महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,22,921

मराठ्यांच्या अधिपत्याखाली असणारं अहमदाबाद

By Discover Maharashtra Views: 2630 5 Min Read

मराठ्यांच्या अधिपत्याखाली असणारं अहमदाबाद –

अहमदाबाद म्हणजे गुजरातमधलं मोठं शहर. तशी ती गुजरातची राजधानीचं. अठराव्या शतकात शहर मराठ्यांच्या अधिपत्याखाली होतं. 1817-18 मध्ये शेवटच्या इंग्रज-मराठा युद्धानंतर ते पेशव्यांकडून इंग्रजांकडे गेलं. शहराची स्थापना झाली पंधराव्या शतकाच्या सुरुवातीला. इथला सुलतान अहमदशाह यानं ते स्थापन केलं. शहराची मोठी भरभराट झाली. त्यात इथला कापड उद्योग महत्त्वाचा होता. मुघल बादशाह अकबराच्या काळात इथे मुघलांचा अंमल प्रस्थापित झाला. पुढे मुघली सुभेदार या भागात नियुक्त केला जाई.(मराठ्यांच्या अधिपत्याखाली असणारं अहमदाबाद – Ahmedabad under Maratha rule)

शिवाजी महाराजांनी सुरत लुटली ही गुजरातवर मराठ्यांची तशी पहिली स्वारी म्हणता येईल. दुसरी मोठी स्वारी केली ती 1706 मध्ये मराठ्यांचे सेनापती धनाजी जाधवराव यांनी. नर्मदा ओलांडून ते भरूचपर्यंत गेले. विशेष म्हणजे इकडे औरंगजेब बादशाह महाराष्ट्रात असताना! त्यानंतर बाळाजी विश्वनाथांच्या नेतृत्वाखाली फौजाही अहमदाबादपर्यंत जाऊन आल्या. पण खरा गुजरातमध्ये अंमल बसवण्याचा श्रेय जातं ते सरदार खंडेराव दाभाडे यांना. त्यांचे सोबती गायकवाड आणि कदमबांडे गुजरातच्या दक्षिण भागात म्हणजे खानदेश सीमेलगत सक्रिय होते.

नंतर पेशव्यांनीही उत्तर गुजरातमध्ये काही स्वाऱ्या केल्या. पुढे दाभाडे घराणं मागे पडून त्यांच्याजागी गायकवाड आले. तत्पूर्वी खंडेराव दाभाडे यांच्या विधवा पत्नी उमाबाई यांनी मोठ्या फौजेनिशी अहमदाबाद शहरावर स्वारी केली होती. सुभेदार जोरावर खानाला त्यांनी चांगला दणका दिला पण शहरावर म्हणावा असा अंमल बसला नाही. पुढे 1752 साली अहमदाबादवर रघुनाथराव पेशवे आणि दमाजी गायकवाड यांनी मोठी स्वारी केली आणि शहर पूर्णपणे मराठ्यांच्या अधिपत्याखाली आणलं. आता गुजरातमधला मोठा आणि दक्षिणेकडचा भाग (सुरतेचा काही भाग वगळता) गायकवाडांकडे आणि उत्तर गुजरातचा काही भाग (आणि सुरतेचा काही भाग) पेशव्यांकडे असं गुजरातचं साधारण समीकरण झालं.

अहमदाबादसारख्या भरभराट असणाऱ्या शहरातून पेशव्यांना चांगला महसूल मिळायचा. अहमदाबादचा गाजलेला पेशव्यांचा सुभेदार म्हणजे आबा शेलुकर! सवाई माधवराव पेशव्यांच्या कारकिर्दीत त्यांना अहमदाबादच्या सुभेदारपदी नेमण्यात आलं. आबा त्या काळातला प्रभावी आणि नाना फडणीसांच्या मर्जीतला सरदार. 1790 च्या दशकाच्या शेवटी आबांनी शहरात मोठी दहशत निर्माण केली. त्यांच्या हाती पैसा, माणसं आणि फौज तिन्ही होतं. शिवाय पेशवे आणि गायकवाड दरबारात राजकारण आणि गृहकलाहांना ऊत आलेला. आता आबा शेजारच्या गायकवाडांनाच डिवचू लागला. पेशव्यांनी मग गायकवाडांना आबाला (म्हणजे स्वत:च्या सरदाराला) पकडायला सांगितलं. आबांचा बंदोबस्त झाला. हातापायात बेड्या घालून त्यांची रवानगी पुण्याला करण्यात आली. या भागात एक गरबा (तिथल्या लोकसाहित्यातील एक प्रकार) प्रचलित आहे. त्या मूळ गुजराती गरब्याचा अर्थ ‘आबा शेलुकार आला तर होता मानाचा शालू (किंवा शेला) परिधान करून आणि गेला चादरीखाली लपून’ असा आहे.

