खेळाचे पत्ते, खेळासारखीच मनोरंजक माहिती आणि इतिहास | Amazing Playing Cards
अगदी छोट्या मुलापासून आजोबांपर्यंत आणि गरीबांपासून गडगंज श्रीमंतांपर्यंत, आपली पाळेमुळे घट्ट रोवलेला खेळ म्हणजे पत्त्यांचा खेळ ! जागा, वेळ, वय किंवा आर्थिक स्तर असे कसलेही बंधन नसलेला हा एक विश्वव्यापी खेळ आहे. आजोबा आणि नातू यांच्या निरागस “ भिकार-सावकार “ खेळापासून ते थेट लाखो रुपयांची हारजीत करणाऱ्या जुगारापर्यंत हा खेळ फिरतो. सतत कोसळत असूनही पुन्हा पुन्हा बांधायचा प्रयत्न करायची सहजपणे शिकवण देणारा “ पत्त्यांचा बंगला “ आपण अनेकांनी अनेकदा लहानपणी बांधलेला असतोच ! मराठी साहित्याला या खेळाने अनेक नवीन शब्द दिले. जीवनात येणारी परिस्थिती आणि हातात येणारे पत्ते हे आपल्या इच्छेनुसार येत नसल्यामुळे, पत्त्यांची उपमा अध्यात्मिक पातळीवरही पोचते. …. आणि आजवर पाहिलेल्या पत्त्यांच्या जादू तर कोण विसरणार ? अनेकांनी पत्त्यांच्या आधाराने सांगितले जाणारे भविष्यही जाणून घेतले असेल.
अशा या पत्त्यांचा सर्वात जुना उल्लेख चीनमध्ये ९ व्या शतकामध्ये आढळतो. तेव्हा ३२ पत्तेच होते. नंतर हे पत्ते १३ व्या शतकात मंगोल आक्रमकांनी “ सिल्क रोड ” मार्गे पर्शियात नेले. पर्शियन भाषेत त्याला गंजीफेह म्हणत. मोगल आक्रमकांनी १६ व्या शतकात पत्ते भारतात आणले.
भारतात गंजिफा या पत्त्यांनी गोल आकार धारण केला. विष्णूचे १० अवतार, राशी, नवग्रह यांच्या आधारानी पत्त्यांची संख्याही १२० वर पोचली. तर मुस्लीम राजवटीतील गंजीफांना चंगकंचन म्हणत असत. हा शब्द चंग आणि कंचन या पर्शियन आणि संस्कृत शब्दांमधून बनला असून या मध्ये ९६ पत्ते असत. याचा उल्लेख “बाबरनामा ” ग्रंथात आहे. ” ऐने अकबरी ” या ग्रंथात हा हिंदू खेळ असल्याचा उल्लेख आहे. त्यात हा खेळ १४४ पानांचा आणि १२ जणांमध्ये विभागल्याचा उल्लेख आहे. तो अधिक क्लिष्ट असल्याने लुप्त झाला असावा. चौकोनी, आयताकृती, षटकोनी आकाराचेही गंजिफा होते आणि ते हस्तिदंतापासूनही तयार केले जात असत.
महाराष्ट्रात सावंतवाडीच्या राजांनी, आपल्या कारागिरांची कला टिकविण्यासाठी त्यांना लाकडी खेळण्यांबरोबरच खास प्रकारच्या कागदाचे गंजिफा बनविण्यास उत्तेजन दिले. येथे आजही गंजिफा बनविले जातात. येथे प्रत्येक पत्ता हाताने रंगविला जातो. यातील अतिशय बारकाव्याने रंगविलेली चित्रे विदेशात खूपच लोकप्रिय आहेत. या संचांचे खोकेही अतिशय आकर्षक चित्रांनी आणि रंगांमध्ये रंगविलेला असतात. त्यांची चेहेरेपट्टी आणि वस्त्रांवरील चित्रे अस्सल मराठी धाटणीची असतात.
आत्ताच्या स्वरूपातील पत्ते साधारणत: १५ व्या शतकात अवतरले. तेव्हा सर्वात कमी मूल्याचा पत्ता नेव्ह ( KNAVE ) म्हणजे “राजपुत्र” असा होता. आजही पत्त्यांच्या अनेक खेळांमध्ये राजा सर्वात मोठा की एक्का मोठा, असा प्रश्न असतोच. पत्त्यांमध्ये जोकर आणायची मूळ कल्पना अमेरिकन लोकांची पण जोकरांचा धुमाकूळ मात्र हल्ली सगळ्या क्षेत्रातच दिसतो.
