अक्कलकोट संस्थान शस्त्रागार –
अक्कलकोट नगरीला तीनशे वर्षांपासूनचा संस्थानी इतिहास आहे. त्याच्या खुणा नवाजुना राजवाडा, ऐतिहासिक मंदिरे, राजघराण्याची स्मारके यांतून या नगरीत अद्यापि दिसतात. त्यातील भोसल्यांचे शस्त्रागार महत्त्वाचे. अक्कलकोटचे संस्थान छत्रपती शाहू महाराजांच्या साताऱ्याच्या गादीबरोबर आकारास आले. राजे फत्तेसिंह भोसले हे शाहूंचे मानसपुत्र. ते या संस्थानचे पहिले राजे! ती गोष्ट १७०७ सालची. पुढे १८९६ ते १९२३ मध्ये फत्तेसिंह भोसले (तिसरे) हे राजे होऊन गेले. त्यांचे कर्तृत्व अलौकिक आणि त्यांची दृष्टी असामान्य. त्या राजाच्या काळातच अक्कलकोटचा नवा राजवाडा आणि त्यांचे शस्त्रागार उभे राहिले.(अक्कलकोट संस्थान शस्त्रागार)
त्यांचा नवा राजवाडा म्हणजे लंडनच्या बकिंगहॅम पॅलेसची प्रतिकृती; तीसुद्धा सोलापूरजवळच्या अक्कलकोट शहरात! वर्तमानात वाटणारी ती विसंगती राजवाड्याच्या अवशेषांच्या रूपाने इतिहासातील ते वैभव आपल्या समोर उभे करू शकले. त्या राजवाड्याचे बांधकाम १९१० साली सुरू झाले. ते पुढे तब्बल तेरा वर्षांनी, १९२३ साली पूर्ण झाले. तो राजवाडा त्याच्या भव्यतेने दीपवून टाकतो. तो पाश्चात्य शैलीत आहे. तो अष्टकोनी, तीन मजले उंच आहे. असंख्य खोल्या, दालने, स्तंभ-कमानीच्या रचना आणि त्या साऱ्यावर चार मजली उंच घड्याळाचा मनोरा. तेथील या मातीत ते सारे चित्र अद्भुत वाटते.
वाड्याच्या दर्शनी भागावर अक्कलकोट संस्थानचे राजचिन्ह आहे आणि त्याखाली ‘सत्यमेव जयते’ ही त्यांची राजमुद्राही आहे. आपल्या देशाचे म्हणून वापरात असलेले ते बोधवाक्य कधीकाळी अक्कलकोट संस्थान होते!
राजवाड्याच्या पहिल्या मजल्यावर शस्त्रागार आहे. राजे फत्तेसिंह भोसले (तिसरे) यांना वेगवेगळी शस्त्रे जमवण्याचा छंद होता . त्यांना अवघे अठ्ठावीस वर्षांचे आयुष्य लाभले. त्यांनी रणांगणावरील पराक्रम गाजवलाच तो पराक्रम गाजवणारी पण त्याबरोबर असंख्य शस्त्रेही जमवली. त्या संग्रहातून अक्कलकोटचे हे शस्त्रागार १९२२ साली आकाराला आले. सुरुवातीची अनेक वर्षे संग्रहालय अक्कलकोटचा जुन्या किल्लेवजा राजवाड्यात होते, ते सुरक्षिततेच्या कारणास्तव २००२ मध्ये नव्या राजवाड्यात हलवण्यात आले. अकराशे तलवारी, दोनशेहून अधिक बंदुका, तेवीस लहानमोठ्या तोफा, बावन्न पिस्तुले; तसेच, कट्यार, गुप्ती, बिचवे, खंजीर, भाले, परशू, अंकुश, वाघनखे, बाण आणि आणखी कितीतरी… त्या हत्यारांचे वैविध्य आणि संख्याबळच प्रेक्षकाचे डोळे दिपवून टाकते.
आयुधांचा प्रवास सुरू होतो तो तलवारींच्या खणखणाटाने! वेगवेगळ्या आकार-प्रकारांतील पाती! शिवकालीन बाकदार, पेशवाईतील सरळ, मुस्लिम सत्ताधीशांच्या पल्लेदार, ब्रिटिशांच्या आखूड अशा अनेक तलवारी तेथे दिसतात. अन्य परदेशांतील तलवारींचे नमुनेही तेथे आहेत. त्यातूनच मग ब्रिटिशांची किरिंची, सळसळत्या रूपातील नागीण, सरळ धारेची नायर, जाडजूड पात्याची खांडा या आगळ्या तलवारी पुढे येतात. त्यांची तेथील मांडणीही वेगळ्या प्रकारे केली आहे. उगवत्या, मध्यान्हीच्या आणि मावळत्या सूर्याच्या आकृतीत तलवारी तेथे तळपत आहेत.
