महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,22,495

अजिंठा डोंगर, औरंगाबाद

By Discover Maharashtra Views: 3290 7 Min Read

अजिंठा डोंगर, औरंगाबाद –

औरंगाबाद जिल्ह्याच्या उत्तरेला शंभर एक किलामिटर लांबीची अजिंठा डोंगरांची प्रचंड अशी नैसर्गिक संरक्षक भिंतच आहे. अजिंठा डोंगर या डोंगरांतील अजिंठा लेणी देश विदेशात प्रसिद्ध आहे. पण याच अजिंठा डोंगरात पर्यटकांना आकर्षीक करणारी इतरही काही अप्रतिम अशी ठिकाणं आहे. त्यांची मात्र माहिती फारशी दिली जात नाही. या डोंगरांमधून नूसतं फिरलं तरी डोळे निवतील असा निसर्ग अनुभवास येतो. औरंगाबाद जळगांव रस्त्यांत अजिंठ्या जवळाचा घाट आणि औरंगाबाद चाळिसगांव मार्गावरील कालीघाट सर्व परिचित आहे. या महामार्गांवर भरपूर रहदारी असते.

पण या शिवाय दोन अतिशय सुंदर निसर्गसंपन्न असे वळणावळणाचे घाट रस्ते या डोंगरात आहेत. पहिला रस्ता आहे हळदा घाटाचा. औरंगाबाद जळगांव रस्त्यावर अजिंठ्याच्या आधी गोळेगांवपासून डावीकडे जो छोटा रस्ता निघतो तो उंडणगाव वरून हळदा घाटात जातो. आणि दुसरा घाटनांद्रा जवळून डोंगरात उतरतो.

पहिला रस्ता हळदा घाटाचा. याच रस्त्यावर अजिंठ्याचा प्रसिद्ध सुंदर धबधबा ज्या नदीवर आहे ती वाघूर नदी आडवी लागते. नदीचे पाणी अगदी रस्त्यावरून वाहत असताना त्या पाण्यांतून जाण्याची एक वेगळीच मजा आहे.  वाघूर नदी दगडांमधून वाट काढत वहात अजिंठ्या जवळ उंचावरून उडी घेते हे दृश्य फार नयनरम्य आहे. अजिंठ्याचा धबधबा खुपजण पाहातात पण या नदीचा मागोवा घेत जरा मागे गेले तर दगडांच्या खदाणीतून वाहणार्‍या प्रवाहाचे एक आगळे सौंदर्य पहायला मिळू शकते. श्रावण भाद्रपदात हा प्रवाह खळाळताना दिसतो.

हळदा घाटातील या रस्त्याने पुढे गेल्यावर यादवांच्या काळातील सुंदर भक्कम एकट्या डोंगरमाथ्यावरचा वेताळवाडीचा किल्ला दृष्टीस पडतो. हजार वर्षांपूर्वीचा हा किल्ला. याची संपूर्ण भक्कम तटबंदी दोन मुख्य दरवाजे सर्व शाबूत आहे. दक्षिणेकडे औरंगाबाद दिशेने एक दरवाजा आहे. दुसरा दरवाजा सोयगांवच्या दिशेने म्हणजेच उत्तरेला आहे. किल्ल्याच्या सर्वात उंचावर पडून गेलेल्या महालाच्या दोन कमानी शिल्लक आहेत. या कमानीतून उत्तरेची बाजू लांबवर अतिशय स्पष्ट दिसत राहते. ही जागा म्हणजे दख्खनच्या प्रवेशाचे ठिकाण. तिन्ही बाजूंनी घेरलेल्या डोंगररांगा आणि समोर दूर दूरवर पसरलेली सपाट जमिन, शेजारच्या तळ्यातून वहात निघालेली नदी असे एक जलरंगांतील चित्रच शेाभणारे दृश्य इथून दिसते. किल्ल्यावर कोठीघराची इमारत शाबूत आहे. महालाचे पडके अवशेष आहेत. एक तोफही आहे. आतल्या दुसर्‍या बुरूजाचे अवशेष आहेत. खालच्या मुख्य तटबंदीचे काही बुरूज नुकतेच दुरूस्तही केल्या गेले आहेत.

