महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 89,10,615

प्राचीन भव्य गणेशमुर्ती, अजिंठा

Views: 2510
4 Min Read

प्राचीन भव्य गणेशमुर्ती, अजिंठा-

अजिंठ्याच्या डोंगरांमध्ये निसर्गरम्य अशा परिसरात एकूण 5 किल्ले आहेत. प्राचीन लेण्या, मंदिरे, जंगल यांनी हा परिसर समृद्ध आहे. बहुतेकांना केवळ अजिंठ्याचीच माहिती असते. अगदी अजिंठा गावाचीही माहिती नसते. प्राचीन भव्य गणेशमुर्ती, अजिंठा डोंगरांतील वेताळ वाडी किल्ल्या जवळील रूद्रेश्वर लेण्यांतील आहे.

अजिंठा गावाच्या अलीकडे डाव्या बाजूला एक रस्ता ‘अजिंठा व्ह्यु पॉईंट’ कडे जातो. या ठिकाणाहून अजिंठा लेणीचे नयनरम्य असे दृश्य दिसते. या रस्त्यावरून पिंपळदरी गावापासून डावीकडे जो रस्ता जातो त्या रस्त्यावर हळदा म्हणून गाव आहे. याच हळद्याच्या पुढे वेताळवाडीचा किल्ला आहे. या ठिकाणाला अजिंठा रोडवरून गोळेगांवपासून उंडणगाव मार्गाने पण जाता येते. हा रस्ता हळदा घाटामुळे अजूनच जास्त निसर्गरम्य आहे.

वेताळवाडीचा किल्ला यादवांच्या काळातील असून देवगिरी किल्ल्यापेक्षाही प्राचीन आहे. वेताळवाडी किल्ल्याला वळसा घालून सोयगांव रस्त्यावर जाताना वाडी गावांतून एक छोटी वाट रूद्रेश्वर लेणीच्या डोंगराकडे जाते. काही अंतरावर ही कच्ची सडक आहे. वाटेत तीन मोठे खळाळणारे झरे लागतात. ते ओलांडून गेल्यावर रूद्रेश्वर डोंगराची प्रत्यक्ष चढण सुरू होते. या जागेपासून दगड मातीची पायवाट लेणीपर्यंत पोचते.

डोंगरमाथ्यावरून कोसळणार्याे सुंदर धबधब्याने दगड कापत कापत एक सुबक अशी खोबण तयार केली आहे. याच खोबणीत रूद्रेश्वर लेणी कोरली गेली आहे. ही लेणी अजिंठा लेणीच्या काळातील आहे. म्हणजे जवळपास दोन हजार वर्षांपूर्वीची ही लेणी आहे. लेणीसाठी डोंगरावरून उतरणारी एक अवघड अशी पायवाट आहे.

लेणीत महादेवाची सुंदर अशी पिंड, समोर सुबक नंदी आहे. या लेणीतील खरे आकर्षण म्हणजे वरच्या छायाचित्रात असलेली गणेशमुर्ती. सहा फुटाची भव्य अशी ही गणेशमुर्ती दगडांत कोरलेली आहे. एकसंध दगडांत कोरलेली इतकी प्राचीन दुसरी गणेशमुर्ती महाराष्ट्रात नाही. उजवा पाय उंचावलेला व डावा पाय दुमडलेला अशी ही देखणी गणेशमुर्ती आहे. कमरेला नागाने वेढा घातलेला आहे. शेंदूर फासल्याने मुळचे सौंदर्य लक्षात येत नाही. मुर्तीची भव्यता डोळ्यांत सहज भरते. समोरच्या दरवाज्यांतून वरून पडणार्याव पाण्याचा अखंड नाद कानात घुमत राहतो.

मुर्तीसमोरच्या छोट्या ओटयावर डोळे मिटून हात जोडून बसल्यास हा पाण्याचा नाद अथर्वशिर्ष उच्चारत असल्याचा भास होत राहतो. या मूर्ती शेजारी उग्र नरसिंहाचे शिल्प कोरलेले आहे. गणपतीच्या बाजूला नरसिंह असे इतरत्र कुठेच आढळत नाही. डाव्या बाजूला वीणावादिनी सरस्वतीचे शिल्प आहे. वरतून कोसळणार्याण धबधब्याच्या पाण्यातूनच लेणीत जाता येते. पावसाळा उताराला लागतो तेंव्हा ही धार बारीक होवून जाते. उन्हाळ्यात मग धबधबा पूर्णच कोरडा पडतो. तरी समोरच्या कुंडात थोडे पाणी साठलेले असते.

यादव सम्राट भिल्लम देव याच्या काळातील पुरातन किल्ला या लेणीच्या समोरच आहे. या किल्ल्याला भक्कम अशी तटबंदी आहे. जवळपास सर्वच तटबंदी अजून शाबूत आहे. दोन मोठे भक्कम दरवाजे या किल्ल्याला आहेत. किल्याच्या डोंगरावरच एक लेणी अजून दुर्लक्षीत अवस्थेत आहे. झाडांनी झाकलेला तिचा काही भाग फक्त दिसतो. अजून तिथले संशोधन उत्खनन शिल्लक आहे. या लेणीला जायला रस्ता नाही.

वाडीच्या किल्ल्याच्या संवर्धनाचे काम चालू आहे. अधी तर किल्ल्यावर जायला नीट रस्ताच नव्हता. गुराख्यांनी जी पायवाट तयार केली तिनेच जाता यायचे. आता दगड फोडून एक जरा बर्याापैकी रस्ता तात्पुरता तयार केला गेला आहे. पण अजून भरपुर काम बाकी आहे. किल्ल्यावर उत्तर बाजूला पडून गेलेल्या हवामहलाच्या सुंदर चार कमानी शिल्लक आहेत. या कमानीतून खानदेशचा परिसर दिसतो. हे ठिकाण म्हणजे दक्षिण भारताचे उत्तरेकडील महाद्वारच होय. या घाटांतून पूर्वीच्या काळी वाहतूक व्हायची. उत्तर दक्षिणेला जोडणार्यार रस्त्यावरचा हा किल्ला आहे. सामरिक दृष्ट्या या किल्ल्याचे स्थान महत्त्वाचे आहे.

अशी प्राचीन ऐतिहासिक पुरातत्वीय दृष्ट्या महत्त्वाची निसर्गरम्य स्थळे आपल्या अगदी जवळ असून (औरंगाबाद करांसाठी) दुर्लक्षीत आहेत. मराठवाडा बाहेरच्या लोकांना याची माहिती नसणे समजू शकतो. पण मराठवाड्यांतील किंवा अगदी औरंगाबाद शहरांत वर्षानुवर्षे वास्तव्यास आसणार्यांडनाही याची माहिती नाही.

हे ठिकाण ऐतिहासीक, धार्मिक पौराणिक दृष्ट्या महत्त्वाचे आहेच पण सोबतच निसर्गरम्यही आहे. एरव्ही लांब लांब जावून तिथली वर्णनं एकमेकांना सांगणार्यांषना ही जवळची ठिकाणं दिसत नाहीत का? दरवर्षी परदेशी चकरा मारणारे किंवा आम्ही दरवर्षी तिरूपतीला जातो म्हणजे जातोच असे अभिमानाने सांगणारे इतक्या जवळच्या ठिकाणी एखादी चक्कर का मारत नाहीत?

श्रीकांत उमरीकर

Leave a Comment