आंबोली राजवाडा | समर पॕलेस, सावंतवाडी, सिंधूदुर्ग –
राज्यात सर्वाधिक पाऊस पडणारे हे ठिकाण सातासमुद्रापार असलेल्या इंग्लंडमधून आलेल्या ब्रिटीशांनाही भुरळ पाडणारे ठरले होते. त्यांनी याला हिलस्टेशनचा दर्जा दिला. सावंतवाडी संस्थानचा देखणा राजवाडा या आंबोलीत आजही आहे. संस्थानची ही हिवाळ्यातली राजधानी.(आंबोली राजवाडा)
आंबोलीचा घाट हा मध्यकाळापासून दळणवळणाचा एक प्रमुख मार्ग म्हणून ओळखला जाई. सध्याचा पक्क घाट १८६८ मध्ये इंग्रजांनी बांधला. कोकण त्याकाळी ब्रिटीशांच्याच ताब्यात असल्याने व समुद्रमार्गे येणाऱ्या शत्रूचा धोका असल्याने तोफांची वाहतूक मुख्यतः याच मार्गाने करण्यात येत होती. इतर संस्थानिकांसारखेच खेमसावंत-भोसले सुध्दा ब्रिटीशांचेच मांडलीक झाले होते. १८२६ च्या दरम्याने या मार्गावरुन गोवे ते दक्षीणेचा भाग अशी वाहतूक होवू लागली नंतर मात्र वेंगुर्ला बंदर ते बेळगाव अशा सध्या अस्तित्वात असलेला मुख्य मार्ग तयार झाला.
आंबोलीतील या प्रसन्न ठिकाणी ब्रिटिश पावले पडली. याच वेळी वाडी संस्थानाचा एक हंगामी निवासासाठी राजवाडा देखील बांधला गेला. राजवाड्यासमोर थांबून नजर खाली थेट वाडी व दुरवर शक्य झाल्यास समुद्रही पाहता येतो. राजवाड्याचे स्थान पश्चिमाभिमुख असल्याने सुर्यास्ताची किरणं या राजवाड्याला सोन्याच्या झळाळीत नाहून घालताना एक विलक्षण अनुभवायला नक्कीच मिळतो. वाडीकरांनी राजवाडा हंगामी वापरासाठी बांधला पण कालांतराने या वास्तूला प्रचंड दुर्लक्ष झाले. आज या राजवाड्याची दयनीय अवस्था मन खिन्न करते. ऐतिहासिक ठिकाणांच्या जनजागृतीमुळे आता वाडीकरांना याकडे लक्ष पुरवण्यास सुरवात केली आहे. काही दिवसांत इथला चेहरामोहरा बदलण्यास सुरवात होईल.
आंबोली राजवाडा, समर पॕलेस, सिंधूदुर्ग.
-विकास चौधरी