वेताळवाडीच्या किल्ल्याला वळसा घालून सोयगांव रस्त्याची दिशा सोडून उजवीकडे वळल्यास ती वाट रूद्रेश्‍वर लेणीकडे जाते. काही अंतरापर्यंत चारचाकी वाहन जावू शकते. वाटेत ठिक ठिकाणी खळाळणार्‍या ओढ्यांनी रस्ता आडवला आहे. वाडीच्या किल्ल्यावरून दिसणारे सुंदर तळे या वाटेवर लागते. काठावरच्या मोठमोठ्या दगडीशिळा, काठावरची पळसाची झाडे यांनी या तळ्याचे सौंदर्य अजूनच वाढवले आहे. अनिलांच्या कवितेतील

अशा एखाद्या तळ्याच्या काठी बसून रहावेसे मला वाटते
जिथे शांतता स्वत:च निवारा शोधीत थकून आली असते.

असे वर्णन आलेले आहे. ते या तळ्याला पूर्ण लागू पडते. हा भाग वर्दळी पासून पूर्णत: आतमध्ये आहे. परिणामी येथील शांतता भंग पावत नाही. वाहने सोडून पायी निघालो की काही अंतरावर मोराच्या केका कानावर पडायला लागतात. सागाच्या झाडांच्या तवराचा पिवळसर पांढरा, पळसाच्या पानांचा गडद हिरवा, लसलसणार्‍या गवताचा पोपटी अशा रंगांचा एक समुद्रच दरीत पसरलेला दिसून येतो.

उंच कड्यावरून कोसळणार्‍या रूद्रेश्वर धबधब्याचा गंभीर नाद दरीत घुमत राहतो. याच धबधब्याखालून पलीकडे गेल्यावर छोटी गुफा लागते. या गुफेत रूद्रेश्वर महादेवाची पिंड, तिच्या समोर देखणा नंदी दिसतो. या लेणीतील मुख्य आकर्षण आहे ती म्हणजे गणेशाची सहा फुटी प्रचंड सुंदर सुबक मूर्ती. ही महाराष्ट्रात आढळलेली सर्वात प्राचीन मोठी मूर्ती आहे.

सभोवताली प्रचंड असे काळे कातळ, त्यावर उगवलेले पोपटी हिरवे गवत, भिरभिरणारे तुषार असं सगळं भारावून टाकणारे हे ठिकाण. अध्यात्म वेगळं न राहता निसर्गात मिसळून गेलेलं किंवा निसर्ग म्हणजेच अध्यात्म आहे असं दर्शविणारे हे ठिकाण.

रूद्रेश्वर परिसरांत फिरल्यावर पोटात कावळे ओरडत असतात. या परिसरांत खाण्यापिण्याची काही सोय नाही. पण वाटेवर प्रभाकर सोनावणे नावाचे शेतकरी आहेत. आम्ही त्यांनाच हात जोडून विनंती केली होती खायला द्याला का? त्यांनी आनंदाने मुगाची डाळ, पोळी भात असे साधे रूचकर चविष्ट जेवण दिले. निसर्गाच्या सान्नीध्यात वाडीच्या किल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केलेल्या या वनभोजनाची चव मी जन्मात विसरणार नाही. पावसाची रिमझिम सुरू झाली आणि आम्हाला उठून आत झोपडीत जावे लागले. सोबतचा फ्रेंच मित्र व्हिन्सेंटला या  अनुभवाने पागल व्हायची वेळ आली. इतकं सुंदर इतकं आगत्य आतिथ्य इतका आगळा वेगळा अनुभव त्याला फार मोलाचा वाटला. नाही नाही म्हणत असतानाही आम्ही सोनवणेंना जेवणाचे पैसे दिले. त्यांच्या मुलाला इथेच जरा मोठी झोपडी बांधून पर्यटकांच्या जेवणाखाण्याची व्यवस्था करण्याचे आम्ही सुचवले.  या भागात कुणी फिरणार असेल तर सांगा. त्यांच्या जेवणाखाण्याची सोय चांगली होईल याची हमी आहे.

