महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,24,769

पुरातन बारवस्थापत्य व शिल्प, वालूर

By Discover Maharashtra Views: 2718 3 Min Read

पुरातन बारवस्थापत्य व शिल्प, वालूर –

वाल्मिक ऋषींची तपोभूमी अशी समाजधारणा असलेल्या सेलू तालुक्यातील वालूर या एकेकाळच्या वैभवसंपन्न गांवात चार विस्तीर्ण बारवा  शिल्पांची मोठ्याप्रमाणावर  हेळसांड होत असून ही बाब ग्रामस्थांच्या अंगवळणी पडली आहे. कलात्मक पध्दतीच्या सगळ्या बारवांवर झुडपं,गवत वाढले आहे. त्यांची अवस्था कचराकुंडी पेक्षा निराळी राहिलेली नाही..रामायण काळाशी नाते सांगणा-या  या गावी वाल्मिकी ऋषींचे मंदिर आहे. शिवरात्रीला येथे यात्रा भरते.निजामकालखंडात वालूर हे मोठे व्यापारी केंद्र राहिलेले आहे.परिसरातील ७२ गांवांचा कारभार येथून चालायचा.कोर्ट,तहसिल,कचेरी ही कार्यालयं त्या काळी या गांवी होती.गावाचे मुळ नांव वारूळ असावे  त्याचे पुढे वालूर झाले असावे.(पुरातन बारवस्थापत्य व शिल्प, वालूर)

निजामी राजवटीत वाल्मिकेश्वराच्या प्राचिन मुळच्या मंदिराला क्षती पोहचल्याचे सांगितले जाते.या मंदिर परिसरात  पडझड झालेल्या दोन  बारवा आहेत.या बारवेत कितीतरी भग्न मुर्ती आढळल्या आहेत.या पैकी सुर्यदेवता,गरुडाची मुर्ती ओळखायला येते.संपुर्ण नग्नावस्थेतील भैरवाचे शिल्प अतिशय रेखीव पध्दतीचे आहे. गळ्यात नरमुंड,कवड्याची माळ,एका हातात शिरकमळ तर दुस-या हातात डमरू घेतलेली वैशिष्ट्यपुर्ण  मुर्ती पहायला मिळते.वालूर व परिसराचे पौराणिक व ऐतिहासिक महत्त्व विषद करणारे अभ्यासपुर्ण  पुस्तक श्रीकर कौसडीकर यांनी लिहून स्थानमहत्व विषद केलेले आहे.गावाच्या मध्यात दोन सुस्थितीतील बारवा आहेत.त्यातील आठकड्यांची बारव आगळीक असून तिची बांधणी गिअरबाॅक्स पध्दतीची आहे.मध्यवस्तीत हेमाडपंथी मशिद असून त्यालगत असणा-या संपुर्ण दगडात बांधलेल्या  बारवेची दुरवस्था डोळ्याला देखवत नाही.ग्रामस्थ बारवेत चक्क कचरा,घाण टाकतात.

दुर्लक्षीत नगरेश्वर मंदिर!

गावातील नगरेश्वर हे शंकराचे त्रिदल पध्दतीचे मंदिर सुस्थितीत असले तरी मंदिराच्या छतावर गवत झुडपं वाढली आहेत.मंदिराचा मुखमंडप सुस्थीतीत आहे.सभामंडप रंगशीळा,अंतराळ व गाभारा परिपुर्ण आहे.गर्भगृहाच्या द्वारशाखेवर सुरेख नक्षीकांम आहे.१२खांबी सभामंडप निटनेटका आहे. मंदिराच्या मुखमंडपाच्या डाव्या बाजूला  एका शीळेवर मिथून शिल्प कोरलेले आहेत.नगरेश्वर मंदिराच्या कांहीं अंतरावर धारेवर महादेवाच्या मंदिराच्या प्रवेशद्वाराशी  भग्नावस्थेतील देवदेवतांच्या मुर्त्या विखुरलेल्या अवस्थेत दिसतात.रिध्दी-सिध्दीसह गणेशाची विद्रूपन केलेली मूर्ती पाहता मन खिन्न होतं.

कलाक्षेत्रात गावाचे योगदान –

खरं पाहता वालूर हे एकेकाळी परभणी जिल्ह्यातील नावाजलेले गांव, सांस्कृतिक केंद्र म्हणायला हरकत नाही.राजकारण,समाजकारण,धार्मिक क्षेत्रात  गावाचा दबदबा राहिलेला.निजाम राजवटीत या गावी वर्षातून दोन वेळा मेळे व्हायचे.संगीत नाटकाचे प्रयोग होत असे.कै.रंगराव चौधरी यांनी संगीत शारदा नाटकाचा उर्दू अनुवाद करून त्याच्या प्रयोग  प्रसंगी हैदराबाद संस्थानचे नवाब  वालूरला  हजर होते.दादासाहेब चौधरींच्या नाट्यमंडळात गिरजप्पा महाजन,बाबा कुंभार,संतराम सनई,बाबाराव मिस्तरी,भिकूदेव पाठक,बाबुलाल दायमा या तत्कालिन कलावंतांचा समावेश होता.वालूर येथील मुरलीधर व इंदर हे बंधू मृदंगवादनात तरबेज होते .वारकरी संप्रदायात ह.भ.प. बापुसाहेब वालूरकर महाराज यांचे मोठे योगदान राहिलेले आहे. कलगीतुरा या लोककलेचा जनक नंदभवानी हा मुळचा वालूर नजिक कौसडी गावचा व-हाडातील गुंधा येथील लिंगायत वाणी समाजाचे संत हरिहर महाराज यांची वालूर हीच जन्मभूमी. हैदराबादमुक्ती संग्रामात वालूर व कौसडी गावाचे योगदान इतिहासात अधोरेखीत झालेले आहे.

मल्हारिकांत देशमुख, परभणी

Leave a Comment