महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,23,939

उत्तर मराठेशाहीतील एक विस्मृतीत गेलेला सेनापती | अंबुजी इंगळे भाग २

By Discover Maharashtra Views: 1624 13 Min Read

अंबुजी इंगळे | उत्तर मराठेशाहीतील एक विस्मृतीत गेलेला सेनापती –

अंबूजींचे राजस्थानमधील यश: अंबुजीना इंगळे यांना राजस्थानात प्रचंड यश मिळाले व तेथे त्यांच्या आयुष्याचा राजकीय व लष्करी कर्तृत्वाचा सुवर्णकाळ बघायला मिळाला. अंबुजीच्या कर्तृत्वाबद्दल अल्वरच्या रावराजाने अंबुजी इंगळे यांचा मानसन्मान केला व त्यांना राज्यांतील महत्वाचे ‘किताब’ दिले. त्यावेळी सन्मानाची वस्त्रे, एक हत्ती व दोन रुबाबदार घोडे वस्त्रे त्यांच्या लष्करी यशाबद्दल त्यांना भेट देण्यात आले.कोटा येथील एक मुत्सद्दी झाला झालीमसिंग यांचा राजस्थानच्या राजकारणात मोठा प्रभाव होता. अंबुजी इंगळे यांचे त्यांच्यासंगे सौहार्दाचे संबंध होते कारण त्यांच्या वडिलांनी त्रिंबकजी इंगळे यांनी भूतकाळात एका लढाईत झालीमसिंग यांचे प्राण वाचवले होते.(उत्तर मराठेशाहीतील एक विस्मृतीत गेलेला सेनापती)

सिप्रा येथील लढाईत झालीमसिंग हे जखमी होऊन त्रिंबकजी यांच्या हातात कैदी म्हणून सापडले होते. अशा अवस्थेत त्रिम्बकजी यांनी झालीमसिंग यांचे आदरतिथ्य करून त्यांची योग्य अशी काळजी घेतली होती. येथे एक गोष्ट ध्यानात घ्यावी लागेल ती म्हणजे १७८९मध्ये झालीमसिंगाच्या बायकोने त्रिंबकजीना भाऊ मानून पतीच्या रक्षणाकरिता राखी पाठवली होती.झालीमसिंगच्या सुटकेसाठी अंबुजीनी महादजींना आपल्या पत्नीकडून राखी पाठवली,कारण महादजींना ती आपला मानलेला भाऊ समजत असे. अशा कारणाने झालीमसिंग हा नेहमीच इंगळे घराण्याबद्दल कृतज्ञ राहिला. शिंद्यांचा प्रतिनिधी म्हणून अंबुजी मेवाड प्रातांचा कारभार पाहत असत . अंबूजींची मेवाडचा कारभारी म्हणून काढलेली ८ वर्षे त्यांच्या राजकीय व प्रशासकीय सेवेचा उत्तम काळ होता असे म्हणता येईल.

मेवाडमध्ये त्यावेळेस दोन प्रमुख गट होते, ते म्हणजे शेखावत व चुडावत,जे त्या प्रांतातील एकमेकांचे प्रतिस्पर्धी होते.अंबुजीनी त्या दोघांची बंडे मोडून काढली व शेखावतांकडून ८लाख रुपये व चुडावातकडून १३लाख रुपये खंडणीच्या स्वरूपात दंड वसूल केला. मेवाडच्या राण्याची गादी अंबुजीच्या  लष्करी सामर्थ्यामुळे सुरक्षित होती हे मेवाडच्या राण्याला समजले होते. म्हणून मेवाडच्या राण्याने आपल्या मंत्र्यांतर्फे अंबुजीशी एक वेगळा तह केला व त्या तहानुसार अंबुजीच्या लष्करी सेवांसाठी वर्षाला ८ लाख रुपये देण्याचे कबूल केले. या प्रकारच्या अनेक कामामुळे अंबुजीकडे संपत्तीचा ओघ एव्हढा वाढत होता की त्याच्या बहिणीच्या लग्नासाठी ८ लाख रुपयांचे दागिने करणे त्याला सहज शक्य झाले. अंबुजीनी नंतर बंडखोराकडून दिल्लीच्या उत्तरेस जहाजगड (जॉर्जगड) जिंकून ताब्यात घेतला.

