महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 87,74,473

गंमतीदार पत्ते, गंजिफा खेळ, नियम, इतिहास | Amazing Playing Cards

By Discover Maharashtra Views: 3977 7 Min Read

गंमतीदार पत्ते, गंजिफा खेळ, नियम, इतिहास | Amazing Playing Cards

टॅरो कार्ड्स हा पत्त्यांचाच प्रकार आहे पण त्याचे स्वरूप आणि उद्देश वेगळा आहे. नेहेमीच्या पत्त्यांच्या साहाय्याने देखील ज्योतिष सांगितले जाते. हे ज्योतिष आणि असंख्य जादू मला माहिती आहेत. पण त्यांची उदाहरणे म्हणून मी फक्त कांही संचच माझ्या संग्रहात ठेवले आहेत. पोर्नो प्रकारातील असंख्य संच जगभरात अनेक संग्राहकांकडे असतात पण माझा उद्देशच वेगळ्या आणि कौटुंबिक छंदाचा असल्याने मी तसा एकही संच ठेवलेला नाही.

माझ्याकडे SKAT या एका वेगळ्या जर्मन खेळाच्या पत्त्यांचे संच आहेत. हा ३२ पत्त्यांचा खेळ जर्मनीत खूप प्रसिद्ध आहे.जर्मनीतील अल्टेनबर्ग येथे १९२७ पासून या खेळाचे विशेष नियामक मंडळ कार्यरत आहे. दरवर्षी देशपातळीवर ” जर्मन चॅंपियन स्पर्धा ” घेतली जाते. आणखी एका संचामधील प्रत्येक पत्ता 3 D किंवा होलोग्राम पद्धतीने छापलेला असल्याने, पटकन दिसतच नाही. पण निरखून पाहिल्यावर उजेडात त्यातील सुंदर छपाई कळते. पारदर्शक पत्ते म्हणून जो संच आहे त्यात एका पारदर्शक प्लॅस्टिक तुकड्यावर एका बाजूने, निळ्या रंगाची ३ वर्तुळे दिसतात पण तुकडा उलटल्यावर तो पत्ता असल्याचे लक्षात येते.बियर, सिगारेट्स,विमान कंपन्या, कॅसिनो क्लब यांचे पत्ते उत्तम प्रतीचे आहेत.
पत्त्यांचा कॅट फुकट मिळतो म्हणून, लहानपणी आईवडिलांकडे हट्ट धरून JOY आईस्क्रीम अनेकांनी Enjoy केले असेल. आपल्याला जॉय आईस्क्रीमचा संच त्याची आठवण नक्कीच करून देईल. त्याचबरोबर नेत्रहिनांसाठी खास तयार केलेला संचही निरखून पाहावा असा आहे. सर्वसामान्य पत्त्यांसारखाच हा संच आहे पण याच्या प्रत्येक पत्त्याच्या उजव्या कोपऱ्यात वरती आणि डाव्या कोपऱ्यात खाली, ब्रेल लिपीत पत्त्यांची ओळख कोरलेली आहे . उजव्या हातात पत्ते धरणाऱ्या खेळाडूला,नुसत्या बोटाने चाचपून पत्ता कळतो. ” Lexicon Cards ” हा खेळ शब्दांची स्पेलिंग्ज आणि अंकांशी खेळायला शिकवतो.

पुण्याच्या एका संस्थेने, मुलांना धार्मिक सणांचे महत्व कळण्यासाठी प्रत्येक पत्त्यावर एकेक सणाची माहिती असलेला वेगळाच संच प्रसिद्ध केला आहे.या मध्ये बदाम, चौकट, इस्पिक, किलवर ऐवजी कमळ , स्वस्तिक,त्रिशूल आणि बिल्वपत्र आहे. पर्यटनाला चालना देण्यासाठी, विविध देशांनी आपापल्या देशातील ५४ विविध सौन्दर्यस्थळे निवडून त्या प्रत्येकाचा एकेक पत्ता अशा ५२ पत्ते आणि २ जोकरच्या पत्त्यांचे संच वितरित केले आहेत. एका अगदी जुन्या संचामध्ये जोकरवर चार्ली चॅप्लिन यांचे चित्र आहे. चॅप्लिन यांच्या विनोदाला कारुण्याची एक झालर असायची. ते लक्षात घेता चार्ली चॅप्लिन यांचाच जोकर म्हणजे एक ” करूण विनोद ” वाटतो.

