महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 89,10,959

अंबुजी इंगळे | उत्तर मराठेशाहीतील एक विस्मृतीत गेलेला सेनापती

Views: 1685
8 Min Read

अंबुजी इंगळे | उत्तर मराठेशाहीतील एक विस्मृतीत गेलेला सेनापती –

मित्रानो, महादजी शिंदे यांचे प्रभाव क्षेत्र उत्तेरेकडे अगदी लाहोरपर्यंत पसरले होते. आणि या क्षेत्रावर नियंत्रण ठेवण्यासाठी कार्यक्षम व समर्थ अशा सहकाऱ्यांची त्यांना आवश्यकता होती हे ओघाने आलेच. जीवबादादा बक्षी, राणेखान भाई, फ्रेंच सेनापती डी बॉयन, लखबादादा लाड,रायाजी पाटील, अंबुजी इंगळे अशा एकाहून एक हुशार व हुरहुन्नरी नररत्ने त्यांच्यापाशी होती. यापैकी प्रत्येक जण आपल्यावर सोपवलेले कार्य मन लावून व चलाखीने करणारा होता. अशा रत्नांच्या पैकी एक म्हणजे अंबुजी इंगळे होय. अशा एक त्यामानाने अज्ञात असणाऱ्या वीर पुरुषाची माहिती या लेखातून आपण घेणार आहोत.अंबुजी इंगळे यांचे नाव इतिहासात बऱ्याच ठिकाणी अंबाजी इंगळे असे आलेले आढळते.

इंगळे कुटुंबाची ऐतिहासिक पार्श्वभूमी:इतिहासातील अप्रसिद्ध असे हे इंगळे कुटुंब मुळात सोळंकी ठाकूर होते आणि बुंदी,कोटा(राजस्थान)मधून दक्षिणेत आलेले होते. राजा अंबाजी यांचे वंशज हे भाऊजीराव शिंगणापूर (सातारा जिल्ह्यातील फलटणजवळ असलेल्या) देशमुखांच्या हाताखाली चाकरीला होते. दिल्लीचा सम्राट शहा आलम याने दिल्ली दरबारामध्ये राजा अंबाजी बहाद्दूर इंगळे अशी सनद त्यांना दिलेली होती. सनद देताना अनेक तालुक्यांचा कारभार सम्राटाने त्यांना जहागिरीच्या स्वरूपात बहाल केला होता. अंबुजी इंगळे याचे वडील त्रिंबकजी हे सुद्धा एक लढवैय्या शिपाई होते आणि पेशव्यांचे सामर्थ्यवान सरदार मल्हारराव होळकरांच्या सोबत उत्तरेत आलेले होते.त्याच्या आधी काही दिवस ते पेशवांच्याकडे नोकरीला होते.त्यांच्या इमानदारीमुळे त्यांना महदूंगा गावाची सनद पेशवे सरकार कडून मिळाली होती. त्रिंबकजी इंगळे ही महाराष्ट्रातील कदाचित एकच अशी असामी असेल की जे आपल्या पांचही पुत्रासोबत पानिपतच्या भीषण लढाईत लढले असतील. या लढाईत मराठे जरी पराजित झाले तरी त्रिंबकजी आणि अंबुजी यांनी या लढाईत मोठे शौर्य दाखवले होते. त्रिंबकजी यांचा मृत्यू राजस्थानातील सीताबर्डी येथे झाला. त्यांची छत्री आज ही मौजे सिकरोडबावडी येथे आहे.

