महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,25,676

अमृतेश्वर महादेव मंदिर, बनोटी

By Discover Maharashtra Views: 3742 5 Min Read

अमृतेश्वर महादेव मंदिर, बनोटी…

पाचोरा तालुक्यातील पाचोरा ते सिल्लोड या मार्गावर असलेले एक महत्त्वाचे गाव म्हणजे बनोटी. पाचोऱ्यापासून साधारणतः 15 कि मी अंतरावर असलेले हे गाव व्यापारी दृष्टया एक महत्त्वाचे केंद्र होते. मराठवाडा व खान्देशच्या सीमेवर असल्याने मध्यकालीन इतिहासात हे चांगलेच भरभराटीला आलेले नगर होते. कन्नड, सोयगाव व पाचोरा, सिल्लोड या मराठवाडा व खान्देशातील तालुक्यांना जोडणारा अजिंठा डोंगर पायथ्यापासून जाणारा मुख्य मार्ग याच गावावरून जातो. त्यामुळे पूर्वीपासून येथे वर्दळ असायची.अमृतेश्वर महादेव मंदिर.

मराठवाड्यातून खान्देशात उतरणारा एक प्राचीन व्यापारी मार्ग येथून जवळच होता, त्यामुळे देखील या गावचे प्राचीन महत्त्व लक्षात येते. मुख्य शहरापासून लांब असले तरी घाटमाथ्याच्या पायथ्याशी असल्याने सुपीक जमीन, मुबलकपाणी, व प्रचंड मेहनत, यामुळे शेती व्यवसायात बरीच प्रगती येथील शेतकऱ्यांनी केलेली दिसते. शेती व्यवसाय सांभाळताना अध्यात्माचा वारसा देखील गावकऱ्यांनी चांगलाच जोपासलेला दिसतो.

गावाच्या ईशान्य दिशेला असलेले अमृतेश्वर महादेव मंदिर याची साक्ष देते.हिवरा नदीच्या काठी असलेल्या या मंदिराला प्राचीन वारसा लाभलेला दिसतो.आपण वाचत आहात संजीव बावसकर लिखित पोस्ट. मंदिराचे सभागृह व गर्भगृह असे दोन भाग पडतात.सभागृहाचे बांधकाम संपूर्णपणे दगडी असून चोवीस खांबांवर तोललेले आहे.त्यावर दगडी तुळया अलगदपणे बसवलेल्या आहेत.आईलपेंट मुळे त्याला कमालीचा गुळगुळीतपणा आला आहे.
या सभागृहाचे वैशिष्ट्य म्हणजे मध्यभागी असलेली नंदीची मूर्ती होय. अजिंठा पर्वत रांगेच्या पायथ्याशी असलेल्या धारकुंड येथून मूर्तीसाठी पाषाण आणल्याचे स्थानिक गावकरी सांगतात.नंदीचे घडीव काम सुंदर आहे. एकाग्र होऊन शिवपिंडीचे दर्शन घेत असल्याची अनुभूती मूर्तीतून जाणवते.

मंदिराच्या मुख्यद्वारापाशी दोन ऋषी कुमार अखंड शंखनाद करीत असल्याची दोन शिल्पे आढळतात.त्यांच्या मूर्ती विलोभनीय आहेत.मंदिराच्या उजव्या बाजूला गणेशाची पद्मासनातील चौकोनी शिळेवर कोरलेली मूर्ती आढळते.मूर्ती पूर्णपणे शेंदुराने माखल्यामुळे चटकन ओळखता येत नाही.

मंदिराच्या मुख्य द्वारावरील उंबरठ्यावर असलेला किर्तीमुख मेष स्वरुपात आहे. मंदिराच्या प्राचीनतेचा एकमेव दृश्य पुरावा या किर्तीमुखाच्या रूपाने दिसतो. ऑईलपेंट पासून त्याची एकट्याचीच सुटका झाली आहे. महाद्वाराच्या वरच्या पट्टीवर गणेशमूर्ती विराजमान आहे. गर्भगृहात विराजित शिवपिंडी खूपच आकर्षक आहे. शाळुंका प्रमाणबद्ध असून बघता क्षणीच मन मोहून टाकणारी आहे. दर्शन घेतांना हात व मस्तक आपोआप एकरूप होते . वर्षभरात केव्हाही दर्शनाला गेले तरी बिल्वपत्र व पुष्प शिवचरणी समर्पित दिसतेच.येथे बाराही महिने सकाळ संध्याकाळ नित्यपूजा केली जाते.

