अजिंठा लेणी | Ajanta caves
औरंगाबादपासून सुमारे १०२ किलोमीटर अंतरावर घळीच्या आकारातील पर्वतात अप्रतिम अजिंठा लेणी (Ajantha caves) कोरण्यात आल्या आहेत. इ.स.पूर्व २०० ते ६५० या काळातल्या त्या अजिंठा लेण्या कोरीव काम व रंगीत भिंतीचित्रासाठी जग प्रसिध्द आहेत . एकूण ३० लेण्या आहेत व त्या सर्व लेण्या बौद्ध धर्मीय आहेत याच प्रमाणे कोरिवे काम असलेले बौद्ध मंदिरे, गुफा, बुद्धांच्या जीवनावर कोरलेले अनेक प्रसंग हे अतिशय आकर्षित व आश्चर्य करणारे आहेत . बौद्ध वास्तुशास्त्र, भित्तीचित्रे आणि शिल्पकलेचा आदर्श नमुना असलेल्या या लेण्यांमध्ये भगवान बुद्धांना अर्पण केलेली चैत्य दालने आणि प्रार्थनागृहे आणि ध्यान व धार्मिक साधनेसाठी बौद्ध भिख्खु वापरत असलेले विहार आणि आश्रम आहेत.लेण्यांमधील भिंती आणि छतांवर काढलेल्या देखण्या चित्रांमधून भगवान बुद्धांच्या जीवनातील वेगवेगळे प्रसंग आणि बौद्ध देवता यांचे व्यापक चित्रण आढळते. सुमारे ७०० वर्षे वापरात असलेल्या अजिंठा लेण्या काही कारणांमुळे अशाच सोडून देण्यात आल्या होत्या. त्यानंतर सुमारे १००० वर्षाहून अधिक काळ लेण्या अज्ञात राहिल्या.
ब्रिटिश लष्करी अधिकारी जॉन स्मिथ १८३९ मध्ये शिकारीसाठी अजिंठा लेणीच्या घळीसारख्या पर्वतावर आला होता. येथून त्याला पर्वताच्या उदरात काहीतरी बांधकाम दडले असल्याची शंका आली. त्याने नोकरांच्या मदतीने शोध घेतला असताना त्याला या लेण्या दिसून आल्या. बरीच स्वच्छता केल्यावर त्या लोकांसाठी खुल्या करण्यात आल्या.
सप्तकुंड तलाव—–घळीसारख्या पर्वतावरुन धबधब्याच्या रुपांनी कोसळणारे निळेशार पाणी या तलावात जमा होतो. त्यामुळे याला सप्तकुंड असे नाव पडले असावे. अमग्डॅलॉईड प्रकारच्या खडकात या लेण्या कोरण्यात आल्या आहेत. यांची उंची ५६ मीटर असून सुमारे ५५० मीटरपर्यंत घळीच्या आकारात पसरलेल्या आहेत. अशी काढली दगडांवर सुंदर चित्रे—प्रथम धातुमिश्रित माती घेण्यात आली. त्यात डोंगरातील दगडांचे बारीक कण, वनस्पतींचे तंतु, तांदळाचा भुसा, गवत, बारीक वाळू आदी वापरुन दगडांवर कॅनव्हास तयार करण्यात आला. त्यानंतर तो लिंबू पाण्याने धुण्यात आला. रंग देण्याची पद्धत साधी आणि सुटसुटीत होती. आधी आऊटलाईन काढली जाई. त्यानंतर वेगवेगळे रंग चिकटविले जात असे. यासाठी विशिष्ट पद्धतीची रंगसंगती वापरण्यात आलेली नाही. आवश्यकतेप्रमाणे रंगात बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे या शैलीने जगात वेगळेपण टिकवून ठेवले आहे.
अजिंठा गावापासून अजिंठा लेण्या ह्या ११ किलोमीटर अंतरावर आहे तर जळगाव रेल्वे स्टेशन पासून ५९ किलोमीटर अंतरावर औरंगाबाद अजिंठा ह्या रस्त्यावरून जातांना ह्या लेण्यांचे अतिशय विस्मरणीय असे दृश्य दिसून येते ह्या लेण्यांना भेट देण्यास ४ किलोमीटर पासून बस व्यवस्था केली असून इतर गाड्यांनी होणारे प्रदूषण हे टाळले जाते . येथे येणाऱ्या पर्यटकांसाठी पर्यटक निवास ,शासकीय विश्रामगृह व लॉज आहेत.
माहिती साभार – durgbharari | सुरेश निंबाळकर