अंबुजी इंगळे यांचा उदय: त्रिंबकजींच्या मृत्यूनंतर अंबुजी इंगळे यांनी आपले कर्तृत्व दाखवून महादजी शिंदे यांचे ते एक विश्वासू अधिकारी बनले. अंबुजी इंगळे यांचा जन्म सन१७३०साली झाला, म्हणजे ते महादजींचे समवयस्क होते असे दिसते. दुर्दैवाने अंबूजींच्या सुरुवातीच्या पन्नास वर्षाबद्दल फारशी काही माहिती उपलब्ध होत नाही. इंग्रज इतिहासकार टी डी बौटन यांनी लिहिलेल्या ‘मराठ्यांच्या लष्करातून पाठवलेली पत्रे’ यात अंबुजी इंगळे यांचे वर्णन असे केलेले आहे. अंबुजी हे उंच व वयाच्या मानाने (त्या सुमारास त्यांचे वय ८०च्या पुढे होते) भारदस्त दिसणारे व्यक्तिमत्व होते, ते वर्णाने काळेसावळे असून त्यांच्या चेहऱ्यावर विनोदी झाक दिसत असे, त्यांचा पेहराव अतिशय साधा असे, जणू काही एखाद्या कंजूष माणसाचा असावा तसा. बौटोन यांनी केलेल्या अंबूजींच्या कौतुकपर वर्णनात ते पुढे म्हणतात की अंबुजी शामियान्यात आल्यावर त्यांनी आपली आपली कृतज्ञता तेथे उपस्थित असलेल्या इंग्रज डॉक्टरशी व्यक्त केली कारण दोन वर्षांपूर्वी शिंद्यांच्या कैदेत असताना त्यांना झालेली जखम यांच्या औषधोपचारामुळे बरी झाली होती. तेथे सर्व मानकरी एकत्रित बसलेले असताना अंबुजी उठले आणि डॉक्टरांच्या कडे जाऊन त्यांना मायेने आलिंगन दिले. त्यांनी सुर्जेराव यांची व डॉक्टरांची ओळख करून दिली आणि त्यांच्या वैद्यकीय उपचाराचे कौतुक केले.

ग्वाल्हेरच्या किल्याची लढाई व मराठ्यांची शरणागती: गोहदचा राणा व इंग्रज सरदार पोफेम हे १७८०च्या फेब्रुवारीच्या सुमारास ग्वाल्हेरवर चालून गेले. गोहदचा राणा हा इंग्रजांना फितूर झाला होता. ग्वाल्हेरचा किल्ला हा एक मध्य भारतातील जबरदस्त मजबूत किल्ला होता व शिंदे सरकारांचे ते हृदय होते. त्या किल्ल्यावर महादजींचा विश्वासू रघुनाथ रामचंद्र हा किल्लेदार होता. त्याच्या दिमतीस अंबुजी इंगळे फौजेसह होता. त्या दोघांनी शौर्याने किल्ला लढविला. परंतु गोहदच्या राण्याकडील माणसाने किल्ल्यावर जाण्याची चोरवाट इंग्रजांना दाखवली. त्यामुळे किल्ला हातातून गेला. किल्लेदार ठार झाला तर त्याच्या बायकोने मुलास मारून आत्महत्या केली. ४ ऑगस्ट १७८० ला अंबुजीनी किल्ला इंग्रजांच्या हवाली केला. तो उज्जैन येथे महादजींना भेटायला गेला, तेव्हा महादजींनी किल्ला सोडून दिला म्हणून अंबुजीची चांगलीच कानउघडणी केली होती.

अंबुजी इंगळे यांचा विविध लढायातील सहभाग: १७८० -८१ मध्ये मराठे व इंग्रजांचे युद्ध निकरावर आले होते.  या युद्धात अंबुजी इंगळे हा महादजींच्या बाजूने लढत होता असे आढळते. त्यांच्या सोबत शिंद्यानी बळवंतराव धोंडदेव याना पाठविले होते. इंग्रज ग्वाल्हेर जिंकून शिपरीस पोचले तेव्हा त्यांना तोंड द्यायला महादजींनी अंबुजी इंगळे यास रवाना केले होते.महेश्वर मधून अहिल्याबाईंनी अंबुजीचे वडील त्र्यंबकजी याना ससैन्य पाठवले होते. याचा अर्थ इंग्रजांविरुद्ध पितापुत्र वेगवेगळ्या ठिकाणी एकाचवेळी लढत होते.

७मार्च१७८१च्या सुमारास महादजीने इंग्रज सेनापती कॉमक याला धडा शिकवून माघार घ्यायला लावली. १ जुलै १७८१ मध्ये शिप्राजवळ महादजी व इंग्रज सरदार कर्नल म्यूर यांची लढाई निकाली होऊन म्यूरचा पूर्ण पराभव झाला. या लढाईत अंबुजी हजर होता. या संघर्षात इंग्रजांची रसद आणणारे बैल व इतर सामान रात्री छापा घालून लुटण्यात त्यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. पुढे १नोव्हेंबर१७८४ रोजी आग्ऱ्यानजीक महंमद बेग हमदानी याने झैनुलबिद्दीन कडून आफराबासिया खान याचा खून घडवून आणला. या राजकारणात व हाणामारीत अंबुजी इंगळे महादजीकडून त्यानंतरच्या बंदोबस्ताच्या कामात कृतिशील होता.

