महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,37,160

अजिंक्यतारा किल्ला

By Discover Maharashtra Views: 4879 4 Min Read

अजिंक्यतारा किल्ला…

अजिंक्यतारा किल्ला सातारचा किल्ला म्हणुन देखील ओळखला जातो. अजिंक्यतारा किल्ल्याच्या पायथ्याशी सातारा शहर वसलेले आहे. गडावरून सातारा शहराचे विहंगम दृश्य दिसते. प्रतापगडा पासून फुटणाऱ्या बामणोली रांगेवर अजिंक्यतारा उभा आहे. गडावरुन पूर्वेला नांदगिरी, जरंडा, कल्याणगड, चंदन-वंदन हे किल्ले आणि पश्चिमेला यवतेश्वर तर दक्षिणेला सज्जनगड दिसतो. सातारा शहरापासुन गडाची उंची अंदाजे ९०० फुट असून लांबी x रुंदी अनुक्रमे ३५०० x २००० फुट आहे. किल्ल्याला दोन मुख्य दरवाजे असुन महाद्वार उत्तर दिशेला तर दुसरा दरवाजा दक्षिण दिशेला आहे. या दरवाजात येणारी वाट सातारा-कराड हमरस्त्यावरून येते. किल्ल्यावर प्रवेश करताना दोन्ही बाजूनी दोन दरवाजे पार करावे लागतात.

साताऱ्यातून ज्या मार्गाने आपण गडावर प्रवेश करतो त्यामार्गावर दोन दरवाजे आहेत. आजही या दोन दरवाजांपैकी पहिला दरवाजा सुस्थितीत आहे दरवाजाचे दोन्ही बुरूज अस्तित्वात आहेत. तटाची उंची अंदाजे१५ फुट असुन रुंदी १० फुट आहे. दरवाजातून आत शिरल्यावर उजवीकडे हनुमानाचे मंदिर आहे तर डावीकडील सरळ रस्त्याने पुढे गेल्यावर वाटेत महादेवाचे मंदिर लागते. पुढे गेल्यावर डावीकडे जाणारी वाट दिसते व “मंगळादेवी मंदिराकडे” असे तिथे लिहिलेले आढळते. या वाटेत ताराबाईंचा ढासळलेला राजवाडा आहे. येथे एक कोठारही आहे. वाटेच्या शेवटी मंगळादेवीचे मंदिर लागते. मंदिराच्या समोरच मंगळाईचा बुरूज आहे. हा गडाचा ईशान्य भाग आहे. मंदिराच्या आवारात अनेक शिल्प आढळतात. या वाटेने थेट तटबंदीच्या साह्याने गडाला प्रदक्षिणा घालून आल्या मार्गाने खाली उतरावे. गडावर पाण्याचे ६ तलाव आहेत पण उन्हाळ्यात मात्र तलावांत पाणी नसते.

सातारचा किल्ला मराठ्यांची चौथी राजधानी. पहिली राजगड मग रायगड, जिंजी आणि चौथी अजिंक्यतारा. साताऱ्याचा किल्ला हा शिलाहारवंशीय भोज याने इ.स. ११५० मध्ये बांधला. पुढे हा किल्ला बहामनी सत्तेकडे आणि मग विजापूरच्या आदिलशहाकडे गेला. इ.स. १५८० मध्ये पहिल्या आदिलशहाची पत्नी चांदबिबी येथे कैदेत होती. तसेच मुधोजी आणि बजाजी निंबाळकर सुद्धा या ठिकाणी तुरुंगात होते. शिवराज्याचा विस्तार होत असतांना ११ नोव्हेंबर १६७५ मध्ये हा किल्ला शिवाजी महाराजांनी जिंकून घेतला. या किल्ल्यावर शिवरायांना अंगी ज्वर आल्याने दोन महिने विश्रांती घ्यावी लागली ती १ डिसेंबर १६७५ ते २५ जानेवारी १६७६. शिवाजीराजांच्या मृत्यूनंतर १६८२ मध्ये औरंगजेब महाराष्ट्रात शिरला. इ.स. १६९९ मध्ये औरंगजेबाने साताऱ्याच्या दुर्गाला वेढा घातला. त्यावेळी गडावरचा किल्लेदार प्रयागजी प्रभू होते. १३ एप्रिल १७०० च्या पहाटे मोगलांनी सुरंग लावण्यासाठी दोन भुयारे खणली आणि बत्ती देताच क्षणभरातच मंगळाईचा बुरूज आकाशात भिरकावला गेला. तटावरील काही मराठे दगावले. प्रयागजी प्रभू देखील या स्फोटात सापडले, मात्र काहीही इजा न होता ते वाचले. तेवढ्यातच दुसरा स्फोट झाला. त्यामुळे मोठा तट पुढे घुसणाऱ्या मोगलांवर ढासळला व दीड हजार मोगल सैन्य मारले गेले. किल्ल्यावरील सर्व दाणागोटा व दारूगोळा संपल्यावर २१ एप्रिल रोजी मराठ्यांनी किल्ला मोगलांच्या हवाली केला. किल्ल्यावर मोगली निशाण फडकण्यास तब्बल साडेचार महिने लागले. किल्ल्याचे नामकरण झाले आझमतारा.

ताराराणीच्या सैन्याने पुन्हा हा किल्ला इ.स.१७०६ मध्ये जिंकला व त्याचे नामातंर केले अजिंक्यतारा ! पण ताराराणीला काही हा किल्ला लाभला नाही. इ.स. १७३० मध्ये ताराराणीसाहेब आणि इ.स. १७४१ मध्ये अर्काटचा नवाब चंदासाहेब या किल्ल्यावर कैदेत होते. पुन्हा किल्ला मोगलांच्या स्वाधीन झाला मात्र इ.स. १७०८ मध्ये शाहुने फितवून किल्ला घेतला आणि स्वत…:स राज्याभिषेक करून घेतला. इ.स. १७१९ मध्ये महाराजांच्या मातोश्री येसूबाई यांना किल्ल्यावर आणण्यात आले. पुढे पेशव्याकडे हा किल्ला गेला. दुसर्याह शाहुच्या निधनानंतर फितुरीमुळे किल्ला ११ फेब्रुवारी १८१८ मध्ये इग्रजांकडे गेला. संपूर्ण गड फिरण्यासाठी साधारणत दीड तास लागतो.

माहिती साभार
सुरेश किसन निंबाळकर

सदर संकेतस्थळाचे सर्व हक्क राखिव असून येथे प्रकाशित झालेला कोणताही लेख अथवा छायाचित्र हे लेखकाच्या किंवा प्रकाशकाच्या परवानगीशिवाय वापरता येणार नाही याची नोंद घ्यावी. असे केलेले आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

Leave a Comment