हळदा घाटाचा रस्ता पुढे सोयगांवला जातो. सोयगांवहून डावे वळण घेतले की 25 किलोमिटरचा सुरेख डोंगराच्या पासथ्याने जाणारा हमरस्ता आहे. या रस्त्यावरही जागजागी खळाळत वाहणारे ओढे अढळतात. कुठेही रस्त्याच्या कडेला उतरून नदीत पाय सोडून बसता येते. या रस्त्याला रहदारी फारशी नाही.

पुढे तिडका गावापासून उजवीकडे घाटनांद्र्याला जाणारा रस्ता लागतो. हा रस्ता म्हणजे अजिंठ्याच्या डोंगरातील  अनवट अतिशय सुंदर असा वळणावळणाचा घाटरस्ता आहे. रस्ता चांगला मोठा आहे. या वाटेवर माकडांची संख्या भरपूर आहे. गाडी थांबवली तर आपल्या गाडीच्या टपावर येवून माकडे खेळतात.

डोंगरातील उंचच उंच धिप्पाड काळे कातळ घाटाचे सौंदर्य अजूनच खुलवतात. घाटावर वरच्या बाजूला गेल्यावर पश्चिमेकडे एक उंच उंच काळ्या पाषाणात कोरल्यासारखी वाटावी अशी नैसर्गिक कमान दिसते. ही कमान पाहून अजिंठा डोंगरातील लेणीची आठवण येते. सारखं वाटत राहतं की इथे कुठेतरी अजून काही लेण्या लपलेल्या असाव्यात. घाटनांद्रा-शेलगांव-नाचनवेल-बाबरा-फुलंब्री असा एक चांगला रस्ता औरंगाबादला परतण्यासाठी आहे. हा वेगळा आणि छान छोट्या मोठ्या टेकड्यांमधून भरल्या शेतांमधून जाणारा रस्ता आहे.

भाद्रपदात अजिंठा डोंगर भागातील निसर्ग सौंदर्य विशेष खुललेले असते. या हिरवाईनेच डोळ्यांचे पारणे फिरते. जागजागी सुंदर अशी तळी या काळात साठलेली आढळून येतात. तसा हा खात्रीच्या पावसाचा प्रदेश. अगदीच पावसाने ओढ दिलेला काळ वगळला तर दरवर्षी हा परिसर असाच फुलून येतो. अजिंठ्याची लेणी सगळ्यांना माहित आहे. पण ही निसर्गाची लेणी मात्र फारशी डोळ्यांखालून घातली जात नाही.

(अजिंठा डोंगर परिसरांत अजिंठा व्ह्यु पॉईंट, अन्व्याचे 1000 वर्षांपूर्वीचे महादेव मंदिर, रूद्रेश्वर लेणी, घटोत्कच लेणी, जंजाळा किल्ला, वाडीचा किल्ला, अंभईचे वडेश्वर मंदिर, मुर्डेश्वर, अंबऋषीची गुफा व आमसरी धबधबा अशी सुंदर ठिकाणं आहेत. या परिसरांत भटकंती करणार्‍यांसाठी निवासाची व्यवस्था उंडणगाव येथे अनिरूद्ध नाईक, मिलिंद महाजन, सुधीर महाजन, निलेश महाजन, विजय नाईक ही मंडळी उत्साहाने करतात. या भागातील शाश्‍वत पर्यटनासाठी सगळ्यां मिळून प्रयत्न करण्याची गरज आहे.)   (फोटो सौजन्य : आकाश धुमणे, व्हिन्सेंट पास्किनली)

श्रीकांत उमरीकर

1 Comment