मग अहमदाबाद सुभा पेशव्यांनी गायकवाडांकडे मक्त्याने द्यायचा ठरवला. वार्षिक रक्कमही ठरली. 1800 ला पाच वर्षांसाठी करार केला गेला. तो 1804 आणि 1809 ला दोनदा नूतनीकृत केला गेला. मग 1814 ला त्याची मुदत संपायला आली. मधल्या काळात गायकवाडांची पेशव्यांकडे पुष्कळ थकबाकी झाली होती. ती मिटवण्यासाठी बडोड्याहून वकील म्हणून गंगाधरशास्त्री पुण्यात आले. पेशव्यांनी अचानक अहमदाबाद सुभा गायकवाडांकडून काढून स्वतः कडे घेतला आणि त्याच्यावर नेमणूक केली त्रिंबकजी डेंगळे यांची !

त्रिंबकजी अहमदाबादला गेले नाहीत. त्यांची प्रतिनिधी मंडळी तिकडे त्यांच्या नावाने कारभार पाहायची. विठ्ठल नरसिंह हा त्रिंबकजींचा तिथला हस्तक. त्यांनी तिथं गेल्याबरोबर त्रिंबकजींच्या सांगण्यावरून जास्तीत जास्त पैसा कसा उभा करता येईल याचे प्रयत्न सुरू केले तसचं बडोद्याच्या दरबारातील इंग्रजविरोधी गटाशी संधान बांधलं. पुढे गंगाधर शास्त्रींचा पंढरपूरला खून झाला, इंग्रजांनी आरोप त्रिंबकजींवर केले, त्यांना कैदेत ठेवलं. त्यामुळे पेशव्यांचे आणि इंग्रजांचे संबंध कमालीचे ताणले. हेच 1817-18 मधल्या तिसऱ्या इंग्रज-मराठा युध्दाचं तात्कालिक कारण! युध्दात पेशव्यांची हार झाली.
लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट ही की 1817-18 पर्यंत अहमदाबाद पेशव्यांकडे होतं. पेशव्यांची हार झाल्यावर इंग्रजांनी इथलं मुख्य ठिकाण म्हणजे भद्रा किल्ला ताब्यात घेतला आणि त्याच्यावरचा पेशव्यांचा जरीपटका उतरवून युनियन जॅक लावला.

अहमदाबादमध्ये त्रिंबकजी डेंगळे सुभेदार असतानाच्या काळात पाडलेली काही नाणी अहमदाबादच्या क्लासिकल न्युमिस्मॅटीक गॅलरी या खाजगी संस्थेकडे उपलब्ध होती. मात्र काही वर्षांपूर्वी त्यांचा लिलाव होऊन विक्री झाली. नाण्यांवर मुघल बादशाह मुहम्मद अकबर दुसरा आणि कमाविसदार त्रिंबकजी डेंगळे अशी दोन नावं आहेत. नाणी बादशाहच्या नावाने कशी, याचं उत्तर म्हणजे उत्तर भारतात मराठ्यांनी मुघलांच्या नावाने नाणी पाडण्याचा शिरस्ता चालू ठेवला होता. त्यामुळे नाण्यांवरची भाषा पर्शियन असून दिल्लीच्या त्यावेळच्या नामधारी बादशाहचं नाव त्यावर आहे.
पूर्वी भद्रा किल्ल्याच्या आसपास मराठी लोकांची बरीच वस्ती होती. ‘बाबुरावचा मुहल्ला’ म्हणून एक भाग तिथं आहे. ब्राम्हण, कायस्थ प्रभु, मराठा समाजांची अनेक कुटुंबे तिथं होती. अहमदाबादमधील या मूळ मराठी घराण्यांचा शोध घेणंही फार रंजक ठरेल. नाही का?

संदर्भ:
मराठी रियासत खंड ५, ७, ८
काही अप्रसिद्ध ऐतिहासिक चरित्रे- य. न. केळकर
गुजरात देशाचा इतिहास- गोपाळ हरी देशमुख

– सुमित अनिल डेंगळे

Leave a Comment