सूर्याच्या त्या अवस्था साकार करताना त्यांनी ढालींचे गोळे आणि बाण-कट्यारींची किरणे बनवली आहेत. यज्ञकुंडाच्या धर्तीवर छोट्या तलवारींपासून तेथे जागोजागी धगधगती ‘शस्त्रकुंडे’ चेतवली आहेत. आकार-रूपाने वेगवेगळय़ा जातींच्या त्या तलवारी पोलाद, चांदी आणि काही तर चक्क सोन्याच्या पाण्यापासून बनवलेल्या आहेत. काहींच्या मुठीवरील लेखांमधून त्यांच्या कर्त्यांकरवित्याची माहिती मिळते, तर काहींवर असलेली गोल छिद्रे त्या प्रत्येकामागे शंभर माणसे मारली असल्याचा हिशोब सादर सांगतात.
कट्यारी, बिचवे, कुकरी, कोयते, भाले, बाण, गुप्ती, अंकुश, परशू अशी शत्रूच्या रक्ताला चटावलेली हत्यारे एकेक करत पुढे येऊ लागतात. अचानक उघडणारी दुधारी कट्यार, शत्रूवर फेकले जाणारे सुरे, वेध घेणारे बाण, धावत्या घोड्यावरून मारा करण्याचे भाले, हत्तीवरील ‘अंकुश’, जडावातील खंजीर-कट्यारी असा सारा हत्यारांचा मामला प्रेक्षकास सामोरा येऊ लागतो. त्यांच्या अधे-मधे बचाव करणारी चिलखते, शिरस्त्राण, जिरेटोप, अंगरखा आणि त्या ढाली यांचे सुरक्षाकवचही दिसते.
हत्यारांची दालने जातात आणि पुढच्या दालनात हत्यारांनीच वेध घेतलेल्या शिकारी प्रेक्षकास दिसू लागतात. वाघ, बिबटे, अस्वल, गवा, तरस, रानडुक्कर आणि तेथील सांगवी तलावातील मगरी… या शिकारी तेथे पेंढा भरून ठेवलेल्या आहेत.
शिकारीनंतंरच्या पुढच्या काही दालनांमधून बंदूक-तोफांचे आवाज निघू लागतात. देशी-विदेशी, इतिहास-वर्तमानातील अशा असंख्य बंदुका त्यांची उत्क्रांतीची कथा सांगू लागतात. ठासणी, तोड्या, केप, रायफली, किराबीन, पिस्तूल, संगिनी अशा वेगवेगळ्या जातींच्या बंदुका, प्रत्येकीचा आकार, रंग-रूप आणि सावज निराळ्या टप्प्यांतील. तळहातावर बसेल अशा पिस्तुलापासून ते बारा फूट लांबीच्या बंदुकीपर्यंतचा तो सारा प्रवास! पंचधातूच्या, उखळी, छोट्या-मोठ्या आकारातील तोफा आणि पहिल्या महायुद्धात वापरलेल्या मशिनगन्स देखील तेथे दिसतात.
राजे फत्तेसिंह यांनी पहिल्या महायुद्धात ब्रिटिशांकडून भाग घेतला होता. त्या दरम्यान ब्रिटिशांशी जुळलेल्या मैत्रीतून त्यांनी ही देशी-विदेशी असंख्य हत्यारे मिळवली. पण ब्रिटिश धूर्त होते. त्या पराक्रमी राजाच्या हाती ती हत्यारे त्यांनी ती निकामी करून दिली.
संग्रहालयात ऐतिहासिक भांडी, मौल्यवान-शोभेच्या वस्तू, खेळणी असा अन्य संग्रहही आहे. संस्थानच्या राजांची तैलचित्रे आहेत. सर्वत्र दिसणाऱ्या सिंहासनाऐवजी हत्तीच्या पायापासून बनवलेले आगळेवेगळे ‘गजासन’ तेथे आहे. अक्कलकोट संस्थानच्या वंशजांकडून त्या साऱ्या ऐतिहासिक ठेव्याचे पिढ्यान् पिढ्या जतन केले जात आहे. सध्या ती जबाबदारी श्रीमंत महाराज मालोजीराजे संयुक्ताराजे भोसले ( तिसरे ) हे पार पाडीत आहेत .
ऐतिहासिक वास्तू आणि वस्तू या त्या त्या काळा-वेळाचे दर्शन घडवतात. कधी काळी बांधलेला हा अक्कलकोटचा राजवाडा आणि त्यातली ही जुनी ऐतिहासिक हत्यारे पाहताना हाच अनुभव येतो. शस्त्रांचा हा खणखणाट सतराव्या शतकातील रणभूमीवर घेऊन जातो. यामुळे श्री स्वामी समर्थाच्या दर्शनाने भक्तिरसात बुडालेले मन शस्त्रागारातून बघताना इतिहासातही चिंब भिजून जाते.
अश्या या दैदीप्यमान संस्थान चा गादीवारस श्रीमंत महाराज मालोजीराजे संयुक्ताराजे भोसले ( तिसरे ) हे सांभाळीत आहेत.
Cr – फेसबुक काका