महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,22,285

होळकरकालीन अंधारी विहिर | बुरुजातील विहिर

By Discover Maharashtra Views: 2543 3 Min Read

वाफगाव : होळकरकालीन अंधारी विहिर…

वाफगावचा किल्ला का पाहायला जावा? याची फक्त तीनच कारणे आहेत. पहिले म्हणजे भुईकोट किल्ल्यामधील दुमजली असलेला राजदरबार, दुसरे म्हणजे किल्ल्याच्या बाहेरील श्री राजराजेश्वर मंदिर आणि तिसरे म्हणजे या भुईकोटातील एका बुरुजामध्ये असलेली होळकरकालीन अंधारी विहिर. हि विहीर या भुईकोटातील एक प्रमुख आकर्षण असून तत्कालीन होळकर कालीन पाणी व्यवस्थापनेचा उत्तम नमुना आहे.

आजही या विहिरीतील पाण्याचा उपयोग पिण्यासाठी केला जात असून आतापर्यंत जेवढे दुष्काळ आले तरीही या विहिरीच्या पाण्याने तळ गाठला नाही. विहिरीतील पाण्याचे बाष्पीभवन होऊ नये, पाण्यात केर कचरा पडू नये तसेच प्राणी पडून त्यांचा मृत्यू होऊ नये म्हणून त्या पद्धतीच्या बांधणी असलेल्या असंख्य विहिरी तुम्ही पाहिल्या असतील मात्र या विहिरीचे या व्यतिरिक्त वेगळे पण म्हणजे परकीय शत्रू कडून पाण्यात विष मिसळले जाऊ नये म्हणून हि विहीर किल्ल्याच्या प्रमुख बुरुजात निर्माण करण्यात आली आहे व या विहिरीत जाण्यासाठी फक्त एकच मार्ग असून तो किल्ल्याच्या आतून भुयारी मार्ग प्रमाणे आहे. हि विहीर म्हणजे होळकर कालीन लष्करी व्यवस्थापनेचा एक उत्तंग नमुना म्हटले तरी वावगे ठरणार नाही. या विहिरीचा निर्माण या भुईकोट किल्ल्याबरोबरच करण्यात आला. हा किल्ला श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या राज्यशासन काळात बांधण्यात आला आहे.

किल्ल्याच्या आत श्री विष्णू-लक्ष्मी मंदिर आहे. या मंदिराच्या उजव्या बाजूला असलेल्या तटबंदीमधून बुरुजाकडील विहिरीकडे जाण्याचा भुयारी मार्ग तयार करण्यात आला आहे. या भुयारी मार्गात गेल्यावर डाव्या बाजूला वळून ५० मी. चालत जावे लागते. जाताना या भुयारी मार्गात खूप अंधार असतो. ५० मी. अंतर चालून गेल्यावर उजव्या बाजूला वळावे लागते व तेथून थेट खाली बुरुजातील विहिरीच्या तळापर्यन्त जाणाऱ्या ३० ते ३५ पायऱ्या आहेत आणि पायऱ्यांच्या मधोमध उभे राहण्यासाठी किंवा आराम करण्यासाठी दोन टप्पे निर्माण केले आहेत. पायऱ्या उतरत असताना आपल्याला विहिरीचे निखळ पाणी व त्यावरील पडलेला सूर्य-प्रकाश नजरेस पडतो. हा सूर्य प्रकाश बुरुजाच्या वरील बाजूने असलेल्या मोकळ्या भागातून आत येण्याची व्यवस्था केली आहे. या विहिरीला “अंधारी विहीर” या नावाने हि ओळखले जाते. या बुरुजातील विहिरी बद्दल जेवढे लिहिल तेवढे कमीच आहे त्यामुळे हि मराठा कालीन वास्तू कलेचा उच्च कोटीच्या आर्किटेक्टचा अजोड नमूना असलेली हि होळकर कालीन बुरुजातील विहीर प्रत्यक्षात जाऊन पाहण्यात जी मजा आहे ती दुसरी कशात नाही. जर कधी राजगुरूनगरला गेलात तर वाफगावच्या या भुईकोट किल्ल्याला नक्की भेट द्या. राजगुरूनगर पासून वाफगाव हे १२ कि. मी. च्या अंतरावर आहे.

अंधारी विहिर(बुरुजातील विहिर) : किल्ले वाफगाव, ता.खेड जि.पुणे(महाराष्ट्र) 
संकलन – राहुल वावरे, ८९९९१४३०७४. 
Leave a Comment