

छत्रपतींची आग्र्यातुन सुटका पेटाऱ्यातून कि वेशांतराने?

छत्रपतींची आग्रा भेट व आग्र्यातुन सुटका या लेखाबद्दल समुहातील काही सहकाऱ्यानी महाराज नक्की पेटाऱ्यातून निसटले कि वेष बदलून या विषयी काही शंका उपस्थित केल्या . त्यासंबंधी माझ्यापरीने ससंदर्भ उत्तर देण्याचा प्रयत्न करत आहे. आपण हे उत्तर वाचून काही सूचना संगीतल्यास आपल्या सुचानाचे स्वागत.

शिवाजी महाराज पेटाऱ्यातून निसटल्याचे संदर्भ :-

जेधे शकावली :- बिघाड होऊन राजश्रीस चौकिया दिल्या . श्रावण वद्य द्वादशी आगरीयातून पेटारीयात बैसोन पळाले .

सभासद बखर :- मग एके दिवशी राजे व राजपुत्र एकच पेटाऱ्यात बसले . पुढे मागे पेटारे करून मध्ये पेटारीयात बसून चालिले.

कविराज भूषण :- चुकताई वंशाच्या औरंगजेबाच्या चारही दिशांना चौक्या असताना खांद्यावर पेठारे घेऊन लोक मंदिराकडे निघाले ,अश्यावेळी शिवाजी महाराजांनी आपला साज शृंगार उतरवून ठेऊन मिठाईच्या पेटाऱ्यात बसून ते निघून गेले.

३ सप्टेंबर राजस्थानी पत्रात परकलदास लिहितो :- “ दिवस चार घटका वर आला असता बातमी आली कि , शिवाजी पळाला . चौक्या पहारऱ्यांवर एक हजार माणसे होती . तो नक्की कोणत्या क्षणी पळाला आणि कोणत्या चौकातून पार झाला. त्यावेळी कुणाचा पहारा होता हे कोणीही सांगू शकले नाही . मग शेवटी विचारविनिमय करून असा निष्कर्ष ( तर्क ) निघाला की पेटाऱ्यांची ये-जा होती त्यामुळे तो पेटाऱ्यात बसून निघाला असावा.

समकालीन भीमसेन सक्सेना “ तारीखे दिल्कूशा “ यात लिहितो :- “ आणि मग एके दिवशी शिवाजीने एका माणसाला आपल्या पलंगावर झोपविले . मिठाईचे दोन पेठारे रिकामे केले. आणि त्यात बसून तो आणि त्याचा मुलगा हे बाहेर पडले. त्यांनी तडक मथुरेची वाट धरली.”

सुरतकर इंग्रजांचे पत्र , शिवकालीन पत्रसारसंग्रह १ पत्र क्र. ११३६ :- शिवाजीवर इतका कडक पहारा ठेऊनही अखेरला तो आणि त्याचा मुलगा असे दोघे दोन पेटाऱ्यातून बसून निसटून गेले. अशी खात्रीलायक बातमी नुकतीच आली आहे

शिवाजी महाराज वेष बदलून निसटल्याचे संदर्भ :-

आलमगिरनामा :- जयसिंगाचा अर्ज आला कि मी त्याला ( महाराजांना ) वचन दिले आहे आणि इकडच्या मसलतीच्या दृष्टीने त्याच्या गुन्ह्याकडे दुर्लक्षच करणे योग्य होईल. त्यामुळे औरंगजेबाचा फौलादखानास हुकुम झाला कि , त्याच्या ( महाराजांच्या ) डेर्यावरील पहारे उठवावेत. रामसिंगानेही खबरदारीत गफलत केली त्यामुळे तो २७ सफर सन १०७७ रोजी आपल्या पुत्रासह वेष बदलून पळून गेला .

सेतू माधवराव पगडी यांचे पेटाऱ्यातील पलायनाविषयीचे आक्षेप व विजयराव देशमुख यांचे आक्षेपांचे खंडन

सेतू माधवराव पगडी :- औरंगजेबाचा अधिकृत इतिहास आलमगिरनामा पेटाऱ्याच्या घटनेचा उल्लेख करत नाही . हि कुतूहलाची गोष्ट आहे . त्या दस्तऐवजात शिवाजी वेषांतर करून मुलाला घेऊन पळाला एवढाच उल्लेख येतो. याचा अर्थ असा होतो कि औरंगजेबाचा पेटाऱ्यातून पळाला या गोष्टीवर विश्वास न्हवता किवा त्याच्या अधिकाऱ्यांच सहकार्य अथवा निष्काळजीपणा त्याला उघड करावयाचा न्हवता शिवाजी स्वतःहून पेटाऱ्यात बसला असेल हा समज चुकीचा आहे. अंग मुडपून स्वतःला आगतिक करण त्याच्या स्वभावात बसत नाही . नऊ वर्षांचा संभाजी पेटाऱ्यात बसला असेल आणि शिवाजी पेटारे नेणाऱ्या भोइंसोबत सेवक बनून गेला असेल

विजयराव देशमुख :- श्री पगडींचा सर्व भर आलमगीरनाम्यातील नोंदीवर आहे. आपल्या सर्व पराक्रमांचा ग्रंथ तयार करण्याचा हुकुम औरंगजेबाने दिला . ग्रंथ कर्त्याला लिहिलेली हकीकत प्रथम बादशहास दाखवावी लागे व बादशहाने सुचवलेले दुरुस्त्या समाविष्ट कराव्या लागत. म्हणजे सोयीचा तेवढाच मजकूर या ग्रंथात लिहिण्याची बादशाहने लेखकास परवानगी दिली होती . त्यामुळे या ग्रंथाचे इतिहासाचे साधन म्हणून पूर्णपणे स्वीकाऱ्हार्य मानता येत नाही . अलामगीरनाम्यातील वेशांताराचा निष्कर्ष हादेखील सरकारी तर्क आहे.

पगडीच्या मते संभाजी महाराज पेटाऱ्यात बसविले असणे शक्य आहे. पण महाराज स्वतःला आगतिक व कुचंबलेल्या स्थितीत पेटाऱ्यात कोंडून घेतील हे त्यांच्या स्वभावावरून व सावधगिरीवरून शक्य वाटत नाही . मग पगडिंच्या मते महाराज हमालाचा वेश धारण करून वजनदार पेटारा स्वतःच्या खांद्यावर वाहून नेणे , महाराजांच्या स्वभावाला अनुसरून होते.

आलामगीरनाम्यात महाराज पुत्रासह वेष बदलून पळून गेले तेवढेच वर्णन आहे. तिथे कुठेही भारवाहक हमाल म्हटलेले नाही .

महाराज पेटाऱ्यातून निसटले . मग हे पेटारे नेण्याची परवानगी कोणी दिली ? प्रत्यक्ष बाद्शाहाने ! म्हणजे अखेर खरा दोषी कोण बादशाहाच ! धूर्त औरंगजेबाने बहुदा हे आपल्यावरील दोषारोपण टाळण्यासाठी शाही अधिकृत नोंदीत पेटाऱ्यानचा उल्लेख कटाक्षाने टाळला

महाराज ज्या पेटाऱ्यातून गेले तो दोन भारवाही हमालांना वाहून न्यावा लागे एवढा मोठा ऐसपैस होता. त्यामुळे आगतिक व कुचंबलेल्या अवस्थेचा प्रश्नच येत नाही .आग्र्यातुन सुटका.

नागेश सावंत

Leave a Comment