माझ्या पत्त्यांच्या संग्रहात १ इंचापासून ते दीड फूट आकाराचे, गोल- चौकोनी- पारदर्शक- Z आकाराचे – ५२ जातींच्या वेगवेगळ्या मांजरांच्या चित्रांचे, – अत्यंत विचित्र आकाराचे, जादूसाठी वापरले जाणारे, विविध सणांची माहिती देणारे, भविष्य कथन करणारे, भोपळ्याच्या बी सारखे लंबगोल आकाराचे – अशा विविध प्रकारचे दुर्मिळ पत्ते आणि गंजिफा आहेत. संपूर्ण सुवर्ण रंगात तसेच चंदेरी रंगात छापलेले सोन्याचांदीचे पत्ते हे खासच आहेत. भारतीय चित्रपटांच्या इतिहासात, चित्रपटाच्या प्रचारासाठी पहिल्यांदाच वापरले गेलेले, १९६० चे ” मुघले आझम ” चे पत्ते आणि अंधांसाठीचे ब्रेलमधील पत्तेदेखील माझ्याकडे आहेत. या प्रत्येकाचा ५२+२ ( जोकर ) असा पूर्ण संच माझ्याकडे आहे. सावंतवाडीमधील हाताने रंगविलेल्या पत्त्यांच्या संचामधील राणीने चक्क मराठी पद्धतीने डोईवरून पदर घेतलेला आहे तर गुलामाने इंग्रजी सोल्जर ऐवजी मावळ्याचा पोशाख घातला आहे.
हिंदीतील “मुघल ए आझम”या चित्रपटाने, हिंदी चित्रपट सृष्टीत अनेक नवे विक्रम स्थापित केले. या चित्रपटाच्या जाहिरातीसाठी किंवा एक आठवण म्हणून हिंदी चित्रपट सृष्टीत प्रथमच, उच्चभ्रू प्रतिष्ठितांना पत्त्यांचे २ कॅट्स, पत्र्याच्या एका खास डब्यातून देण्यात आले. या पत्त्यांमध्ये, एका कॅटमधील प्रत्येक पत्त्यामागे दिलीपकुमारचे व दुसऱ्यामागे मधुबालाचे सुंदर चित्र छापले आहे. चार एक्क्यांवर दोघांची चित्रपटातील प्रणयप्रसंगातील चित्रे छापली आहेत तर पत्र्याच्या डब्यावरही या दोघांचे एक चित्र आहे. आणखी एक खास वैशिष्ठय म्हणजे या पत्त्यांमधील सर्व राजा आणि राणींच्या चेहेऱ्याच्या जागी अकबर ( पृथ्वीराज कपूर ) आणि जोधाबाई ( दुर्गाबाई खोटे ) यांचे चेहेरे छापले आहेत. कॅटमधील दोन जोकरवर मुघल ए आझम असे छापले आहे.
इंटर नॅशनल कॅट असोसिएशनच्या मते घरगुती मांजरांच्या ५४ प्रजाती आहेत. या प्रत्येक प्रजातीच्या गोंडस मांजराचे एक चित्र असलेला एक पत्ता असे ५४ प्रजातींच्या ५४ वेगवेगळ्या चित्रांच्या पत्त्यांचा एक सुंदर कॅट माझ्या संग्रहात आहे. ५२ पत्ते आणि २ जोकर असे हे ५४ पत्ते आहेत. आपल्याला काळे, पांढरे, लाल, राखाडी, सोनेरी एवढ्याच प्रकारची मांजरे माहिती आहेत. पण एवढी विविध मांजरे पाहतांना खूप मजा वाटते. यातील जोकरांवरील मांजरे इतकी छान आहेत की त्यांना ‘जोकर’ म्हणणे शोभत नाही. नेहेमी आपल्याला दिसणाऱ्या दोन सोनेरी मांजरांची प्रजाती युरोपियन शॉर्ट हेअर आणि ईजिप्शियन माऊ अशी आहेत. म्हणजे दिसते आमच्याकडे, नाव माऊ ..पण ईजिप्शियन माऊ ! अतिशय वेगळ्या आकाराचे हे पत्ते ठेवण्याचा प्लॅस्टिकचा खोका मांजराच्या आकाराचा आहे. पत्त्यांच्या या कॅटचे इंग्रजी नाव “म्यांव प्लेईंग कार्ड्स” असे आहे.
पूर्वी विविध प्रकारच्या उत्पादनांच्या जाहिरातीसाठी पत्त्यांचे कॅट छापून वाटले जात असत. चहा, ब्लेड्स, दारूचे विविध प्रकार, सिगारेट्स अशा अनेक उत्पादनांपासून कुटुंब नियोजनाच्या प्रचारासाठी तसेच गर्भनिरोधक गोळ्यांच्या जाहिरातीसाठी छापलेले कॅटस वाटले जात असत. विदेशातील विविध विमान कंपन्या आणि अगदी एअर इंडियासुद्धा प्रवासामाध्ये फार छान चित्रांचे पत्ते आपल्या प्रवाशांना देत असत. ताजमहाल हॉटेलने आपल्या मान्यवर ग्राहकांना, हॉटेलच्या छान पेंटींग्जचा दिलेला कॅटही देखणा आहे. असे सर्व कॅटसही माझ्याकडे आहेत.
माझ्याकडील काही पत्त्यांची छायाचित्रे सोबत देत आहे. थोडीतरी कल्पना येईल.
( हा लेख शेअर केल्यास कृपया माझ्या नावासह शेअर करावा ).
माहिती साभार – Makarand Karandikar | [email protected]