अक्राणी महल किल्ला –
एकेकाळी खानदेशात असणारे नंदुरबार खानदेशच्या विभाजनानंतर स्वतंत्र जिल्हा म्हणुन अस्तित्वात आले. नंदुरबार जिल्ह्याच्या सीमा थेट मध्यप्रदेश व गुजरात राज्याला भिडल्या आहेत. अदीवासीबहुल असलेल्या या नंदुरबार जिल्ह्यात एकेकाळी एक दोन नव्हे तर तब्बल १५ किल्ले गिरीदुर्ग, भुईकोट व गढी या स्वरुपात अस्तित्वात होते. दुर्गमहर्षी प्रमोद मांडे यांचे महाराष्ट्रातील गडकिल्ले या पुस्तकातील ७ किल्ले वगळता इतरत्र कोठेही या किल्ल्यांचा उल्लेख दिसुन येत नाही. आजच्या संगणकाच्या युगात अक्राणी किल्ला वगळता आंतरजालावरही या किल्ल्यांची माहिती दिसुन येत नाही. आमच्या दुर्गभरारी या समुहाने या सर्व किल्ल्यांचा अभ्यासपुर्ण दौरा केला असता मिळालेली माहिती या संकेतस्थळावर मांडण्याचा मी प्रयत्न केला आहे. यातील हटमोईदा व अष्टे या दोन गढी पुर्णपणे नष्ट झालेल्या असुन उरलेले १३ गढीकिल्ले त्यांचे उर्वरित अवशेष संभाळत काळाशी झुंज देत आजही उभे आहेत.(अक्राणी महल किल्ला)
या १३ किल्ल्यात १ गिरिदुर्ग असुन ३ भुईकोट २ नगरकोट तर उरलेल्या ७ गढी आहेत. नंदुरबार जिल्ह्यातून वाहणाऱ्या तापी नदीमुळे या जिल्ह्याचे उत्तर आणि दक्षिण असे दोन भाग झालेले आहेत. अक्राणी हे संस्थान असून महल म्हणजे सुभा किंवा प्रांत. महलचा दुसरा अर्थ तालुक्याचा पोटभाग असाही होतो. अक्राणी महाल हा किल्ला उत्तर नंदुरबार भागात तळोदे तालुक्यात धडगाव पासुन २८ कि.मी. अंतरावर आहे. नंदुरबार अक्राणीमहल हे अंतर ८३ कि.मी.असुन प्रकाशा-म्हसवड-खामला मार्गे तेथे जाता येते. खामला गावापासून दक्षिणेकडे ७ किलोमीटरवर अक्राणी गाव आहे. अक्राणी किल्ला हा धडगावचा किल्ला म्हणुन देखील ओळखला जातो.
स्थानिक लोकांच्या माहितीनुसार हळदी घाटाच्या युद्धात राणाप्रतापचा पराभव झाल्यावर महाराणा प्रतापांची बहीण अक्काराणी व काही राजपुतांनी सातपुड्यातील या भागाचा आश्रय घेतला. अक्राणी किल्ला महाराणा प्रताप यांची बहिण अक्काराणीने बांधला असुन तिच्या नावावरून या किल्ल्याला व धडगाव तालुक्यास अक्राणी महल असे नाव पडले. खामला गावाकडून अक्राणी गावाकडे जाताना डोंगर उतारावर हा किल्ला व महालाचे अवशेष दृष्टीस पडतात. बाहेरील बाजुने मुख्य किल्ल्याचे सरंक्षण व आतील एका कोपऱ्यात गढीवजा महाल अशी या किल्ल्याची रचना आहे. आयताकृती आकाराचा हा किल्ला २.५ एकर भुभागावर पसरलेला असुन आतील महाल १५० x १७५ फूट आकाराचा आहे. महालाच्या बाहेर असलेल्या किल्ल्याच्या आवारात शेती केली जात असल्याने महाल व बाहेरील तटबंदी बुरुज दरवाजा वगळता आतील अवशेष भुईसपाट झाले आहेत.
रस्त्याने जाताना डाव्या बाजुला किल्ल्याबाहेर आपल्याला राजघराण्यातील ५ समाध्या दिसुन येतात. या समाध्या पाहुन पुढे आल्यावर रस्त्यावरूनच आपल्याला डावीकडे वरील बाजुस साधारण ५० फुट उंचीवर किल्ल्याचा पश्चिमाभिमुख मुख्य दरवाजा व बुरुज दिसुन येतात. दगडविटांमध्ये बांधलेल्या या महालाचा बुरुज व दरवाजा आजही सुस्थितीत आहे. तटबंदीचा फांजीपर्यंत भाग दगडांनी बांधलेला असुन वरील भाग विटांनी बांधुन काढला आहे. किल्ल्याची तटबंदी मोठया प्रमाणात ढासळलेली असुन आतील महालाची तटबंदी मात्र आजही शिल्लक आहे. महालाच्या चार टोकाला चार बुरुज असुन बाहेरील तटबंदी मोठया प्रमाणात कोसळली असल्याने त्यात केवळ तीन बुरुज शिल्लक आहेत. महालाचे एकंदर बांधकाम व त्यातील वाशांच्या खोबणी पहाता हा महाल तीन मजली असल्याचे जाणवते.
