महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 89,09,636

एक अनुभव गडकिल्ले संवर्धन मोहिमेचा

Views: 3882
8 Min Read

एक अनुभव गडकिल्ले संवर्धन मोहिमेचा

संवर्धनाची इच्छा असेल तर ती व्यक्ती समोरच्या सगळ्या गोष्टी मार्गी लावत मोहिमेला येणारच. असाच अनुभव आम्हाला परवाच्या मोहिमेत आला. २ दिवस गडावर राहायचं इतर कोणत्याही मुलीची सोबत नसताना तेही गड संवर्धनाच्या मोहिमेत हे खरंच सोप्प काम नाहीय. पण आमच्या ह्या बहिणीने सगळं अगदी लिलया पेललं. सगळा अनुभव तिच्याच शब्दात. पोस्ट मोठी आहे पण नक्की वाचा.

गड किल्ले आणि माझी ओळख

जय शिवराय.

खरं तर सुरुवात कुठून करावी हा मोठा प्रश्न पडलाय.
सांगायला गेलं तर माझी आणि गडकिल्ल्यांची ओळख जेमतेम एक किंवा दीड वर्षापासूनचीच, निम्मित व प्रोत्साहन भेटले ते आमच्या दादुस कडुन आणि प्रसंग सांगायचं म्हणजे पाहिला वहिला दिपोत्सव म्हणजेच गडदीपावली आणि गड ओळख मी अनुभवली ती नारायणगड जुन्नर मध्ये. हा पहिला गड खूप काही शिकवून गेला माझा परिचय ह्या गड किल्ल्यांशी करून महाराजांना बद्दलचा आदर आणि अभिमानाला उधाण आलं, आणि ठरवलं या पुढे थांबायचे नाही जस जमेल त्या परिने गड किल्ले अभ्यासायचे, त्या नंतर जस जसे सह्याद्रीचा सहवास लाभला तस तसे हे प्रेम वाढतच जाऊ लागले. सुरुवात थोडी हळू झाली पण हरकत नाही मी जवळ जवळ एकाच वर्षांत १५ किल्ल्यांना भेट दिली तेथील वास्तू आणि महत्व जाणून घायचा प्रयत्न चालू केला आणि काही अडले तर पूर्ण स्वराज्याचे वैभव टीम मधील दादा एका हाकेत मला माहिती देत होतेच त्यांच्या मार्गदर्शन आणि मदती मुळे खूप काही शिकले त्या बद्दल खूप खूप आभार. पुढे विचार आला फक्त गड किल्ले फिरून लिस्ट मध्येच भर करत राहायचं का? पुढे काय? एवढ सुंदर असे सह्याद्रीचे रूप निहाळायच म्हणजे आयुष्य पण कमी पडेल,

ते करूच म्हणा आणि ते म्हणजे सुखच आपल्या गड प्रेमींसाठी, तरी पुढे काय असाच प्रवास करत बसायचं की अजून काही सुरू करायच ही घाळमेळ चालूच होती, त्या मध्येच संवर्धन कार्या बद्दल समजले. विचार केला आपण इथेच का नाही हातभार लावत, सह्याद्री आणि महाराज्यांनी एवढया गड किल्ल्याचा आपल्याला वारस बनवल आहे तो वारसा आपण नाही जपायचा तर कोणी.

स्वराज्याचे वैभव पण संवर्धन मोहिम करतच असते समजल्या वर तर अजूनच जोर आला. आधी दादा ला विचारायच ठरवलं सुरुवातीला मला खूप टांग देण्यात आल्या होत्या नाही ग मुली कोणी नाही आहेत मोहिमेत आणि सामान तुला झेपणार नाही तुझे वजन केवढे तुला जमेल का? हे काही फक्त ट्रेकिंग नाहीय. तिथे खूप कामे करावी लागणार. मुळात एका दिवसात परतायला जमणार नाही तू कशी राहणार तिकडे आणि असे असंख्य प्रश्नांचा माझ्या वर भडिमार करण्यात आला होता. पण माझे तर ठरल होत मी करणारच असेच खूप दिवस सर्व दादांना मस्का लावुन जस जमेल तशा विनवण्या केल्या वैतागून ते पण अखेर मला सोबत न्यायला तयार झाले.

आणि मला अर्धी लढाई जिंकल्याचे समाधान मिळाले. आणि सुरू झाली ती माझी तयारी, हे सामान घ्यायचे आहे चादर भरा, कपडे भरा, रात्रीच ट्रेकिंग हा एक नवीन अनुभव माझी वाट बघत होता, जस जस मोहिमेचा दिवस जवळ आला तसे तसे नियोजन पक्के होत गेले. मी पुन्हा एकदा खात्री करून घेतली की मला खरचं हे सोबत नेतायत ना? नाही तर मी सरळ सांगितलच होत जर मला फसवलात तर मग मी एकटी येईन मागून तुमच्या, मला तर वाटत त्याच भीती पोटी त्यांनी माझी इच्छा पूर्ण करायचं ठरवलं. इच्छा बोलण्या पेक्षा माझी जिद्द पूर्ण होणार होती. मनात खूप भीती पण वाटत होती की जमेल ना मला? आणि सर्वांच्या मनात माझ्या बद्दलेचे सर्व प्रश्नांचे निरसन मी करू शकेन ना माझ्या कामातून? मुळात जो काही हट्ट केला होता तो सार्थकी लागेल का? याची पुष्टी करायची म्हणजे तेथे गेल्याशिवाय कळणार देखील नाही. अखेर क्षण आलाच शुक्रवारी रात्री निघालो पनवेल माणिकगड संवर्धन मोहिमेला रात्री १ च्या सुमारास गड चढायला सुरुवात केली रात्रीचे चढायचे होते म्हणून सावकाश गतीने आणि सांभाळून जात होतो त्यात माझी पहिली वेळ म्हणून लहान मुला प्रमाणे सांभाळले जात होते. या वेळी अवघे ६ जण होतो मोहिमेला त्यात मला तर त्यानी कच्चा लिंबू म्हणूनच घोषित केले होते.

