अमृतेश्वर मंदिर, रतनवाडी –
रतनगडाच्या पायथ्याशी व अमृतवाहिनी प्रवरेच्या किना-यावर अमृतेश्वराचे अप्रतिम कोरीव शिल्पकलेचा नमुना असलेले मंदिर आहे. इ.स.११व्या शतकातील एक प्राचीन मंदिर होय. चालुक्य शैलीतील हे मंदिर म्हणजे अप्रतिम शिल्पकलेचा एक सुंदर नमुना आहे. सामुहिक पूजा आणि प्रार्थना करण्याच्या दृष्टीने मंदिराची रचना करण्यात आली आहे. मोठ्या वाद्याप्रमाणे मंदिराची रचना असून मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार थेट मंदिराच्या गर्भगृहातच उघडते.
मंत्रोच्चाराचा परिणाम अधिक चांगला व दीर्घकाळ टिकणारा कसा राहील याकडे मंदिराची रचना करताना विशेष लक्ष पुरविले आहे. मंदिराच्या भिंतीवरचे कोरीव काम विविध मूर्ती, प्रवेशद्वारावरील मैथुन शिल्पे व देवदेवतांच्या कोरीव मूर्ती, छतावरील समुद्र मंथनाची दृश्ये, शिवपूजेचा देखावा, नृत्य शिल्पे, नक्षीकाम अत्यंत सुंदर व विलोभनीय आहे.
१५ ते १६ मीटर उंच चुना विरहित देवदेवतांच्या कोरीव जोडकाम केलेले हे मंदिर पूर्ण दगडी असून त्याची लांबी २३ मी. व रुंदी १२ मी आहे. मंदिराच्या जवळ चौरस बांधणीची व पाय-या पाय-याची पुष्करणी आहे. कुंडाच्या कडेला १२ देवळ्या असून त्यात गदाधारी, चक्रधारी व शेषधारी अशा भगवान विष्णूच्या मूर्ती आहेत.
वादळ वारा आणि तुफान पर्जन्यवृष्टीशी मुकाबला करत गेल्या ८०० वर्षांपासून असंख्य भाविक, कलावंताना व पर्यटकांना हे मंदिर भुरळ घालत आहे.
Kunal Devidas Nagare