अंचलेश्वर मंदिर, गांजीभोयरे, ता. पारनेर
अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर या तालुक्याच्या ठिकाणापासून ११ किमी अंतरावर गांजीभोयरे हे ऐतिहासिक दृष्टया समृद्ध असलेलं एक लहान गाव आहे. या गावात पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे सरदार पांढरे यांचा वाडा आहे. त्याला गावकरी गढीचा वाडा म्हणून ओळखतात. या वाड्याचे आजमितीस केवळ प्रवेशद्वार तेवढे शिल्लक आहे. या शिल्लक असलेल्या प्रवेशद्वारावरून आपल्याला वाड्याच्या भव्यतेची कल्पना येऊ शकते. गावात आपल्याला जागोजागी अश्या भग्न वाड्याचे अवशेष विखुरलेले दिसून येतात. याच गावात ओढ्याच्या कडेला तटबंदीत असलेले अंचलेश्वराचे पुरातन मंदिर व बारव गावाच्या समृद्ध इतिहासाच्या पाऊलखुणा अजूनही जपून आहे.अंचलेश्वर मंदिर.
गावातील सरदार पांढरे यांच्या वाड्याच्या शेजारीच आपल्याला एक ओढा वाहताना दिसतो. हा ओढा ओलांडला की उजव्या बाजूला तटबंदीत अंचलेश्वर मंदिर व बारव आपल्याला दिसून येते. मंदिर पुरातन असून गावकऱ्यांनी रंगरंगोटी करून जीर्णोद्धार केल्याने त्याचे मूळ सौंदर्य हरवले आहे. नंदीमंडप, सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी मंदिराची प्राथमिक रचना आपल्याला दिसून येते. मंदिर पूर्वाभिमुख असून उत्तर व दक्षिण दिशेला देखील प्रवेशद्वार आहेत. दक्षिण दिशेला बारव असून बारवेतून मंदिरात जाण्यासाठी पायऱ्या आहेत.
बारवेच्या बाजूचे प्रवेशद्वार मात्र सध्या वापरात नाही. नंदीमंडपात दोन नंदी प्रतिमा आपल्याला दिसून येतात. प्रवेशद्वारावर काही स्त्री शिल्पे असून शिल्पकाम अगदीच साधे असून मंदिर स्थापत्य परंपरेतील अखेरच्या कालखंडातील हे मंदिर असावे. पारनेर ला कधी गेलात तर जवळच असणाऱ्या गांजीभोयरे या लहान गावाला देखील आवर्जून भेट दिलीत तर गावाचा समृद्ध इतिहास सर्वांपर्यंत पोहचण्यास नक्कीच मोलाची मदत होऊ शकते.
Rohan Gadekar