महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 89,09,355

अलंगगड | Alanggad Fort

Views: 3889
4 Min Read

अलंगगड | Alanggad Fort

नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी विभागाच्या दक्षिणेस १०-१२ कि.मी. पसरलेल्या कळसुबाईच्या रांगेत १५०० मीटरपेक्षा जास्त उंचीचे सर्वात कठीण असे तीन किल्ले आहेत. हे किल्ले सर करण्यासाठी प्रस्तरारोण तंत्राची व साहित्याची माहिती असणे आवश्यक आहे. घोटीवरून भंडारदर्याला जातांना कळसूबाई शिख्रराच्या रांगेत अलंगगड, मदन आणि कुलंग असे तीन किल्ले लक्ष वेधून घेतात. घनदाट जंगल आणि विरळ वस्ती यामुळे हा परिसरातील भटकंती तशी कस पहाणारी आहे. गडावर जाण्याच्या अवघड वाटा ,भरपूर पाऊस यामुळे हे दुर्गत्रिकुट तसे उपेक्षितच आहे. यांचा उल्लेख मिळतो तो इ.स.१८१८ मध्ये शेवटच्या इंग्रज मराठे युद्धात.

तीन चारशे मीटर उंचीच्या कड्याला बिलगून जाणारा मार्ग उभ्या कड्यात खोदलेल्या पायऱ्यांचा आहे. इ.स.१८१८ मध्ये कर्नल मक्डोवेल याने आपल्या अधिकारी यांच्या सहाय्याने या पायऱ्यांवर तोफा डागून व सुरुंग पेरून त्या नष्ट करून टाकल्या. या किल्ल्यावरील गुहा,पाण्याची टाकी यावरून हे किल्ले फार फार प्राचीन असावेत. किल्ल्याचा माथा म्हणजे एक प्रशस्त पठारच आहे किल्ल्यावर राहण्यासाठी दोन गुहा आहेत. पाण्याची ११ टाकी आहेत. यातील खालच्या टाक्यावर एक झिजून गेलेला शिलालेख आहे. किल्ल्यावर एक मोठया इमारतीचे काही अवशेष आहेत. हि इमारत इतकी मोठी आहे कि मदन व कुलंग या गडावरून देखील हे अवशेष अगदी स्पष्ट दिसतात. तसेच इतर घरांचे देखील बरेच अवशेष आहेत. एक छोटेसे मंदिर आहे.

किल्ल्यावरून आजुबाजूचा खूप मोठा परिसर दिसतो. पूर्वेला कळसूबाई, औंढाचा किल्ला,पट्टा, बितनगड,उत्तरेला हरिहर ,त्र्यंबकगड, अंजनेरी तर दक्षिणेला हरिश्चंद्रगड, आजोबाचा गड, खुट्टा सुळका , रतनगड, कात्राबाई चा डोंगर हा परिसर दिसतो. किल्ल्याचा माथा फिरण्यास ४ तास पुरतात. अलंग किल्ल्यावर जाण्यासाठी इगतपुरी किंवा कसारा गाठावे इगतपुरी/कसारा-घोटी-पिंपळनेर या मार्गे आंबेवाडी गाठावी. घोटी ते आंबेवाडी अशी एस.टी. सेवा देखील उपलब्ध आहे. घोटी ते आंबेवाडी हे साधारण ३२ किमी चे अंतर आहे. घोटीवरुन पहाटे आंबेवाडी ला ६.०० वाजताची बस आहे. आंबेवाडीतून समोरच अलंग, मदन आणि कुलंग हे तीन किल्ले दिसतात. गावातून अलंग आणि मदन किल्ल्याच्या खिंडी पर्यंत जाण्यासाठी वाट आहे. वाट फारच दमछाक करणारी आहे. खिंड गाठण्यास ३ तास लागतात.

खिंडीत पोहचल्यावर डावीकडचा अलंग किल्ला, तर उजवीकडचा मदन किल्ला. येथून अलंगवर जाण्यासाठी दोन वाटा आहेत. अ) एक वाट खिंडीतून समोरच्या दिशेने खाली उतरते. १ तासात आपण खालच्या पठारावर पोहोचतो. येथून अलंगचा कडा डावीकडे ठेवत १ तासात आपण किल्ल्यावरून येणाऱ्या तिसऱ्या घळीपाशी पोहोचतो. या घळीतच एक लाकडी बेचका ठेवला आहे. या बेचक्यातून वर गेल्यावर थोडे सोपे प्रस्तरारोहण करावे लागते. पुढे थोडीशी सपाटी लागते.येथून डावीकडे कड्यालगत जाणारी वाट पकडावी. १० ते १५ मिनिटात आपण किल्ल्यावरील गुहेत पोहोचतो. आंबेवाडीतून येथपर्यंत पोहचण्यास ८ ते ९ तास उलटून गेलेले असतात.ब) खिंडीतून डावीकडच्या वाटेने थोडे पुढे गेल्यावर सोपे प्रस्तरारोहण केल्यावर काही पायऱ्या लागतात. या पायऱ्या चढून गेल्यावर एक ८० ते ९० फूटाचा सरळसोट तुटलेला कडा लागतो. या कड्यावर प्रस्तरारोहणाचे साहित्य वापरून किल्ल्यावर प्रवेश करता येतो. प्रस्तरारोहणाचे तंत्र अवगत असल्याशिवाय या वाटेने जाण्याचे धाडस करू नये. या वाटेने किल्ला गाठण्यास ६ तास लागतात.

माहिती साभार
सुरेश किसन निंबाळकर
सदर संकेतस्थळाचे सर्व हक्क राखिव असून येथे प्रकाशित झालेला कोणताही लेख अथवा छायाचित्र हे लेखकाच्या किंवा प्रकाशकाच्या परवानगीशिवाय वापरता येणार नाही याची नोंद घ्यावी. असे केलेले आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

Leave a Comment