अंबुजी त्या काळात एव्हढा प्रबळ झाला की ऑक्टोबर१७९६ मध्ये तो एक महादजीचा सामान्य चाकर न राहता सर्व मांडलिक संस्थानाचा ताबेदार बनला. पुणे रेसिडेन्सी पत्रव्यवहारात म्हंटले आहे की अंबुजीचे सामर्थ्य महादजींच्या तोडीस तोड होते आणि संपत्ती शिंद्यांच्या बरोबरीची होती. महादजीच्या मृत्यूनंतर मात्र दौलतरावांच्या कारकिर्दीत  होळकरांनी शिंद्यांशी गुप्त समझौता करून अंबुजी वर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली व त्यांच्याकडून भूतकाळातील वसुलीच्या रकमेपैकी ६५लाख रुपयांची मागणी केली. इतिहासकार टॉडच्या म्हणण्यानुसार या वेळेस अंबुजीकडून ५५लाख रुपये उकळण्यात आले. वसुलीचा सारा जमा करण्यासाठी अंबुजीला त्याच्या विनंतीवरून अमीर खान व बापूजी शिंदे यांच्या सोबत पैसे जमा करण्यासाठी कोट्यास जाण्याची परवानगी देण्यात आली  होती. एव्हढे करून अंबुजीने त्याला मागणी केलेल्या रकमेच्या अर्धा हिस्सा देण्यात यश मिळवले.(उत्तर मराठेशाहीतील एक विस्मृतीत गेलेला सेनापती)

राजस्थानमधील अंबुजी इंगळे यांच्या कारभाराचा आढावा: मेवाड येथील अंबुजीच्या कारभाराबद्दल इतिहासकारांत वेगवेगळे विचार प्रवाह आहेत. गौरीशंकर ओझा यांच्या मते महादजींनी अंबुजी यांची नेमणूक आपला प्रतिनिधी म्हणून केली परंतु अंबुजी दिवसेंदिवस शक्तिशाली होत गेला की स्वतःला मालक समजू लागला व आपणास राजस्थानचा कर्ताकरविता भासवु लागला.जेम्स टॉडच्या मते अम्बुजीने त्याच्या आठ वर्षाच्या कारकिर्दीत निर्विवादपणे मेवाड राज्याचा सारा वाढवला व त्याने एव्हढी संपत्ती जमा केली की उत्तर हिंदुस्थानातील एक स्वतंत्र राजा म्हणून त्याची ओळख होऊ लागली. झाला झालीमसिंग याला स्थानिक सल्लागार ठेऊन अंबुजीने राजस्थानला खूप वर्षे हवी असलेली उत्तम प्रशासकीय पद्धती दिली. राजा अंबुजीने मेवाडच्या लोकांना शांतता व सुखकारक दिवस दिले ज्या गोष्टीसाठी तेथील प्रजा अनेक वर्षे आसुसली होती. अंबुजीच्या उत्कृष्ट कारभाराची पावती म्हणजे त्याने त्या प्रांताचे उत्पन्न प्रतिवर्षी ५०लाख रुपयांपर्यंत वाढले.

अंबुजीचे दौलतराव शिंद्याबरोबरचे संबंध: महादजीचा मृत्यू पुण्यात फेबुवारी १७९४ मध्ये झाला व आपल्या मागे त्यांनी अफाट प्रदेश व संपत्ती सोडली होती. महादजीना पुत्र नसल्याने त्यांनी हयात असतानाच दौलतराव या १४ वर्षाच्या कोवळ्या मुलास आपला वारस नेमला होता. त्यानंतर लगेच सवाई माधवराव पेशव्याचा ७ऑक्टोबर १७९५मध्ये मृत्यू झाल्याने दौलतरावचे लक्ष जास्त करून पुण्याच्या वारसाहक्काच्या घडामोडीवर केंद्रित झाले.त्यामुळे दौलतराव शिंदे याना अनेक वर्षे राजस्थानकडे बघायला वेळच झाला नाही. त्या योगे तेथील मराठे राज्यकारभार हाकायचा पूर्ण जबाबदारी अंबुजी इंगळे यांच्यावर येऊन पडली. दौलतरावांनी आपल्या राज्याच्या पूर्वेकडील झाँसी सकट प्रदेशाची जबाबदारीसुद्धा अंबुजीवर सोपवली.(उत्तर मराठेशाहीतील एक विस्मृतीत गेलेला सेनापती)

