मानमोडी लेणी गटातील अंबा अंबिका लेणी समुह जुन्नर
जुन्नर शहराच्या दक्षिणेला व खोरे वस्तीपासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या धामणखेल खंडोबा डोंगरात मोठा लेणीसमूह दिसतो तो म्हणजे “मानमोडी लेणी” समूह. हा समुह तीन भागात व्यापलेला असून पुर्वेकडील भागाला “भिमाशंकर_लेणी” समुहाने ओळखले जाते. मध्यंतरी असलेला लेणी समूह “अंबा_अंबिका_लेणी” समुहाने ओळखला जातो तर पश्चिमेला असलेल्या लेणी समुहास “#भुतलेणी” म्हणुन ओळखले जाते. या तीन गटांना मिळून #माणमोडी_लेणी म्हणुन संबोधण्यात येते. विशेष म्हणजे या सर्व लेण्यांची निर्मीती ही 2200 वर्षाची असून बौद्ध कालीन आहे. त्याच पैकी एक लेणी समुह म्हणजे अंबा_अंबिका लेणी होय. येथील लेण्यांपैकी एका लेणीत अंदाजे इ.स.च्या ६ ते ८ व्या शतकात जैनांनी आपल्या देवता कोरलेल्या दिसतात. त्यात श्री पार्श्वनाथ आणि आंब्याच्या झाडाखाली बसलेल्या देवी अंबिकाचे अंकन केलेले दिसते.
येथीलच एका लेणी समुहात पुढे एका चैत्यगृहाचे पाषाण ढेसूळ लागल्याने काम अर्धवट राहिलेले आहे. व जवळच शेजारच्या दोन छोट्या लेण्यांच्या बाहेर ब्राह्मी लिपी मधील सुबक अक्षरे असलेला शिलालेख आहे. भृगुकच्छ अर्थात भडोच इथल्या ‘बुद्धमित्र आणि बुद्धरक्षित (बुधमितस आणि बुधरखितस) नावाच्या दोन भावांनी ह्या लेणीसाठी दान दिलेले आहे. त्यांच्या वडिलांचे नाव लिहायचे राहिले म्हणून ते मधल्या ओळीत छोट्या अक्षरात लिहिलेले आहे !!!
या लेणीचा संदर्भ काही महाभारतातील अंबा- आंबिकाशी जोडतात म्हणून त्यांचे नाव जोडले गेले असावे. त्यामुळे या ठिकाणी हिंदू, बौद्ध व जैन धर्मीय बांधवांचे दर्शनासाठी ऐक्य पहावयास मिळते.
हा संपूर्ण लेणी समूह पाहण्यासाठी एक तास पुरेसा ठरतो. पाण्याची एक बाटली सोबत ठेवावी. मध्यम चढाई असल्याने दमछाक होत नाही. सध्या परदेशी पर्यटकांना या लेण्या आकर्षित करत असून त्या महत्वपूर्ण माणल्या जात आहेत. येथे विशेष काळजी घ्यावी ती येथील असलेल्या मधमाशांपासूनच. अनेक पर्यटकांवर त्यांनी हल्ला चढविला आहे. त्यामुळे आपण विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.
लेख लिहीताना काही चुका झाल्या असतील तर माझे स्वतःचे अपूरे ज्ञान म्हणून समजून घ्याल ही प्रार्थना. आपण माझ्या चुकांवर पांघरूण न घालता कमेंट्स मध्ये निश्चितच लिहा जेणेकरून सत्य वाचकां समोर राहील. धन्यवाद.