आळतं सुंदरी –
प्राचीन मंदिरांच्या मंडोवरावर (बाह्यभागावर) सुरसुंदरींची शिल्पे हे एक वैशिष्ट्य आढळून येतं. १२ व्या शतकातील प्राचीन अशा गुप्तेश्वर मंदिर (ता. गंगाखेड जि. परभणी) येथे “आळतं सुंदरी”चे हे शिल्प कोरलेलं आहे. मंदिराच्या उत्तर भागात विष्णुचे पद्मनाभ रूपातील शिल्प देवकोष्टकात आहे. त्याच्या बाजूला हे शिल्प आहे. मंगल कार्य घरात असेल तेंव्हा उखळा जात्याचा मुहूर्त केला जातो. उखळ जात्याची पूजा करून पाच स्त्रीया त्यावर ठेवलेले विडे उचलून उखाणे घेतात. यावेळी वधु, करवली, तिची आई किंवा वरमाय यांना न्हाउ घातलं जातं. व नंतर त्यांच्या पायावर ओल्या कुंकवाचे पट्टे रेखतात. स्वस्तीक काढलं जातं. याला “आळतं” म्हणतात.
या शिल्पात ही नववधु वेलीला टेकुन उभी आहे. तिच्या तळपायावर दूसरी स्री आळतं भरत आहे. हे खोड वेलीचं आहे कारण याच परिसरांत जात्यावरच्या ओव्यांत एक गोड असा संदर्भ आलेला आहे
दारी मांडव ग घाला ।
फुला सगट जाईचा ।
छंद मुलाच्या आईचा ।।
दारात वेल आहे आणि त्या फुलांचा सुगंध सर्व परिसरात भरून राहिला आहे. शिल्पाच्या वरच्या भागात वेलीचा पर्णविस्तार नक्षीच्या माध्यमातून दाखवला आहे. या शिल्पातील स्त्रीचा जो केसांचा मोठा अंबाडा दाखवला आहे त्यावर गजरा माळलेला आहे.
काही शिल्पं “सुरसुंदरी” या शब्दांत बसत नाहीत. पत्र सुंदरी, शत्रु मर्दिनी, पुत्र वल्लभा अशी शिल्पं ज्यांच्यावर याच सदरात लिहिलं आहे ती स्त्री स्वभावाचे विविध पैलू दाखवतात. ती केवळ शृंगारापुरती मर्यादीत नाही हे स्पष्ट करतात. ही आळतं सुंदरी पण अशीच वेगळी आहे. या परिसरांतील रिती रिवाज परंपरा यांचे प्रतिबिंब यात उमटले आहे. अभ्यासक डाॅ. ए.डि. शिंदे सर यांनी आळतं सुंदरी हे नाव या शिल्पाला दिलं. मला हे मोठं वैशिष्ट्यपूर्ण असं शिल्प वाटलं. या मंदिराला जरूर भेट द्या.
(फोटो सौजन्य अरविंद शहाणे, परभणी)
-श्रीकांत उमरीकर, औरंगाबाद
या शिल्पाला शुभदामिनी असे शास्त्रीय परिभाषेत म्हटले जाते.