महादजींच्या निधनानंतर त्यांच्या विधवा स्त्रियांत सर्वख्यात भांडणे व वादविवाद सुरु झाले कारण दौलतरावाच्या नेमणुकीला त्यांचा कट्टर विरोध होता. कारण दौलतरावांकडे महादजीची ना हुशारी होती ना परिपक्वता! त्यामुळे नंतरच्या काळात त्याला महादजीने जसे आपल्या सरदारांशी सौहार्दाचे संबंध ठेवले होते तसे ठेवता आले नाहीत. दौलतरावांकडे महादजींची लष्करी ताकद नव्हती व राज्यकारभाराची कुवत नव्हती त्यामुळे तो सर्जेराव घाटग्यांच्या हातातील एक बाहुला झाला व त्याच्या सुंदर पत्नीच्या बायजाबाईच्या सल्ल्याने कारभार हाकू लागला. महादजींच्या विधवा पत्नींच्या लढाईत अंबुजी, बाळोजी व खंडूजी यांनी दौलतरावची बाजू घेतली. दौलतरावाच्या आज्ञेनुसार अंबुजी इंगळे याने उत्तरेकडे प्रतिपक्षाला काबूत ठेवले व अशा तऱ्हेने अंबुजी दौलतरावाच्या मर्जीतील खास माणूस झाला. विधवांच्या लढाईत नरवरच्या राजाने विधवांचा पक्ष घेतल्याने तो दौलतरावाच्या शत्रुपक्षात गेला व त्याने शिंद्यांचा दुसरा महत्वाचा सरदार लखबादादा याला आश्रय दिला.

लखबादादा जो उत्तरेकडील मराठ्यांचा प्रतिनिधी होता त्याने एक दिवशी अचानक नरवरच्या राजावर हल्ला चढवला व त्याने नरवर जिंकून घेतले व किल्ल्याला वेढा घातला. परंतु दैवाचा खेळ किती विचित्र असतो कारण त्याच नरवरच्या राजाचा लखबादादाला आश्रय घ्यावा लागला कारण अंबुजी इंगळे त्याचे भांडण झाले. अंबुजी इंगळे यास नरवरचा समाचार घेण्यास पाठवण्यात आले, त्याने नरवरच्या राजाचा व लखबादादाचा पराभव केला व आपला बंधू खंडेराव इंगळे याला नरवरची सुभेदारी दिली. त्यावेळेस दौलतरावाने संपूर्ण उत्तरेतील जहागिरीचा मुख्य म्हणून अंबुजीची नेमणूक केली. अंबुजी इंगळे व सर्जेराव घाटगे दोघांनी मिळून शिंदे व होळकर यांची इंग्रजविरद्ध युती करण्याचा विफल प्रयत्न केला.

दौलतराव याला राजकारणातील धागेदोरे व गुंतागुंत माहिती नसल्याने तो हळूहळू अंबुजीच्या वाढत्या सत्तेबद्दल सांशक होऊ लागला. खरे तर दुर्दैवाने दौलतरावास अंबुजीचा त्या काळात उपयोग करून घेता आला नाही. जेव्हा पैशाची चणचण भासू लागली तेव्हा दौलतरावाने होळकरांना अंबुजीचा प्रदेश लुटण्यास परवानगी दिली,यामागे एक अट अशी होती ती म्हणजे लुटीतील निम्मा वाटा दौलतरावास मिळाला पाहिजे. अंबुजीकडील संपत्तीवर डोळा ठेवून दौलतरावाने एका दगडात दोन पक्षी मारायचा प्रयत्न केला. परंतु यात फायदा कोणाचा झाला असेल तर तो इंग्रजांचा कारण अंबुजी हा होळकरांचा हाडवैरी बनला कारण यापुढे होळकर व शिंदे यांच्यात कधीही एकी होऊ शकणार नव्हती. तथापि दौलतरावाने अंबुजीस काही महत्वाची कार्ये सोपवली.(उत्तर मराठेशाहीतील एक विस्मृतीत गेलेला सेनापती)

