अमळनेर…
अमळनेर हे शहर तापी नदीच्या खो-यात बोरी नदीच्या काठी वसलेले असून जळगाव जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण आहे. १९०६ पुर्वी हल्लीचे जळगाव व धुळे या दोन जिल्ह्याचे मिळून एकच खानदेश जिल्हा होता त्या खानदेशातील अमळनेर व पारोळा ही मध्यवर्ती ठिकाणे होती. साने गुरुजी यांची ही कर्मभूमी असुन इथल्या प्रताप हायस्कूलमध्ये साने गुरुजींनी अध्यापन केले आहे.
सुमारे दीडशे-पावणेदोनशे वर्षापुर्वी अमळनेर येथे सखाराम महाराज संत होऊन गेले. बोरी नदीच्या पात्रात त्यांची समाधी आहे. श्री संत सखाराम महाराजांच्या वास्तव्यामुळे अमळनेरला क्षेत्र म्हणून मिळालेली प्रसिद्धी आजही कायम असुन ते खानदेशचे पंढरपुर समजले जाते. याशिवाय अंमळनेरात मंगळ ग्रहाचे मंदिर आहे. कधीकाळी अंमळनेर हा नगरकोट होता पण शहर वाढल्याने किल्ल्याचे अस्तित्वच नष्ट झाले आहे. या शहराच्या एका बाजूस बोरी नदीपात्राचे असलेले नैसर्गिक संरक्षण अधिक भक्कम करण्यासाठी नदीच्या बाजूस तटबंदी व बुरुज बांधण्यात आले होते. शहराच्या उरलेल्या तीन बाजूला ३ दरवाजे व २० फुटी तटबंदी व बुरुज बांधून संरक्षित केले होते.
आजही अंमळनेर शहरात किल्ल्याचा २० फूट उंच बुलंद दरवाजा व त्याच्या बाजूचे दोन भक्कम बुरुज पहायला मिळतात. बोरी नदीच्या पात्रातील रस्त्याने संत सखाराम महाराज समाधी मंदीराकडे जाताना उजव्या बाजुस किल्ल्याची चाळीस फुट लांब तटबंदी व त्यातील दोन बुरुज दिसतात. या तटबंदीत नदीपात्राच्या दिशेने कोटाचा एक लहानसा दरवाजा असुन त्यांवर मशीदीसारखे छोटे मिनार आहेत. तटबंदीवर स्थानिकांनी घरे बांधली आहेत. नदीवरील वाडी संस्थानकडून किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वाराकडे जाताना वाटेत पाच-सहा जुने वाडे पहायला मिळतात. या सर्व वाड्यावर सुंदर लाकडी नक्षीकाम केलेले आहे. याशिवाय वाडी संस्थानाच्या धर्मशाळेच्या शेजारी एक प्राचीन मुर्ती झाडाखाली उघडयावर ठेवलेली आहे. अंमळनेर नगरकोट केव्हा व कुणी बांधला याचा इतिहास उपलब्ध नाही.
पेशवाईत या किल्याची व्यवस्था मालेगांव येथील राजेबहाद्दरांकडे होती. इ.स १८१८ मध्ये हा किल्ला पेशव्यांचे प्रतिनिधी माधवराव यांच्या ताब्यात होता. ब्रिटीशांनी खानदेशावर आपला ताबा बसविला त्यावेळी पेशव्यांच्या आज्ञेप्रमाणे माधवरावाने किल्ला ब्रिटीशांच्या ताब्यात देण्याचे ठरविले पण किल्ल्याचा जमादार अली व त्याच्या हाताखालची अरब फलटण यांनी ब्रिटीशांच्या ताब्यात किल्ला देण्याचे नाकारले. तेव्हा मालेगाव येथून ब्रिटीश कर्नल हस्कीन्सन याच्या अधिपत्याखाली ब्रिटीशांची सुमारे एक हजार भिल्ल बटालीयन तोफखाना व घोडदळ यांसह किल्ल्यावर चालून आली. त्यांनी नदीच्या पूर्वेकडून किल्ल्यांवर तोफांचा मारा केला. जमादार अली व त्याच्या सैन्याने प्रयत्नाची शर्थ केली पण एवढ्या मोठ्या फौजेशी सामना देणे त्यांना नव्हते.
ब्रिटीशांनी चारही बाजूंनी त्यांची कोंडी केली होती. दक्षिणेकडील बहादरपूर किल्ला ब्रिटीशांनी ताब्यात घेतल्यामुळे त्या किल्ल्यावरुन येणारा दारुगोळा व रसद बंद झाली त्यामुळे त्यांना किल्ला खाली करावा लागला. अली जमादार व त्याच्या सैन्याने आपली शस्त्रे किल्ल्याबाहेर आणून ठेवली व नदीच्या पात्रातून पळून जाण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. पण ते सर्वजण इंग्रजांचे कैदी बनले व अमळनेर किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला.
सुरेश निंबाळकर