अमृतेश्वर मंदिर समूह, पुणे –
थोरल्या बाजीराव पेशव्यांची भिऊबाई जोशी ही धाकटी बहीण. तिला चोळीबांगडीसाठी पुण्यातील शनिवार पेठेचं उत्पन्न श्रीमंत बाजीरावांनी तहहयात लावून दिलं होतं. त्यांच्या मृत्यूनंतर नानासाहेब पेशवे आणि भिऊबाईचे थोरले दीर बाबूजी नाईक यांनी भिऊबाईंच्या स्मरणार्थ एक शिवालय बांधायचा संकल्प केला. त्यानुसार मुठेकाठी शिवरामभट चित्रावांच्या जागेत एक टुमदार देवालय(अमृतेश्वर मंदिर समूह) इ.स. १७४९ मध्ये उभारले गेले. तेच हे अमृतेश्वर मंदिर.
बाजीराव रस्त्यावरून शनिवार वाड्याशेजारून पुणे महानगरपालिकेकडे जाताना नदीकाठाच्या अलीकडे डाव्या हाताला कोपऱ्यावर शिवकालीन व पेशवेकालीन अमृतेश्वर मंदिर समूह अशी पाटी असलेल दरवाजा दिसतो. इथे केवळ शिव मंदिरच नाही, तर मारुती मंदिर, राम मंदिर, विठ्ठल मंदिर, अमृतेश्वर मंदिर, सती वृंदावन, विष्णू-लक्ष्मी मंदिर आणि सिद्धेश्वर मंदिर आहे. काही दगडी शिल्पे, गणेशमूर्ती, सिद्धेश्वर मंदिराच्या गाभाऱ्यातील सूर्यमूर्ती असं जणू काही देव देवतांचं संमेलनच इथे भरलेलं आहे. या ठिकाणाला भेट देताना गजबजलेल्या पुण्यात आपण आहोत असं वाटतही नाही. एवढी शांतता आपल्याला या मंदिर समूहाच्या परिसरात अनुभवयाला मिळते.
या मंदिर समूहाच्या प्राकारात शिरलं की प्रथम डाव्या बाजूला मारुती मंदिर दिसतं. मीटरभर उंचीच्या ह्या बलभीम हनुमानाचा तोंडवळा मात्र मानवी भासतो. हा मारुती पूर्वेकडे तोंड केलेला आहे. मंदिराच्या डाव्या हाताला एक समाधी चौथरा आहे.
श्रीगुरुदेवः प्रसीदतु ।
वामनात्मज रंगनाथ, यतिनाम समाधितम् ।
पूजार्थं तस्य वै स्थानं चित्राविण विनिर्मितम् ॥
समाधी शक: १८४० ऋषिपंचमी
असा लेख या समाधीवर संगमरवरी पाटीत कोरलेला आहे.
या मंदिराच्या उजव्या बाजूला असलेल्या दरवाजातून आत गेल्यावर डाव्या हाताला सिद्धेश्वर मंदिर आहे. दगडी बांधणीच्या ह्या मंदिराच्या समोरील बाजूस स्वतंत्र नंदीमंडप कळसासहित आहे. सिद्धेश्वर मंदिराला चार दरवाजे असणारा मोठा सभामंडप आहे. त्या सभामंडपात डावीकडे सिद्धीविनायक आणि उजवीकडे नागयुग्म आहे. गाभाऱ्यात शिवलिंग आहे. शिवलिंगामागील भिंतीशी सुमारे अर्धा मीटर उंचीची सूर्यमूर्ती आहे. हि मूर्ती चतुर्भुज आहे. त्या सूर्याच्या मुकुटाभोवती किरणांची प्रभावळ दिसते. सात अश्व, सारथी अरुण, चवऱ्या ढाळणारे व छत्र धरणारे सेवक रथात बसलेल्या सूर्याशेजारी आहेत.
