सरलष्कर दरेकरांच्या पराक्रमाची साक्ष देणारे आंबळे गाव –
सरलष्कर दरेकरांच्या पराक्रमाची साक्ष देणारे आंबळे हे गाव आहे. सरदार दरेकर घराणे हे मोरे या ९६ कुळी मराठा कुळाचे उप कुळ आहे. मुळ सातारा जिल्हा मधील जावळी परिसरातील दारे गावचे हे दरेकर , दऱ्या खोऱ्यातील वीर दरेकर असे म्हणतात.
गावात प्रवेश करण्याच्या अगोदरच समजून येते की आंबळे गाव संपूर्ण तटबंदीने सुरक्षित होते कारण आपल्याला गावात प्रवेश करावा लागतो तो एका दोन बुरुज अवषेश असलेल्या प्रवेशद्वारातुन . प्रवेश करताच डाव्या बाजूला एका चिरेबंदी वाड्याचे प्रवेशद्वार दिसते. वाडा काळाच्या ओघात ढासळला असून दरवाज्याच्या अवषेशा वरुन वाड्याची भव्यता लक्षात येते. थोडेसे पुढे गेल्यावर सरलष्कर दरेकर गढीच्या वाड्याची भव्य तटबंदी आणि दोन भव्य बुरुज पहायला मिळतात. येथे बरेच वाडे पहायला मिळतात त्यात चार वाडे दरेकरांचे आहेत असे समजले. त्या पैकी एका वाड्याचे जसेच्या तसे नुतनीकरण करण्यात आले असून अजूनही नुतनीकरण कार्य चालू आहे. त्याच्या समोरच भव्य नगारखाना असलेला तटबंदी युक्त भव्य वाडा आहे. हा वाडा दोन मजली असून खूपच सुंदर आहे. वाड्याच्या आतील बाजूस दरेकर कुटुंब राहतात.
या वाड्यात कलात्मक आणि सुंदर लाकडी काम पहायला मिळते. काळाच्या ओघात काही ठिकाणी वाड्याची पडझड झालेली आहे तर कांहीं ठिकाणी नवीन बांधकाम केलेले आहे. या वाड्याच्या बाजूलाच तटबंदीच्या अवषेशात भव्य प्रवेशद्वार असल्याच्या खुणा दिसतात. या तटबंदीला लागूनच अनखी एक तटबंदी असून आत मंदिरे आहेत. या मंदिराच्या परिसरास देऊळवाडा म्हणतात. या देउळ वाड्यात ५ मंदिरे असून यातील श्रीरामाचे मंदिर खूपच सुंदर आणि अप्रतिम आहे. या देउळ वाड्यात तुळजाभवानी, विष्णू , गणेश व हनुमान मंदिर आहे. देऊळ वाड्याला लागुनच एक चौकोनी आकाराची पुरातन बारव आहे. पुर्वीच्या काळी सरलष्कर वाड्यातुन महिलांना देऊळ वाड्यात जाण्यासाठी सुरक्षेच्या कारणास्तव भुयारी मार्ग होता असे सांगितले जाते.
आंबळे गावात खूपच पुरातन आणि सुंदर असे भैरवनाथाचे भव्य मंदिर आहे. मंदिराच्या महाद्वारावर भव्य नगारखाना असून आजही नगारा वाजवला जातो. भैरवनाथ मंदिराच्या समोरील भव्य अशा गढीच्या वाड्यात सरलष्कर दरेकरांचे वंशज श्री बंडोबा दरेकर राहतात.