गेल्या भागामध्ये मी गंजिफा या प्राचीन खेळाबद्दल लिहिले होते. हे संच आजही सावंतवाडीच्या राजवाड्यात खास बनवून विकले जातात. तेथे बनविलेला पत्त्यांचा एक खास संच माझ्याकडे आहे. यातील राजा, राणी आणि गुलाम हे सर्व मराठी वेशभूषेत आहेत. राजाच्या कमरेला तलवार आणि हातात फूल आहे.कपाळाला गंध आहे. राणीसाहेबांच्या डोईवर पदर आणि नाकात नथ आहे. हातात तलवार घेऊन सज्ज असलेल्या गुलामाच्या पाठीवर ढाल आणि कपाळी गंध आहे. या संचाचा लाकडी डबा उत्तम रंगसंगतीतील छान चित्रांनी रंगविलेला आहे. माझ्याकडील ओरिसा येथिल गंजिफा संच हा पातळ कागदापासून बनलेला आहे. अन्य दोन गंजिफा संच हे सवंतवाडीचे असून त्यांचे डबेही खूप आकर्षक आहेत.
गंजिफा आजही उपलब्ध असले तरी ते खेळायचे कसे ? त्याचे नियम काय ? महाराष्ट्र, ओरिसा, दिल्ली, बंगाल,दक्षिण भारतात हा खेळ खेळला जात असे. प्रत्येक ठिकाणी वापरले जाणारे संच, पत्त्यांची संख्या, नियमांमध्ये असलेला फरक, खेळण्याची पद्धत, खेळाचा प्राचीनपणा, स्थानिक वैशिष्ठ्ये यामुळे नियमांमध्ये एकवाक्यता नाही. श्रीतत्वनिधी आणि कौतुकनिधी या गंथांमध्ये या खेळाची माहिती आहे असे वाचले होते पण हे ग्रंथ मिळणे आता दुरापास्त झाले आहे. कोल्हापूरच्या राजवाड्यातील वस्तुसंग्रहालयात या संबंधीच्या ३ पुस्तिका मी पहिल्या होत्या पण त्या अभ्यासासाठी उललब्ध होऊ शकल्या नाहीत. या खेळाचे कांही नियम देत आहे पण त्या आधारे हा खेळ खेळणे क्लिष्ट वाटते.

विष्णूच्या १० अवतारांच्या १२० पत्त्यांच्या संचामध्ये प्रत्येक अवताराचे चित्र असलेला १ / १ पत्ता म्हणजे राजा, दुसरा साधारणतः संबंधित चित्र असलेला १ / १ पत्ता म्हणजे मीर / प्रधान ( वजीर ) असतो. नंतर एक्का ते दश्शी असे १० / १० पत्ते असे प्रत्येक अवताराचे १२ पत्ते आणि १० अवतारांचे एकूण १२० पत्ते असतात. मत्स्य, कच्छ, वराह, नरसिंह आणि वामन या पहिल्या ५ अवतारांमधील पत्त्यांची किंमत म्हणजे अवतार पत्ता सर्वात श्रेष्ठ नंतर वजीर, नंतर एक्का, दुर्री असे करीत करीत दश्शी सर्वात कमी किंमतीची असते.
परशुराम, राम, कृष्ण, बुद्ध आणि कलंकी या अवताराच्या पत्त्यांमध्ये अवताराचा पत्ता सर्वात श्रेष्ठ नंतर वजीर, नंतर दश्शी, नश्शी असे करीत करीत एक्का सर्वात कमी किंमतीचा असतो.

हे पत्ते पिसण्यासाठी ते एका धोतरासारख्या पातळ वस्त्रामध्ये पसरून हाताने गोल गोल फिरवून ( कपड्याला साबण लावतात तसे ) पिसले आणि मग वाटले जातात. हा खेळ ३ खेळाडू खेळतात त्यामुळे प्रत्येकाला ४० / ४० पाने येतात. हा खेळ जर दिवसा खेळला जात असेल तर ज्याच्याकडे रामाचा पत्ता आला असेल त्याने पहिली उतारी करायची आणि रात्री खेळला जात असेल तर ज्याच्याकडे कृष्णाचा पत्ता आला असेल त्याने पहिल्यांदा उतारी करायची असते. खेळ सुरु करणाऱ्याला ” सुरु करतो ” म्हणून सुरुक्या किंवा सुरक्या म्हणतात. रामाचा पत्ता खेळल्यावर त्याने आणखी एक रामाच्याच अवतारातील / हलका पत्ता खेळायचा आणि इतर दोन खेळाडूंनी २ / २ पत्ते खेळायचे. हे उतरलेले सर्व ६ पत्ते सुरक्याचा हात म्हणून त्याच्या मालकीचे होतात. ज्याच्याकडे जास्त पत्ते जमा होतात त्याला दुसऱ्यांचे पत्ते ओढण्याचा हक्क मिळतो. या खेळामध्ये पैसे लावणे किंवा जमीन, राज्य असे काही पणाला लावणे वगैरे होत नाही.

इथपर्यंत सर्व भाग हा खूप मनोरंजक आहे. या खेळासाठी जबरदस्त स्मरणशक्ती लागते, वेळ लागतो. खेळाचे याच्या पुढील नियम कमालीचे किचकट आणि गुंतागुंतीचे आहेत. मी जर ते सर्व इथे दिले तर — हा लेख चौपट मोठा होईल, ज्यांना गंजिफा खेळायचा नसेल त्यांना ते कंटाळवाणे होईल आणि लेखाचा रंजकपणा पूर्ण नाहीसा होईल म्हणून मी येथे सर्व नियम तपशीलवार देत नाही. ज्यांना त्यात खूप रस असेल त्यांनी मला आपला मोबाईल क्रमांक आणि तपशील इंग्रजी की मराठी भाषेत हवा हे कळवावे.
पूर्वी एखादे एकटे आजोबा पत्त्यांचा पेशन्स गेम एकटेच खेळात बसलेले दिसायचे . लहानपणी आजोबांबरोबर, सुट्टीत मित्रांबरोबर, गावी- कार्यक्रमाला जमल्यावर , मुंबईत गाडीमध्ये, क्लबमध्ये असा कुठेही आणि कितीही वेळ रंगणारा पत्त्यांचा खेळ आता कॉम्पुटर आणि मोबाईलवरही आपली लोकप्रियता टिकवून आहे.
तर रंजकता आणि आठवणींचा गोफ विणणारी अशी ही पत्त्यांच्या रंजक विश्वाची मनोरंजक सफर !





माहिती साभार – Makarand Karandikar | [email protected] 

Leave a Comment