सिद्धेश्वर मंदिराच्या डावीकडे थोडे हवेशीर असे विष्णुमंदिर आहे. त्यातील विष्णुमूर्तीचा आयुधक्रम गदा, चक्र, शंख, पद्म असल्याने ती माधव विष्णूची मूर्ती आहे. शेजारची लक्ष्मीची मूर्ती दोन हातांची असून उजवा हात अभयमुद्रेत तर डावा हात वरदमुद्रेत आहे. या लक्ष्मी-विष्णूसमोरील मानवी देहधारी नमस्कार मुद्रेतील गरुडही संगमरवरीच आहे. लाकडी मखरात असणाऱ्या विष्णुमूर्तीची स्थापना व मंदिर उभारणी १५-१२-१७४९ रोजी केली गेली व त्याचा दोनदा जीर्णोद्धार झाला.
याशिवाय येथे एक राममंदिरही आहे. मंदिराबाहेर १८ व्या शतकापूर्वीचे चित्राव राम मंदिर अशी पाटी आहे. पांढऱ्या म्हणजे संगमरवरी दगडातील मीटरभर उंचीच्या लक्ष्मण-राम-सीता अशा मूर्ती अगदी राजस्थानी धाटणीच्या वाटतात. समभंग अवस्थेतील या उभ्या मूर्तीमध्ये ना नाजूकपणा ना विशेष डील. त्यांची वस्त्रप्रावरणं देखील साधी. अलंकारही फार नावाजण्याजोगे नाहीत. अतिशय साध्या नि सात्त्विक अशा या मूर्ती आहेत.. चेहऱ्यावरील किंचित विलसणारं स्मितहास्य एवढाच बारकावा. मार्च १७६९ मध्ये त्या मूर्तीची इथे स्थापना झाली. या रामासमोर मारुतीची स्थापना केलेली नाही, हे वैशिष्ट्य म्हणावे लागेल.
राममंदिराच्या पुढ्यातच विठ्ठल-रखुमाईचं मंदिर आहे. काळ्या दगडाच्या एक मीटरपेक्षा थोड्या जास्त असणाऱ्या ह्या मूर्ती आहेत. या पांडुरंग मंदिरानंतर लागतो चार भिंतींनी बंदिस्त केलेला प्राकार येथील जमीन फरसबंदी आहे. प्राकार भिंतींमध्ये कोनाडे आहेत. पूर्वी कदाचित त्यांत दिवे-पणत्या लावीत असावेत. मोठ्या कळसाचं ताशीव पाषाण चिऱ्यांचं मुख्य शिवमंदिर म्हणजे अमृतेश्वराच मंदिर आजे. समोर वेगळ्या छोट्या घुमटाकृती कळसाचा स्वतंत्र नंदीमंडप आहे. नंदीमंडपापाशी एक चौकोनी उभा खांबासारखा चौथरा दिसतो. त्यावर ब्रह्मा, चंद्र, गणेश, सूर्य यांच्या प्रतिमा कोरलेल्या दिसतात. या अमृतेश्वर शिवमंदिराच्या तीन कमानींच्या ओवरीत लहान गणेशमूर्ती कडेच्या कोनाड्यात आहेत. हे डाव्या व उजव्या सोंडेचे गणपती आहेत.गाभाऱ्याच्या प्रवेशद्वाराखाली किर्तीमुख कोरलेले आहे.
सिद्धेश्वर मंदिराच्या शेजारी एक दगडी बांधणीचे सती वृंदावन सुद्धा आहे.
॥श्री: ॥
माता सती सत्यभामा धडफळे कुलभूषणा ।
प्रीयंता हि बहिर्द्वार – चीत्रावकृत कर्मणा ॥
मृत्यू शक: १८२९ – लक्ष्मी पूजनम ।
त्यावर असा लेख संगमरवरी पाटीत कोरलेला आहे.
संदर्भ:
मुठेकाठचे पुणे – श्री. प्र. के. घाणेकर
पत्ता :
https://goo.gl/maps/PGeZ1f4pS78GAhSF9
आठवणी इतिहासाच्या