महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,28,208

अहदनामा कराची कारणे भाग २

By Discover Maharashtra Views: 1306 4 Min Read

अहदनामा कराची कारणे भाग २ –

अब्दालीच्या भारतावरील स्वार्या:-

१७४७ मधे झालेल्या कटातुन नादिरशाहची हत्या झाली.खुनानंतर झालेल्या पळापळीत आणि अस्थिरतेत नादिर शहराजवळील कोहिनूर हिरा आणि मयूर सिंहासन अहमदशाह अब्दाली कडे आले.अनेक दिवसांच्या चर्चेनंतर शाबीर शहा नावाच्या दरवेशाने अब्दालीची आपल्या म्होरक्या म्हणून निवड केली. नादिरशहाच्या १७३९ च्या दिल्ली आक्रमणावेळी अब्दाली त्याच्या फौजेत होता. मोगलांचा पंजाब प्रांताचा सुभेदार झकेरिया खान मेल्यानंतर याहया खान आणि शाहनवाज खान या त्यांच्या दोन मुलांत सत्तासंघर्ष सुरू झाला.जालंधर प्रांताचा सुभेदार आदिना बेग  हा मोगल वजिराला शह देण्यासाठी अब्दालीची मदत घ्यायला शहानवाजला सांगत होता तर मोगलांना शाहनवाज  आणि अब्दालीच्या पत्रव्यवहाराची माहिती आदिना बेग मोगल बादशहाला  पुरवत होता ! वजीर कमरुद्दीन खानाचा शहानवाज पुतण्या असल्यामुळे त्याने शहानवाजला पंजाबची सुभेदारी देऊन दिली. आता वझिराने अब्दालीला मोगल सरहद्दीवरून पिटाळून लावण्याचा तगादा शहानवाज कडे लावला . अब्दालीने शाहनवाजसोबत मैत्री करायला दरवेश साबीर शाहाला  पाठवल्यावर आपल्या सुभेदारीवर खुश असलेला व वजिराच्या बाजूने असलेल्या मोगल सुभेदार शहानवाजने साबीर शहाच्या गळ्यात शिसे ओतले !(अहदनामा कराची कारणे भाग २)

ही बातमी अब्दालीच्या कानावर पडताच अब्दाली ताबडतोब आपली फौज घेऊन लाहोरकडे चालून आला.यावेळेस अब्दाली पाशी  तीस हजाराचं छोटं सैन्य होतं तर वजीर कमरुद्दीन , शहजादा आजमशाह, अवधचा नवाब सफरदरजंग आणि जयपूर नरेश ईश्वरसिंग यांच्या संयुक्त फौजेचा भव्य सेना सागर होता.शहानवाज लाहोरच्या किल्ल्यावर पराभूत झाला होता आणि दिल्लीत आता तो मदत मागायला आला.! मदत म्हणून आलेली हे संयुक्त आणि भव्य मोगलांची सेना सरहिंद कडे येत असताना मोगलांची मणिपूर येथे अब्दालीच्या  सोबत गाठ पडली.मणिपूरमध्ये तुंबळ युद्ध झालं आणि मोगली सेना विजयी झाली ! परकीय शत्रूविरुद्ध मोगलांचा हा शेवटचाच विजय असेल ! या युद्धात मोगल वजीर कमरुद्दीन खर्ची पडला !

दुसरी स्वारी:-

१७४८ मधे काही काळातच मोगल बादशहा महमुदशहा याचा मृत्यू झाला आणि त्याचा शहजादा अहमदशहा याने बादशहा असल्याचे स्वत ला घोषित केले. पंजाबच्या सुभेदार मीर मन्नू हा नवा वजीर सफदरजंगाला आपला प्रतिस्पर्धी मानत असे.त्यामुळे अब्दालीच्या पंजाब आक्रमणावेळी त्याला वजिरा कडून कोणतीही मदत मिळणे शक्य नव्हते.याअंतर्गत धुहीचे संधी साधून अब्दालीने पंजाबवर दुसरी स्वारी केली. या स्वारीत मीर मन्नू चा पराभव होऊन त्याने उत्तर पंजाबातील चार जिल्ह्यांचा वसूल  आणि १४००० रुपये नजराणा देण्याचे कबूल केले.

अब्दालीची तिसरी स्वारी :-

१७५१ मध्ये अब्दाली खंडणी वसूल करायला आपला सेनापती जहान खानांबरोबर पूर्वेच्या सरहद्दीकडे निघाला.यात पंजाबचा सुभेदार मोईन उल मुल्क याने मुलतानचा सुभेदार कौरामलच्या सांगण्यानुसार अब्दालीला खंडणी देण्यास नकार दिला.अब्दालीने आपल्या दूताला पाठवून येणं असलेली रक्कम मुईनला मागितली.शेवटी मुईनने नकार दिल्यावर युद्ध अटळ होते.अब्दाली आणि जहान खान यांनी मुईनला टाळून रावी ओलांडली आणि यांचं सैन्य लाहोरमध्ये आलं.दोन्ही फौजेत चकमकी झाल्यानंतर १७५२ फेब्रुवारीत अब्दालीच्या सैन्याने लाहोरच्या आसपासच्या प्रदेशावर ताबा मिळवला.

मुईन व कौरामलसोबत वजीर सफदरजंगाचे आणि पटत नसल्यामुळे व अंतर्गत दुफळीमुळे त्यांनी मुईनला मदत द्यायचे नाकारले. तीन महिन्यांच्या बचावात्मक पवित्र्या नंतर मुईन दहा हजारांची फौज घेऊन लढायला सिद्ध झाला.मुईनने लाहोरच्या किल्ल्याचे दरवाजे बंद केले. आता उन्हाळा सुरु होणार होता आणि अब्दाली उन्हाळ्यात कधी थांबत नसे ! अब्दालीचा फौजेचा उन्हाळ्यात थांबण्याचा अपवाद फक्त पानिपताच्या मोहिमेवेळी होता ! हे लक्षात येताच अब्दालीने आपला सेनापती जहानखान याच्या हाताने मुईनला पत्र पाठवलं की

“मुसनमान एकमेकांना मारत आहे हे अल्लाला मंजुर होईल का ? तु भीती न बाळगता मला भेटायला ये”

मुईन सुद्धा अब्दालीला भेटायला मोठ्या धाडसाने गेला.या भेटीत मोईनने अब्दालीच्या प्रश्नांवर मोठय़ा धाडसाने उत्तरं दिली.अब्दाली पण मोईनवर बेहद खूश झाला.यावर मुईनने लाहोरमध्ये होणारी कत्तल अब्दालीला थांबवायला लावली.मुईनने नऊलाखा सोबत उरलेली खंडणी देण्याचे वचन दिलं आणि अब्दालीने आपल्या ताब्यातलं लाहोर शहर मुईनला दिलं.

क्रमश:- अहदनामा कराची कारणे भाग २.

संदर्भ:-
१) सोलस्टिस ओफ पानिपत :- उदय.स.कुलकर्णी
२)पेशवाई:- कौस्तुभ कस्तुरे
३)दौलतीचे खांब :- प्रा. मुकुंदराव आगासकर
४)आधुनिक भारत:- धनंजय आचार्य
५) निनादराव बेडेकर यांचं पानिपत विषयावर व्याख्यान .

Pruthvi Dhawad

अहदनामा कराराची कारणे

Leave a Comment