अलिबाग | Alibaug
रायगड जिल्ह्यात असणारे अलिबाग समुद्रकिनारा पुणे तसेच मुंबईच्या पर्यटकांचा एकदिवसीय पर्यटनाचे आवडते ठिकाण आहे. पुणे मुंबईहून अलिबागला येण्यासाठी थेट बस उपलब्ध आहे. रस्त्याने अलिबाग हे मुंबईपासून अवघे ११० कि.मी. अंतरावर आहे. गेटवे ऑफ इंडियावरुन जलमार्गाने बोटीने दीड तासात अलिबागला पोहोचता येते तर रस्त्याने पनवेल-पेण-अलिबाग हे अंतर सुमारे तीन तास आहे. खाजगी वाहनाने येणाऱ्यांसाठी पुणे मुंबई महामार्गावरून खोपोली-पेण मार्गे अलिबागला येता येते तर रेल्वेने अलिबागला येण्यासाठी पेण हे सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन आहे. पेणपासून पुढे आपण खाजगी वाहनाने किंवा बसने अलिबागला जाऊ शकतो.
अलिबागच्या समुद्र किनाऱ्याबरोबर वर्सोली, आक्षी, नागाव, किहीम, आवास, सासवणे, रेवस, चौल रेवदंडा, काशिद आणि कोर्लई हे समुद्रकिनारे अलिबागच्या साधारणपणे २५ कि.मी. परिसरात आहेत. अलिबाग बसस्थानकातुन साधारण 1 कि.मी. पश्चिमेला तीन ते चार कि.मी.लांबीचा स्वच्छ आणि सुंदर तसेच प्रदूषणमुक्त वालुकामय अलिबागचा समुद्रकिनारा आहे. सुरूची उंच उंच झाडे, त्यांच्याशी हितगुज करणारी नारळाची झाडं, गालिचा अंथरल्यासारखी काळसर पण मऊशार वाळू समोर अथांग अरबी समुद्र आणि समुद्रात रखवालदारा सारखा ताठ मानेने उभा असलेला कुलाबा किल्ला असेच अलिबाग किनाऱ्याचे वर्णन करता येईल. अलिबाग किनाऱ्यापासून नैर्ऋत्येस सुमारे 1 कि.मी. अंतरावर समुद्रात कुलाबा किल्ला आहे. सिद्दीला शह देण्यासाठी आणि मुंबईकर इंग्रजांवर वचक बसवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला कुलाब्याचा किल्ला हे देखील या किनाऱ्यावरचे एक आकर्षण आहे.
ओहोटीच्या काळात मऊशार वाळुत अनवाणी पायाने किल्ल्यावर जाण्याची मजा काही वेगळीच आहे. भरतीच्या वेळेस मात्र किल्ल्यात जाण्याचा मार्ग बंद होतो. कुलाबा किल्ल्यापासून समुद्रात ३-४ कि.मी. नैर्ऋत्येकडे ६० फूट उंचीचा दीपस्तंभ आहे. सुर्यास्ताच्या वेळेस अलिबाग समुद्र किनाऱ्यावरची दृश्ये अवर्णनीय असतात. मावळताना समुद्रात बुडणारा तांबडा भडक सुर्याचा गोळा पाहताना माणूस देहभान विसरून जातो. सूर्य मावळल्या नंतरही त्याच्या नयन मनोहारी प्रभा, आकाशातील विविध आकाराचे ढग हा देखावा काही वेगळाच असतो. तिन्हीसांजेला पाठीवरचे जाळे सांभाळीत आपल्याच मस्तीत गाणे गात घरी निघालेल्या मच्छिमार बांधवांच्या कोळीगीताला दाद देण्याचा मोह आवरता येत नाही. कुलाबा किल्ल्यावरून किनाऱ्यावरील बंगले, मंदिरे, लांबवर पसरलेल्या नारळी पोफळीच्या गर्द राई आणि वनश्रीमध्ये लपलेले अलिबाग दृष्टीस पडते. अलिबाग समुद्रकिनारा नयनरम्य असला तरी किल्ल्यात जाणाऱ्या पर्यटकांनी ओहोटी आणि भरतीच्या वेळा पाहूनच किल्ल्यात जावे. भरतीच्या सुरू झाल्यानंतर किनाऱ्याला येण्याची घाई करू नये. ओहोटी सुरू होईपर्यंत किल्ल्यातच थांबावे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमाराचे प्रमुख सरखेल कान्होजी आंग्रे यांनी सतराव्या शतकात अलिबागचा विकास केला. एक पर्यटन स्थळ म्हणून अलिकडे अलिबागचा चांगलाच विकास झालाय. याशिवाय राहण्याची आणि खाण्या-पिण्याची आपल्या बजेटनुसार सोय हे देखील अलिबाग मध्ये शक्य आहे. थोडक्यात एका दिवसाच्या पर्यटनासाठी सुंदर ठिकाण तुम्ही बघत असाल तर अलिबागला समुद्रकिनाऱ्याला भेट द्यायलाच हवी !!!!!!!
@सुरेश निंबाळकर