श्री अमृतेश्वर मंदिर, रतनवाडी –
समुद्रमंथनाच्या चौदा रत्नातून अमृतेश्वर मंदिर आणि तीर्थ तयार झाल्याची कथा आहे. इतिहासानुसार दहाव्या शतकातील झंज राजाने गोदावरी ते भीमा दरम्यानच्या प्रमुख बारा नद्यांच्या उगमस्थळी सुंदर शिवालयाची निर्मिती केली. यापैकी प्रवरा नदीच्या उमगस्थळीचे रतनगडाच्या पायथ्याशी हे श्री अमृतेश्वराचे अप्रतिम कोरीव शिल्पकलेचा नमुना असलेले एक मंदिर होय.
नंदी, गाभारा, सभामंडप आणि शिखर अशी रचना असलेल्या या मंदिरास पूर्व आणि पश्चिम अशी दोन प्रवेशद्वारे आहेत. मंदिराच्या रचनेत खाली थरयुक्त चौरस तळखडा असून वर नक्षीकामाने सुशोभित असे चौरसाकृती खांब आहेत. या खांबांचा वरचा भाग अष्टकोनी असून त्यास वर्तुळाकृती आकार आहे. नक्षीदार खांब, कोरीव प्रवेशद्वारे, बाह्य़ भिंतीवरील विविध भौमितीक रचना, आतील भिंतीवरील मूर्तिकाम, छतावरील शिल्पपट मंत्रमुग्ध करणारे असून यक्ष, अप्सरा, गंधर्व, देव, दानव, नर तसेच मैथुन शिल्पेही इथे आहेत. यातील समुद्रमंथनाचा देखावा तर अवश्य पाहावा असाच. आतील स्तंभ कोरीव व देखणे आहेत. गर्भगृहाच्या दारात कीर्तिमुख, शंख, कमळवेलीं असून मंदिरात प्रकाश येण्यासाठी जागोजागी दगडी जाळय़ांची रचना केलेली आहे. या मंदिराचे शिखरावरही कोरीव, जाळीदार नक्षीचे उभे थर आहेत, त्यावर पुन्हा शिखरांच्या छोटय़ा प्रतिकृतींची रचना आहेत. शिखर चार भागात विभागलेले असून वरती आमलक आहे. १५ ते १६ मीटर उंच चुना विरहित देवदेवतांच्या कोरीव जोडकाम केलेले हे मंदिर पूर्ण दगडी असून त्याची लांबी २३ मी. व रुंदी १२ मी आहे.
मंदिराच्या गर्भगृहात शिवलिंग जून ते आँक्टोंबर हे 4महिने पाण्यात असते. आँक्टोंबर नंतर हळूहळू पाण्याची पातळी कमी होते. ४ महिने पाण्यात असते, शिवलिंगाखाली जिवंत झरा असल्याचे सांगितले जाते व ते अमृतवाहिनी प्रवरा नदीचे उगमस्थान असल्याचे मानण्यात येते.
अमृतेश्वराच्या रहाळात देखणी, कोरीव श्रीमंती लाभलेली पुष्करणी आहे. पुष्करणी तब्बल वीस फूट लांब-रुंद. जमिनीलगत कोरीव, आखीव-रेखीव अशी रचना आहे. एका बाजूने आत उतरण्यासाठी पायऱ्या असुन आत फिरण्यासाठी धक्के ठेवलेले. भोवतीच्या भिंतीत सालंकृत अशी बारा देवकोष्टकांची रचना केलेली. त्यांच्या वर पुन्हा छोटय़ा कोरीव शिखरांची रचना आहे. या कोष्टकांमध्ये गणेशाची एक मूर्ती सोडल्यास उर्वरित सर्व ठिकाणी विष्णूचे अवतार आहेत. स्थानिक लोक या पुष्करणीला विष्णूतीर्थ म्हणतात.
या मंदिराला ४ मार्च, इ.स. १९०९ रोजी राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आले आहे. मंदिर अवश्य पाहावे असेच आहे.
नितिन बांडे