अनंतशयन विष्णु –
अनंतशयन असा हा अप्रतिम विष्णु मंदिराच्या बाह्य भागावर कुठे सहसा आढळत नाही. ही मूर्ती परभणीच्या क्रांती चौकातील राम मंदिरात आहे (टाकळकर कुटूंबियांचे हे मंदिर आहे).
उजव्या वरच्या हातावर मस्तक विसावलेले आहे. उजव्या पायाशी लक्ष्मी असून ती पाय चुरत आहे (याला पाय दाबणे म्हणत नाहीत). तिच्या बाजूला भुदेवी हात जोडून उभी आहे. नाभीतून उगवलेल्या कमळावर ब्रह्मदेवाची प्रतिमा कोरलेली आहे. पाठशिळेवर दहा अवतार कोरलेले आहेत. खाली नागाच्या वेटोळ्यांची मउ शय्या आहे. डोक्याशी नागाचा फणा आहे.
या मूर्तीचे वैशिष्ट्य म्हणजे पाठशिळेवर कोरलेले अष्टदिक्पाल. कंसात दिशा आणि वाहन दिले आहेत. इंद्र (पूर्व -ऐरावत)), अग्नी (अग्न-मेष) , यम (दक्षिण-महिष), निऋती (नैऋत्य-श्वान), वरूण (पश्चिम-मकर), वायु (वायव्य-मृग), कुबेर (उत्तर- नरवाहन) , ईशान (ईशान्य-वृष). शिल्पात त्यांची वाहने पण दाखवली आहेत. अभ्यासक या शिल्पाला फार महत्वाचे मानतात त्याचे कारणच ही वैशिष्ट्ये आहेत. बारवेत अशा शिल्पाची स्थापना केलेली असते.
अष्टदिक्पाल संदर्भ “भारतीय मूर्तीशास्त्र” या प्रदीप म्हैसेकर च्या पुस्तकातून.
छायाचित्र सौजन्य – मल्हारीकांत देशमुख, परभणी.