किल्ला चढून माथ्यावर पोचलो अंदाजे ३.३०-४ वाजले होते. भराभर दोन तंबू म्हणजेच टेंट उभारून घेतले, सामान आत मध्ये टाकले थोडा आराम करून घेतला. सकाळी लवकर उठून वाट पाहू लागलो ती सूर्योदय होण्याची आपल्या पंचांगानुसार बरोबर ७.०३ ला सुर्य देवाचे दर्शन घडले. पटापट दोन चार फोटो काढून घेतले. आणि तो निसर्गरम्य परिसर डोळ्यासमोर तरंगळू लागला. समोर धुक्याच्या समुद्रात हळूच डोकावून पाहत होते ते इर्षाळगड त्या मागोमाग प्रबळगड व कलावंतीण सुळका दिसला. आमच मन भरून निसर्ग पाहून झाला होता आत्ता पोटात भुकेने कावळे ओरडत होते. तेवढ्यात एका माणसाने आम्हाला आवाज दिला पोरांनो काय करतात या थोडा प्रसाद खाऊन घ्या आधी, आम्ही विचार करू लागलो सहसा किल्ल्यांवर ट्रेकर आणि निवडक माणसे सोडल्यास कोणी येत नाही मग हे कोण? त्यांच्या सोबत ओळख करून घेताना समजले की हे गावकरी शिवरात्री म्हणून गडावरील दैवत असलेले महादेव मंदिर जवळ मुक्कामी थांबले होते. आमच तर असे झाले होते की सकाळीच महादेव पावले याचा आनंद झाला भराभर खाऊन घेतले मस्त कडक असा चहा चा आस्वाद घेताना दिवस भराची कामे ठरवुन घेतली. आधी चालू असेल काम पुढे नेऊ ठरवले.

सुरुवात झाली पहारीचे आणि कुदलीचे घाव घट्ट धरून बसलेल्या मातीवर पडू लागले, घमेले भरून माती काढू लागले.माती दगडाचे थर रचून उभे राहू लागले. नाही होय करता मी खूप काम केलं होते तरी मुद्दाम चिडवायचे म्हणून मला बोलू लागले काही काम केलं नाहीय अजून. उगाच नाचलीस यायला असे लहान मोठया विनोदामध्ये काम चालू होते. मधेच थांबलो काही अवशेष दिसू लागले मग ते का घडवले असतल त्याचा उपयोग कशा साठी सर्व तर्क वितर्क लावले जात होते. सुर्य मावळतीकडे झुकत चालला होता आता थांबायला हवे जेवणाची सोय केली पाहिजे. थोडी फार लाकडे वेचून चूल पेटवली गेली. मसाले भात, पापड लोणचे, घरून आणलेले थेपले खाल्ले आणि आमच्या २ दिवसाच्या घरात शिरलो. दिवसभराच्या कामामुळे सर्वच खूप थकले होते लगेच झोपी गेले. रात्रीचे १-१.३० वाजले असताना खूप मोठ्या जमावाचा भास झाला पाहतो तर की एक एक करून तब्बल ५०-५५ माणस झाली आणि ही कोणी परकी नव्हतीच आमच्या मदतीला आलेले दुर्गसेवक होते. दुसऱ्या दिवशी सर्वांची ओळख व नाश्ता करून झाल्या वर सर्व जोमाने कामाला लागले. या सर्व पुरुष मंडळी मध्ये मी एकटीच मुलगी हा पण एक क्षण पण आनंद देवुन गेला. आपण सर्व येथे स्वराज्याचे वैभव ला पुन्हा त्याच्या मूळ रुपात आणायला जमलोय याची जाण सर्वांनाच होती. काही क्षण एकदम सुंदर वाटत होते कारण या ६०-६२ जमावा मध्ये मी एकटी मुलगी. नंतर एक विचार मनामध्ये कायम उभा रहात होतार
जर ही मुले एवढी मेहनत घेत आहेत तर त्याच बरोबरीला तेवढ्याच संख्येनी मुली का नाही जमल्या आहेत याची खंत वाटू लागली. जसे महाराज्यांच्या सैन्यात मावळे होते त्याच प्रकारे गुप्तहेर खात्यात मुली पण होत्याच की. मग आत्ताच्या या जगात मुलींचे योगदान कमी का? आपण गर्वाने बोलतीच की ‘ आम्ही जिजाऊच्या मुली’ सांगायचा मुद्दा हाच की जशी मुल तसे आपण मग आपणही अश्या विविध मोहिमेत सहभाग घेतला पाहिजे.

अजुन खुप सह्याद्री फिरायचा आहे पण ते करत असताना संवर्धन कार्यात ही सहभाग घ्यायचा हे पक्के मनाशी ठरवुन मी माघारी परतत होते. एक वेगळा अनुभव सोबत घेऊन.

माहिती साभार – स्वराज्याचे वैभव

Leave a Comment