इंग्रजांबरोबर तह: अंबुजी इंगळे याने महादजीचा प्रधान म्हणून राजस्थानात बरेच नाव व संपत्ती कमावली होती. जेव्हा दौलतरावाने अंबुजीकडे जमा केलेल्या सार्याबद्दल ४७ लाख रुपयांची मागणी केली तेव्हा अंबुजीने आपला वकील लॉर्ड वेलस्ली याला गुप्तपणे भेटायला फतेहगड येथे १८०१मध्ये पाठवला. वकिलातर्फे त्याने स्वतःला कर्नल कॉलिन याजकडे कंपनीकडे आसरा देण्याची विनंती केली. १८०३ मध्ये त्याने आपल्या मालकाशी म्हणजे दौलतराव शिंद्यांशी बंड पुकारून वेलस्लीबरोबर बोलणी चालू ठेवली. अंबुजीचा मुक्काम त्यावेळेस ग्वाल्हेरला होता आणि इंग्रजांचा  झपाट्याने होणार राज्यविस्तार व स्वयं महत्वाकांक्षेपायी त्याने लासवारीच्या लढाईपूर्वी इंग्रजांशी समझोता केला ज्यायोगे इंग्रजांनी त्याला मारवार,शिवपुरी,कुंच,सबळगड,बिजयपूर,कोलारस देण्याचे मान्य केले.

हिंदुस्थानच्या इतिहासात हा तह इंग्रज व राजा अंबुजी यांच्यातील एक मैत्री व सलोख्याचा तह म्हणून प्रसिद्ध पावला. त्या तहातील कलमानुसार राजा अंबुजी यांनी ग्वाल्हेरचा किल्ला इंग्रजांना दिला व त्याच्या आजूबाजूचे परगणे अंबुजीच्या ताब्यात होते ते सुद्धा इंग्रजांना बहाल केले. इंग्रजांनी त्या बदल्यात नरवरचा किल्ला आणि तेरा लाख उत्पन्नाचा बाजूचा प्रदेश राजा अंबुजीला देऊन टाकला. हे सारे प्रदेश त्या समयी राजा अंबुजीकडे विना उत्पन्नाचे होते. १६ डिसेंबर १८०३ रोजी  जनरल गेरार्ड लेक बरोबर अकबराबाद परगणे सरहिंद येथे तहावर शिक्कामोर्तब झाले. हा तह इंग्रजांनी भविष्यात काही कारणांनी अमान्य केला तरी त्यावेळचे राजा अंबुजीचे इंग्रजांच्या दृष्टीतून हिंदुस्थानच्या राजकारणातील महत्व दिसून येते. या तहाचे महत्व एव्हढ्यासाठी आहे कारण या तहामुळे दौलतराव शिंदे यांचे वर्चस्व हिंदुस्थानच्या  उत्तर भागातून नाहीसे झाले.

राजा अंबुजीचे शेवटचे दिवस: वर उल्लेखलेल्या तहाच्या दुसऱ्या कलमानुसार अंबुजी इंगळे याने ग्वाल्हेरचा किल्ला इंग्रजांना हस्तांतरित करणे बंधनकारक होते परंतु अंबुजीला ते काही कारणाने जमले नाही. त्यामुळे अंबुजीची स्थिती दोन्ही घराचा पाहुणा उपाशी अशी झाली. इंग्रजांचा त्याच्यावरचा विश्वास उडाला तर दौलतराव शिंद्यांची, त्याच्या मालकाची त्याने गैरमर्जी ओढवून घेतली. सन१८०९मध्ये दौलतराव याला अंबुजीचा राग आल्याने त्याने अंबुजीला पोहरी (शिवपुरीजवळ) येथून हाकलून देण्यासाठी आपला सरदार याकूबखान याला रवाना केले.याप्रकारे एका मराठा सरदाराची वैभवशाली कारकिर्द आता उतरणीला लागली.