असे सांगतात की पूर्वी या मंदिरात विशालकाय घंटा टांगलेली होती. तिचा आवाज गाव व परिसरात निनादत असे. काही वर्षांपूर्वी ती गहाळ झाली. त्यामुळे हा संपूर्ण परिसर आज सी सी टीव्ही कॅमेऱ्यात बंदिस्त करण्यात आला आहे. गर्भगृहाची उंची आतून पंचवीस फुटांपर्यंत आहे, त्यामुळे वायुविजनाची व्यवस्था आपोआप होते.

मंदिर शिखरांची रचना बाणाकृती असून त्याची उंचीच शंभर फुटांपर्यंत आहे. त्यामुळे संपूर्ण परिसरात मंदिर उठावदारपणे शोभून दिसते. मंदिराची ऑईलपेंटने रंगरंगोटी केल्याने प्राचीन असलेले बांधकाम नवीनच वाटते.
मंदिरापासून नदीपात्रात उतरण्यासाठी सुमारे वीस पायऱ्यांचा पक्का घाट बांधलेला आहे.येथे नदीपात्रात असलेले गोमुखतीर्थ हे अमृतेश्वर मंदिराचे एक वैशिष्ट्य आहे. येथे बाराही महिने अखंड तीर्थधार सुरू असते. वटवृक्षाच्या खालून येणारी तीर्थधार उन्हाळ्यातही झुळुझुळू वाहत असते.पूर्वी गोमुखातून धो धो जलधारा प्रवाहित होती. या पन्नास वर्षात उपसा व जलसिंचन वाढल्याने पाणी पातळी कमालीची खाली गेली. त्याचा परिणाम गोमुखतीर्थावरही झाला. गोमुखतीर्थासाठी पाच फूट खोलीचे दगडी कुंडही बांधण्यात आले आहे. त्यामुळे भाविकांना स्नान करता येते.

या संपूर्ण मंदिर व परिसराच्या पुनरुज्जीवनासाठी कै. मावजीबुवा महाराज आडगावकर या सत्पुरुषाने विशेष लक्ष दिले. स्थानिक गावकऱ्यांनी या कामी त्यांना सढळ हस्ते मदत केली. आज मावजी बुवांचे तिसरे वंशज ह भ प भानुदास महाराज हे गावकऱ्यांच्या सहकार्याने व्यवस्था पाहतात.

संपूर्ण मंदिर परिसरात पेव्हरबॉक्स बसवल्यामुळे परिसर फारच मनमोहक वाटतो.अन्य मंदिरांच्या तुलनेत येथे फारच सुधारणा दिसून येतात, त्यामुळे विश्वस्त मंडळ निश्चितच कौतुकास पात्र आहे.
श्रावणमहिन्यात येथे दररोज विविध पूजाविधी नित्यनेमाने सुरू असतात.श्रावण सोमवारी तर यात्रेचे स्वरूप प्राप्त होते.काही भाविक फराळाचे देखील वाटप करतात.महाशिवरात्रीला येथे मोठी यात्रा भरते.त्यासाठी खानदेश व मराठवाड्यातील व्यापारी आपापली दुकाने थाटतात . भाविकांची तर अलोट गर्दी असते.

पाचोऱ्यापासून अवघ्या 15 किमी अंतरावर असलेल्या बनोटी गावी जाण्यासाठी बससेवा व खाजगी वाहनाने जाता येते.सिल्लोडकडून आलात तर जोगेश्वरी या प्राचीन गुंफा मंदिराचे दर्शन घेऊन घाट उतरून आपण बनोटीला येऊ शकतो.
अजिंठा पर्वत रांगेत असलेला हा घाट सुमारे 15 किमी लांबीचा आहे.घाटरस्ता खूपच रोमांचक आहे. पावसाळ्यानंतर आलात तर आपण कोकण घाटातच फिरत आहोत असा भास होतो.प्रत्येक वळणावर निसर्गाचे अप्रतिम रूप डोळ्यांचे पारणे फेडते.खोल दरी व त्यात ओसंडून वाहणाऱ्या जलधारांचे नृत्य मनाला व शरीराला ताजेतवाने करून सोडते.दिवाळीच्या सुट्टीत एक दिवसाच्या सहलीसाठी अमृतेश्वर व जोगेश्वरी हे उत्तम ठिकाण आहे.

संजीव बावसकर, जळगाव

Leave a Comment