अंबाबाई | आमची ओळख आम्हाला द्या –
आत्तापर्यंत बर्याच मूर्ति शिल्पांचा आपण साकल्याने विचार करून त्यांची मांडणी केलेली आहे. ही मांडणी करीत असताना मूर्तीशास्त्रीय दृष्टिकोन व ग्रंथांचा आधार घेतला आहे. त्यानुसार आजवरची मांडणी केलेली आहे. कुणाला बरं वाटावं म्हणून मी मांडणी केलेली नाही. जे खरं आहे तेच मांडण्याचा प्रयत्न केला आहे. आज आपण करवीरनिवासिनी अंबाबाई ची माहिती पाहणार आहोत.
महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी एक संपूर्ण शक्तिपीठ म्हणजे कोल्हापूर होय. दक्षाच्या यज्ञात सती गेलेल्या आपल्या पत्नीचे शव घेऊन शिव त्रिभुवन हिंडू लागला. श्री विष्णूने आपल्या सुदर्शन चक्राने सतीच्या देहाच्या अवयवांचे छेदन केले . तिच्या देहाचे अवयव ज्या ज्या ठिकाणी पडले त्या त्या ठिकाणी शक्तीपीठ स्थापन झाले. अनेक ग्रंथात या शक्तिपीठांची च्या संख्येत विसंगती आहे.
कोल्हापूर या ठिकाणी सतीच्या अवयवाचा डोळे हा भाग पडला व त्या ठिकाणी शक्तिपीठ निर्माण झाले .अशी कथा पुराणात आहे. जर ही कथा ग्राह्य धरली तर हि सती असणारी विष्णुपत्नी लक्ष्मी कशी?? कोल्हापूरचे मंदिर स्थापत्याच्या दृष्टीने अलौकिकच म्हणावे लागेल. अतिशय रेखीव कलाकुसरयुक्त ह्या मंदिरात आणि मडोंरावर अद्भूत शिल्पकला पाहावयास मिळते.
गर्भगृहात विराजमान अंबाबाई ची प्रतिमा नेत्राचे पारणे फेडणारी आहे सप्तद्वारातून ही मूर्ती बाहेरून हि दिसते मुलतः काळ्या पाषाणाची ही प्रतिमा असून तिची उंची तीन फूट आहे. समपाद अवस्थेत उभी असणारी ही देवी चतुर्भुज आहे. देवीने आपल्या हातामध्ये अनुक्रमे प्रदक्षिणा क्रमाने डाव्या खालच्या हातात महाळुंग (मातुलिंग) डाव्या वरच्या हातात गदा उजव्या वरच्या हातात ढाल (खेटक)उजव्या खालच्या हातात पानपात्र (पिण्याचे भांडे )धारण केलेले आहे. पुढे केलेल्या हातावर आडवे महाळूंग धरले आहे. गदेचा दांडा वर आणि मारावयाचा अमलक खाली धरलेला आहे. ढालीचा दर्शनी भाग पाठीमागे अर्थात अदृश्य आहे व हातांनी धरावयाचा भाग दृश्यमान आहे.
पानपात्रचा हात पुढे करुन त्यात पानपात्र धारण केलेले आहे. मूर्तीला किरीट मुकुट असून, त्यावर लिंग व योनी यांच्या आकृती आहेत. देवीच्या मुकुटावर नाग होता ?तो आता नाही? देवीच्या कानात चक्राकार कुंडले असून, ती खांद्यावर स्थिरावलेली आहेत. कंठहार, ग्रीवा, स्तनहार, केयूर, कटकवलय, करवलंय, पायात पाद वलय व पादजालक इत्यादी आभूषणांनी देवी अलंकृत आहे. कटी सूत्र ,कटिवंध,मुक्तद्दाम, उरूद्दाम, दोन्ही पायातील वस्त्रांचा सोगा उठावदारपणा कोरलेला आहे. मूर्तीच्या पाया जवळ देवीचे वाहन सिंह कोरलेला आहे. देवीच्या मुखकमलावर विलक्षण तेज व स्मितहास्य आहे. हे शिल्प कोरताना शिल्पिच्या मनातील मातृभक्तिभाव शिल्पात पूर्ण उतरलेला दिसून येतो.
संदर्भ –
१.मंदिर कसे पहावे — डाँ.गो.बा.देगलूरकर
२.करवीरनिवासिनी श्रीमहालक्ष्मी, रा.चिं.ढेरे
३ .महाराष्ट्राची चार दैवते, ग.ह.खरे
४.कैवल्य दिवाळी अंक २०११
५.करवीरनिवासिनी श्रीमहालक्ष्मी अंबाबाई, श्रीकांत गोवंडे
काहि शंका –
१) सतीचे अवयवावर शक्तिपीठ निर्माण झाले तर हि लक्ष्मी कशी?
२) शिवलिंग लक्ष्मीच्या डोक्यावर अंकीत केलेले असते का?
३) दुर्गेचे असणारे वाहन लक्ष्मीला कधी दाखविले आहे का?
४) महाळुंग हे फळ पार्वतीचे हातात असते लक्ष्मीच्या हातात असते का?
५) गदा,खेटक,हि आयुधे लक्ष्मीचे आहेत का?
६) महालक्ष्मी व विष्णुपत्नी लक्ष्मी या दोघी वेगळ्या आहेत मग हिला विष्णुपत्नी कसे संबोधावे?
७) देवी समोर सभामंडपात गणेश कसा?
८) शिवलिंग धारणी पार्वतीस म्हणतात तसे लक्ष्मीस म्हणतात का?
९) देवीच्या मूर्तीवर डोक्यावर शिवलिंग आहे पण गर्भगृहाच्या वर असणार्या छोट्या खोलीत शिवलिंग कसे?
१०) बालीजीच्या देवीला येणारा शालू १९८२ पासून का सुरू झाला?
११) देवीच्या मुकुटाच्यावर असणारा फणाधारी नाग का काढला गेला?
टिपः या लेखाद्बारे कुणाच्या भावना दुखवायच्या नाहित अथवा कुणाची मते खोडायची नाहित.जे खर आहे ते मांडलं आहे.
डाॅ.धम्मपाल माशाळकर, सोलापूर (९७३०३९३७५३)