देवधर्माच्या पलिकडच्या अहिल्यादेवी !!
महाराष्ट्राचा मुलुख हा जेव्हा सह्याद्रीच्या मर्दपणाचा आहे.तेवढाच तो गोदावरी आणि कृष्णेच्या स्त्रीपणाचा सुद्धा.अगदी सातवाहन काळापासून महाराष्ट्राची स्त्री शक्ती आपल्या स्वकर्तुत्वावर जिजाऊआईसाहेब आणि आहिल्यादेवींच्या स्वरूपात उभी आहे.पुण्यश्लोक अहिल्यादेवी असं नाव सहज समोर आलं तरी आपल्यापुढे धर्म उभा राहतो.पण एक प्रवासी म्हणून सुद्धा अहिल्यादेवींची ओळख थोर आहे.देवधर्माच्या पलिकडच्या अहिल्यादेवी.
पानिपतानंतर उत्तरेला मराठ्यांचा दिमाख हा शिंदे होळकरांनी राखला.सुभेदार मल्हारबाबांसारखं धीमं,संयमी आणि खोल नेतृत्व महादजीबाबांच्या पाठी उभं दिसतं.अंगभूत आक्रमकपणाला म्हलारबांच्या मुत्सद्दीपणाची जोड मिळाली.सुभेदारांच्या कैलासवासांनंतर रघोबादादांनी इंदूरवर तलवार धरली.शिंद्यांकडे निरोप पाठवला.महादजी बाबांनी मल्हारबांच्या कर्तुत्वाची जाण ठेऊन निरोप पाठवला.’आपले कोणतेही काम जातीने करीन पण या कार्यास तलवार लावणार नाही.खाश्या दादाच्या लष्करात ही तलवार धरण्याहून बेबबनाव झाला.
इंग्रजांच्या प्रती असलेले देवींचे उद्गार त्यांच्या राजकीय कुशलतेची साक्ष देतात.’इंग्रजांची प्रबळता हिंदुस्थानात फार झाली.त्यांस सर करण्यास सहाय एक श्रीमंत रावसाहेब पुण्यप्रताप.त्यांच्या कृपावीक्षणे मात्र मसलत सिद्धिस पावेल.वरकड व्याघ्रादिक श्वापदे बळ व युक्तीप्रयुक्तीने मारतील.परंतु आस्वलाचे मारणे महाकठीण .आस्वलाचे चपेटित कोणी सापडला तर गुदगुल्या करूनच अस्सल त्यास मरशील .तद्वत हि इंग्रजांची लढाई आहे.पाहता यांचे मारणे कठीण.
नाना फडणीस होळकरांविरोधात बळाचा वापर करेल महादजीबाबांच्या सेनापतीस राणेखानास वाटले तो नानांस देवींबद्दल लिहितो.”तुम्हास काही करावयाचे असेल तर त्यांत तिचे मनोगत राखा.ती निर्मदेतीरी महेश्वरी आहे यावर जाऊ नका.तिस नुसता संशय आला तरी ती कुणास बधावयाची नाही.धन व बुद्धी दोन्हीची तिच्या जवळ समृद्धि आहे.तिच्या मनोदयानुसार चालाल तर त्याचा चांगला परिणाम होईल.राणेखानासारख्या कसलेल्या सेनापतीचे हे उद्गार आहेत.
देवींच्या अखत्यारीत असलेल्या नंदुरबार परगण्यात फौजेमुळे शेतीचे नुकसान होऊ नये म्हणून त्या सक्तीची ताकीद देतात.आक्रमणांमुळे उद्ध्वस्त झालेल्या गावांना महसुलात सूट देतात .माळव्याचा इतिहासकार माल्कम आपल्या ग्रंथात म्हणतो .
“Ahilyabai has become by general strategies the model of good government in Malva. Her name is considered as such excellent authority that an objection is never made when her praise is needed as the precedent.”
– सचिन शिवाजीराव खोपडे देशमुख.
बारा मावळ परिवार.