महालाच्या आतील भिंतीत ठिकठिकाणी कोनाडे केलेले असुन सर्व भिंती आज उभ्या असल्या तरी ठिकठिकाणी त्यांची पडझड झालेली आहे. महालाचा मुख्य दरवाजा उत्तराभिमुख असुन आज त्याचे कोणतेही अवशेष शिल्लक नाहीत. महालाच्या आतील दालनात वरून गोलाकार तोंड असलेले एक खोल तळघर असुन त्यात उतरण्याची सोय नसल्याने त्याच्या आकाराचा अंदाज घेता येत नाही. याशिवाय महालातच एक लहानसे बांधीव टाके असुन त्याशेजारी भग्न झालेली दगडी ढोणी आहे. येथे आपली गडफेरी पूर्ण होते. किल्ला पहाण्यास अर्धा तास पुरेसा होतो. याशिवाय रस्त्याच्या विरुध्द बाजुस उतारावर तीन-चार झाडे असलेल्या ठिकाणी एका चौथऱ्यावर घडीव दगडात बांधलेले घुमटीवजा छोटसे मंदिर असुन या मंदिरात काही शिल्प ठेवलेली आहेत. या मंदिराखालुन बारमाही वहाणारा पाण्याचा झरा असुन तो उन्हाळ्यातही आटत नाही.
मंदिरावर ठळक अक्षरात राणी काजल माता मंदिर असे लिहिलेले असुन स्थानिक मात्र या मंदिराला राणी का जल मंदिर म्हणुन ओळखतात. खानदेशचा पहिला सुलतान फारुकी मलिकराज यांने सुलतानपूर व नंदुरबार हीं शहरे व त्याचा आसपासचा परीसर इ.स.१५३० सालीं ताब्यात घेतला परंतु गुजरात सुलतान मुजफर ह्याच्या आक्रमणाने फारुकी मलिकराज याला थाळनेराकडे परतावें लागलें. इ.स. १५३६ मध्यें महंमदशहा बेगडा या गुजरातच्या सुलतानाने राजा झाल्यावर सुलतानपूर व नंदुरबार हीं ठाणीं व हा भाग मुबारकखान फारुकी यांस दिला. खानदेशात फारुकी सत्ता असताना त्यात धडगांवचाही समावेश होता. १५ व्या शतकात फारुकी राजवटीचा शेवट झाल्यावर या परगण्यास कुणी वारस राहिला नाही व काठी संस्थानातील छावजी राणा यांनी या संस्थानचा ताबा घेतला. छावजी राणा यांच्या मृत्यूनंतर अक्राणी सुभा त्यांचा मुलगा राणा गुमानसिंग यांच्याकडे आला व त्यांनी हा किल्ला बांधला.
महाराष्ट्र ज्ञानकोश खंड- ६ मध्ये काठीचे संस्थानिक राणा गुमानसिंग याने पंधराव्या शतकाच्या उत्तरार्धात अक्राणीचा किल्ला बांधल्याचा उल्लेख आहे. त्यांनंतर त्यांचे पुत्र हिम्मतसिंग यांनी अक्राणी येथे २८ वर्षे राज्य केले. हिम्मतसिंग यांना राणाबाबू व गुमानसिंग हे दोन पुत्र होते. त्यातील राणाबाबू आधीच मरण पावल्याने गुमानसिंग या पुत्राने अक्राणीवर १२ वर्षे राज्य केले. गुमानसिंग नंतर वारस नसल्याने तेथे अराजकता माजली व तेथील सैन्य व नातेवाईक उदयपूरला निघून गेले. या ठिकाणी असलेल्या समाध्या राणा यांच्या पूर्वजांच्या आहेत. धुळे जिल्हा गॅझेटप्रमाणे १६३४ मध्ये शहाजहानने खानदेशातील सुलतानपूर आणि नंदुरबार हे प्रांत माळवा प्रांताला जोडुन त्यांचे मुख्य केंद्र ब-हाणपूर ठेवले होते. तत्कालीन भिल्ल लोकांच्या आक्रमणापासून तळोदा. सुलतानपूर व इतर भागाला संरक्षण दयावे या अटीवर राणा कुटुंबाचे मूळ संस्थापक प्रतापसिंग यांना औरंगजेबाने अक्राणी महल परगणा दिल्याची शक्यता गॅझेटमध्ये वर्तवली आहे.
माहिती साभार
सुरेश किसन निंबाळकर
सदर संकेतस्थळाचे सर्व हक्क राखिव असून येथे प्रकाशित झालेला कोणताही लेख अथवा छायाचित्र हे लेखकाच्या किंवा प्रकाशकाच्या परवानगीशिवाय वापरता येणार नाही याची नोंद घ्यावी. असे केलेले आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
Very very good work