उत्तर मराठेशाहीतील एक विस्मृतीत गेलेला सेनापती भाग १

इतिहासकार बौटन याच्या लेखात अंबुजीच्या अखेरच्या काळाचे वर्णन आले आहे. बौटनचा इतिहास हा इतिहासातील कदाचित हा एकमेव अधिकृत स्रोत असेल ज्यामध्ये अंबुजीच्या वैभवशाली जीवनाचे वर्णन आले असेल. त्यामध्ये तो म्हणतो की बिचारा वयोवृद्ध राजा अंबुजी इंगळे हा मृत्युपंथाला लागला आहे. काही दिवस आधी तो आजाराने ग्रासलेला होता आणि त्याने पूर्वीचा इंग्रज डॉक्टर याना परत येऊन भेटण्याची विनंती केली. आपल्या लष्करात मोडकळीस आलेल्या शामियानामध्ये तो अतिशय दयनीय अवस्थेत पहुडला होता. त्याच्याभोवती शुश्रूषा करणारे मोजकेच नोकरचाकर होते. दोन दिवसाने अंबुजी तेथून सकाळीच बिआस नदीच्या काठी गेला होता असे कळले. कदाचित अंशतः हवा बदल म्हणून व आपल्या पत्नीस व मुलांना भेटायला तो गेला असेल. त्याच्या वृद्ध वयामध्ये राजकारणाची धामधूम व इतर भानगडी यांचा त्रास होऊन त्याचा शेवटचा दिवस जवळ येऊन ठेपल्यास नवल नव्हते. अशा प्रकारे ५ मे १८०९ रोजी सकाळच्या वेळी राजा अंबुजीचा देहांत त्याच्या लष्करी तळापासून जवळच बुगेरा येथे झाला. तथापि पुणे रेसिडेन्सी पत्र व्यवहार मध्ये ४मेच्या रात्री मरण पावला असे म्हंटले आहे. आपल्या मागे त्याने प्रचंड संपत्ती सोडल्याचे म्हंटले आहे, एके ठिकाणी त्याच्यामागे ३ कोटी रुपये होते असे नमूद केलेले आहे.त्याची राजकीय कारकीर्द व त्याच्या हातातील अनेक वर्षे असलेली सत्ता पाहता हा आकडा खरा देखील असू शकतो. त्याच्या मृत्युशय्येपाशी त्याचा एक पुत्र दाजी हा हजर होता, अंबुजीची जहागिरी मुलाला देण्यासाठी त्याने ४ ते ५ लाख रुपये नजर करावेत अशी दौलतरावांची अपेक्षा होती.

अंबुजी इंगळे यांच्या कारकिर्दीचा वस्तुनिष्ठ आढावा: राजा अंबुजी इंगळे हा पेशाने हाडाचा सैनिक होता व शेवट पर्यंत तो महादजींशी व नंतर दौलतरावांशी एकनिष्ठ राहिला. त्याचे मन दुर्दम्य इच्छाशक्तीने भरलेले होते व काही प्रकारची धोकेबाजी त्याच्या स्वभावात होती.१९व्या शतकाच्या पहिल्या दशकात अंबुजी इंगळेंचे नाव बरेच गाजले आपले वडील त्रिंबकजी यांच्याकडून त्यांना शौर्य व मुत्सद्देगिरी हे  गुण त्यांना आपोआप मिळाले होते. आपल्या इतर भावासोबत अंबुजी व त्याचे वडील यांनी अहमद शहा अब्दाली विरुद्ध पानिपतच्या लढाईत भाग घेतला होता. अंबुजीने आपली कारकीर्द एक सामान्य सुभेदार सुरु केली व शेवटी मोठ्या प्रांताचा मुख्य झाला. त्याच्या आठ वर्षाच्या मेवाडच्या कारकिर्दीत त्याने त्याकाळातील त्याच्या बरोबरीच्या इतर सुभेदारांच्या तुलनेत प्रचंड पैसा जमा केला. झालवाड जहागिरीचा प्रमुख अतिशय हुशार व धोरणी असा झालीमसिंग हा त्याचा सल्लागार होता. त्यांच्यातील मैत्रीचा अंबुजीला फायदा झाला. अंबुजीने तरुण इंग्रज लष्करी सेनापती जोसेफ हार्ले बेलासिस याची नेमणूक केली. जोसेफच्या हुशारीने अंबुजीने कवायती फौजेच्या पायदळाच्या चार बटालियन उभ्या केल्या. कर्नल जेम्स हाफर्ड याची पण अंबुजीला मदत झाली. तो अंबुजीकडे १७९०मध्ये नोकरीस लागला व त्याने तोफखान्याचे एक ब्रिगेड तयार केली. अठराव्या शतकाच्या अखेरीस व एकोणिसाव्या शतकाचा पहिल्या दशकात अंबुजी इंगळे हा निर्विवाद त्याकाळातील एक हुशार व चलाख मराठा सरदार होता. एका सामान्य सुभेदारापासून तो आपल्या शौर्याने, चिकाटीने, मुत्सद्देगिरीने व कामगिरीने या हुद्द्याला पोचला त्याला सलाम केला पाहिजे.

उत्तर मराठेशाहीतील एक विस्मृतीत गेलेला सेनापती भाग १

संदर्भ: Ambaji Inglia – An Historical Saga Unearthed या लेखाचे मुक्त भाषांतर, मराठी रियासत खंड ६, सरदेसाई ,पुणे रेसिडेन्सी पत्रव्यवहार खंड ८, ऑक्टोबर १७९६ पत्र.

संकलन व लेखन: प्रमोद करजगी

Leave a Comment