अंबूजींच्या खऱ्या कारकिर्दीची सुरुवात महादजींनी त्यांना दिल्लीच्या उत्तरेस २८महालांची फौजदारी दिली तेथपासून सुरु होते. हे सर्व महाल दिल्लीच्या उत्तरेस सोनपतजवळ होते. अंबुजी इंगळे यांची त्यावेळी दिलेली मुख्य जबाबदारी म्हणजे सम्राट पातशहा दिल्लीपासून दूर आग्रा येथे असताना त्याच्या अनुपस्थितीत शिखांच्या आक्रमणापासून दिल्लीचे रक्षण करणे हे होते.नंतर अंबुजीनी महादजी यांच्या सांगण्यावरून दिल्लीचा कारभार तेव्हाचा दिल्लीचा दिवाण अफराबसीयाखान यांच्याकडून ताब्यात घेतला. तसेच लहान लहान सरंजामांचे बंड त्यांनी मोडून काढले. हे छोटे सरंजाम मराठ्यांच्या विरुद्ध होते आणि ब्रिटिशांच्या मदतीने उठाव करण्याच्या तयारीत होते. त्यापैकी राघोगडचा राजा(मध्य प्रदेशातील गुणा) बळवंतसिंग व त्याचा मुलगा जयसिंग हे प्रमुख होते. या दोघांनी महादजी विरुद्ध उठाव केला आणि त्यावेळेस महादजींनी आपला इमानदार सरदार अंबुजी यांस त्यांचा नायनाट करण्यास पाठवले होते. अम्बुजी यांनी यशस्वीपणे त्या दोन बंडखोरांचा पराभव करून त्यांना कैद केले व त्यांची मालमत्ता जप्त केली.  अंबुजीनी बळवंतसिंग यांस ग्वाल्हेरच्या किल्ल्यात बंदिवासात ठेवले.

फेब्रुवारी १७८७च्या सुमारास अंबुजीना अजून एक महत्वाची जबाबदारी दिली गेली, ती म्हणजे लाहोर व पानिपत येथे एकमेकाविरुद्ध उठाव करणाऱ्या शिखांच्या बंदोबस्ताची!अंबुजीनी या मोहिमेत महत्वाची भूमिका बजावत मार्च१७८७च्या शेवटास शिखांच्या भांडणाऱ्या दोन्ही गटात समझौता घडवून आणला. या कामात माचेरीच्या महाराव प्रतापसिंग यांची मध्यस्थ म्हणून मदत झाली. महाराव प्रतापसिंग हा शिंखांच्या बरोबर या पूर्वीच संपर्कात  होता व शिखांनी महादजींना सामील होऊन सर्वानी मिळून तुर्कांना हाकलून देण्याचा बेत करीत होता. तसेच लखनौच्या नबाबाकडून, दिल्लीच्या बादशहाकडून, जयपूर व जोधपूरच्या राण्यांकडून प्रदेश जिंकून घेऊन राज्यविस्ताराच्या प्रयत्नात होता. २७ते३१मार्च१७८७ च्या दरम्यान राव प्रतापसिंग व अंबुजी दोघे दिल्लीच्या उत्तरेस १३ मैलावर असलेल्या भक्तावरपूर कूच करून गेले. तेथे त्यांनी दुफळी असलेल्या शीख सरदारांशी ३१मार्च रोजी तह करून दिला.ता तहान्वये अंबुजीनी शिखांना वेगळा ‘राखी’ नामक सारा गोळा कार्यास मज्जाव करून,त्या बदल्यात मराठे व शिखांनी एकत्र मिळून कर गोळा करावा व त्यातही १/३ वाटा शिखांना व २/३ मराठ्यांना मिळावा असे ठरले.

संदर्भ: Ambaji Inglia – An Historical Saga Unearthed या लेखाचे मुक्त भाषांतर, मराठी रियासत खंड ६, सरदेसाई ,पुणे रेसिडेन्सी पत्रव्यवहार खंड ८, ऑक्टोबर १७९६ पत्र,

संकलन व लेखन: प्रमोद करजगी

Leave a Comment