अक्कलकोट भुईकोट –
सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील अक्कलकोट शहरात फत्तेसिंह भोसले यांचा मजबूत भुईकोट आणि नवीन राजवाडा आहे. अक्कलकोट हे सोलापूरपासून साधारण ४० कि.मी अंतरावर आहे. अक्कलकोट स्वामी समर्थांच्या समाधी मंदिरामुळे सुप्रसिद्ध आहे व येथे भक्तांची गर्दी कायम पहायला मिळते. पण अक्कलकोट शहर हे दुसऱ्या गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे ते म्हणजे फत्तेसिंह भोसले नवीन राजवाड्यातील शस्त्रागारासाठी आशियातील सर्वात मोठे शस्त्रागार येथे पहायला मिळते.(अक्कलकोट भुईकोट)
अक्कलकोटचा भुईकोट हा प्रचंड मोठा आहे. त्याचे प्रवेशद्वार एकदम भव्य आहे. आतमध्ये मोठ्या राजवाड्यासारख्या वास्तू आहेत पण त्या मोडकळीस आल्या आहेत. भुईकोटाच्या दुसऱ्या बाजूस शाळा आहे. श्रीमंत राणी निर्मलाराजे कन्या प्रशाला, अक्कलकोट. शाळेच्या परिसरात नरसिंहाचे शिल्प आढळते. याशिवाय रतीमदन व नंदी यांचे शिल्प पाहावयास मिळते. अजस्त्र अशी तोफ आहे. भुईकोटाची तटबंदी आणि बुरूज आजही भक्कम स्थितीत आहेत.
नवीन राजवाड्याचे बांधकाम तिसरे फत्तेसिंह भोसले यांच्या कारकीर्दीत इ.स. १९१० ते १९२३ या काळात पूर्ण झाले. हा राजवाडा म्हणजे ब्रिटनच्या बंकिगहॕम पॕलेसची प्रतिकृती. एकदम भव्य दालने, चार मजली उंच घड्याळाचा मनोरा संपूर्ण पाश्चात्त्य शैलीत बांधलेला एकदम डोळे दिपवून टाकतो. राजवाड्यातील शस्त्रागारात आपल्याला विविध बंदूका, तोफा, अकराशेच्या आसपास वेगवेगळ्या तलवारी, भाले, ढाली, खंजीर, बाण असे अनेक प्रकारची शस्त्रे एकाच ठिकाणी पहायला मिळतात.
छत्रपती संभाजी महाराजांच्या हौतात्म्यानंतर छत्रपती शाहू महाराज औरंगजेबाच्या कैदेत होते. इ.स. १७०७-०८ दरम्यान कैदेतून मुक्त झाल्यावर परत येताना वाटेवर काही सरदार त्यांना येऊन मिळाले. औरंगाबाद जिल्ह्यातील शिवणी परगण्यातील ‘पारद’ या गावचे बाबाजी लोखंडे पाटील यांनी शाहूराजांसोबत येण्याचे नाकारले व गढीचा दरवाजा बंद केला. शाहूराजांच्या सैन्याने गढीवर हल्ला चढवला. लोखंडे पाटील मारले गेले. बाबाजी पाटलांची सून अहिल्याबाई हिने आपले मूल शाहूराजांच्या पालखीत टाकले. शाहूराजांनी त्याचे “फत्तेसिंह” नामकरण करुन त्याचे पालकत्त्व स्विकारले. फत्तेसिंह पुढे मोठा झाला. त्यांनी कर्नाटक, जंजिरा मोहिमांत पराक्रम गाजवला. छत्रपती शाहूं महाराजांकडून त्यांना ‘अक्कलकोट’ परगणा मिळाला! दोन लाख पन्नास हजारांचा जहागीरदार फत्तेसिंह भोसले यांनी राममंदीर बांधले आणि वरील कोटात काही सुधारणा केल्या. त्याच्यानंतर शहाजीराजे यांच्याकडे वारसा आला. त्यांचे पुत्र फत्तेसिंह दुसरे गादीवर आले. इ.स.१८१८ ला मराठेशाही संपल्यावर ईस्ट इंडिया कंपनीने अक्कलकोट संस्थान निर्माण केले.
टीम – पुढची मोहीम